रोम 12 जुलै : कोरोनाव्हायरसवर (coronavirus) प्रभावी उपचार नसले तरी त्याची लक्षणं (coronavirus symptoms) कमी करण्यासाठी आवश्यक ते उपचार केले जातात. काही दिवसांनी त्या रुग्णांचा रिपोर्टही निगेटिव्ह येतो आणि लक्षणंही दूर होतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही रुग्णांमध्ये एक-दोन आठवडे नव्हे तर तब्बल 2 महिन्यांनंतरही लक्षणं कायम राहतात. जामा जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे, इटलीत रुग्णालयात दाखल असलेल्या 143 कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, 90% रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण होऊन बरे झाल्यानंतर दोन महिन्यांनंतरही काही लक्षणं होती, असं संशोधकांना दिसून आलं. कोरोनाची लागण झाल्यानंतर 60 दिवसांनी फक्त 12.6% रुग्ण कोरोनाच्या लक्षणांपासून मुक्त झाले. 55% लोकांमध्ये दोन महिन्यांनंतरही तीन किंवा त्यापेक्षा अधिक लक्षणं होती 32% रुग्णांमध्ये एक किंवा दोन लक्षणं होती. 43% रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. 21% रुग्णांच्या छातीत वेदना होत होत्या. हे वाचा - ‘वेळच तर आहे निघून जाईल’, कोरोनाग्रस्त अमिताभ यांच्या प्रेरणादायी कवितेचा VIDEO कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांमध्ये थकवा, श्वास घेण्यास त्रास, सांधेदुखी अशी लक्षणं कायम राहत असल्याचं दिसलं. निम्म्या लोकांनी यामुळे आपल्या आयुष्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं. याआधीदेखील एका अभ्यासात ज्या कोरोना रुग्णांची चव आणि वास घेण्याची क्षमता निघून जाते, असं दिसून आलं त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. इतर अवयवांवरही कोरोना करतोय परिणाम कोरोना व्हायरस हा फक्त श्वसन प्रक्रियेवरच हल्ला करतो अशी माहिती आत्तापर्यंत दिली जात होती. मात्र आता त्याविषयी नवी माहिती बाहेर आली आहे. फुफ्फुसाबरोबरच कोरोनाव्हायरस हा किडनी, लिव्हर, हृदय मेंदू आणि तुमच्या नर्व्हस सिस्टिमवरही हल्ला करतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोना रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर हे नवे निष्कर्ष जाहीर केले आहेत. कोलंबिया विद्यापीठातल्या (Columbia University) हॉस्पिटलमध्ये गेली तीन महिने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

)







