मुंबई, 19 फेब्रुवारी: महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus Cases in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे. अकोला आणि अमरावती हे जिल्हे तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहेत. यवतमाळ जिल्हातही परिस्थिती वेगळी नाही आहे. राज्य सरकारकडून वेळोवेळी याबाबत नागरिकांना अलर्ट केलं जात आहे. याठिकाणी वाढणारी रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे. कोरोनाची ही शृंखला तोडायची असेल तर प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याचा पॉझिटिव्हिटी दरही गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढला आहे.संपूर्ण राज्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 8.8 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 7.76 टक्के एवढा आहे. अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 32 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 24 टक्के आहे.अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 48 टक्के असून आठवड्याचा 35 टक्के आहे तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 15 टक्के आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेऊन ‘एसएमएस’ चा (सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापर) अवलंब करावा, असे ट्वीट राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. (हे वाचा- ‘राजकारण्यांमुळे वाढला कोरोना; वेळीच आवर घातला नाहीतर लाटा येतच राहणार’ ) राज्य सरकारकडून अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.
सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे आणि एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा खाली आणावा असे निर्देश संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती टोपेंनी दिली अकोल्यात बंद कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्याची परिस्थिती अकोला जिल्ह्यामध्ये सध्या 9 कोव्हिड सेंटर सुरू आहेत, मात्र सर्वात जास्त खाटा असलेलं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोव्हिड सेंटर बंद करण्यात आलं आहे. अकोला मेडिकल कॉलेजमध्ये आठवडाभरात 6 वार्ड वाढवण्यात आले आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहता आता बंद केलेले कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. अकोल्यात गुरुवारी संध्याकाळपर्यत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13137 होती असून त्यापैकी 1407 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 346 जणांचा मृत्यू झाला आहे.