नवी दिल्ली, 17 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना पसरलेला आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूचे विविध व्हॅरिएंट्स सापडले आहेत. या व्हॅरिएंट्समुळे कोट्यवधी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला असून, लाखो जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यानच्या काळात ओमिक्रॉननंतर कोरोना महामारीचा शेवट होईल, असं वाटत होतं; मात्र जगावर असलेलं कोरोना महामारीचं संकट अद्याप संपलेलं नसल्याचं दिसत आहे. ज्या देशापासून कोरोनाची सुरुवात झाली होती, त्याच चीनपासून पुन्हा जगाला कोरोनाचा धोका आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेतल्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या (IHME) अंदाजानुसार, 2023च्या एप्रिलपर्यंत चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढेल. तिथे तीन लाख 22 हजार मृत्यू होऊ शकतात. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना प्रतिबंधात्मक नियम हटवल्यानंतर चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने अद्याप संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची पुष्टी केली नव्हती. डिसेंबर महिन्यात कोरोना संसर्गामुळे तीन मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात झाली. चीनने अधिकृतपणे आतापर्यंत केवळ 5235 मृत्यू झाल्याचं जाहीर केलं आहे. अनेक विरोधानंतर डिसेंबर महिन्यात चीनने कोविडचे कठोर नियम हटवले होते. निर्बंध हटवल्यानंतर देशात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्यास शेजारच्या देशांच्याही अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये कोविडचे कठोर नियम हटवल्यानंतर आता 2023मध्ये तिथे संसर्गामुळे लाखो मृत्यू होण्याची शक्यता आहे. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनने (IHME) हा अंदाज व्यक्त केला आहे. आयएसएमईच्या अंदाजानुसार, पुढील वर्षी एप्रिलपर्यंत चीनमध्ये कोरोनाचा मोठा विस्फोट होईल. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या तीन लाख 22 हजारांपर्यंत जाऊ शकते. चीनच्या एक तृतीयांश लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होईल, असा अंदाज आहे. अमेरिकेच्या अहवालावर अद्याप चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हेही वाचा - रशियाकडून युक्रेवर पुन्हा मिसाईल हल्ले, प्रमुख शहरं निशाण्यावर कमी प्रभावी लशी आयएचएमईचे संचालक क्रिस्टोफर मरे म्हणाले की, ‘चीन शून्य कोविड धोरणाला चिकटून राहील असं कोणालाही वाटलं नव्हतं. आयएचएमईने चीनमधल्या कोरोना विस्फोटाबाबत दिलेल्या प्रोजेक्शनमध्ये म्हटलं आहे, की चीनचं शून्य-कोविड धोरण संसर्गाचे सुरुवातीचे व्हॅरिएंट थांबविण्यात प्रभावी ठरलं आहे; पण ओमिक्रॉन व्हॅरिएंटची उच्च संसर्गक्षमता थांबवणं कठीण जाणार आहे. आयएचएमईच्या मते, जे आधीच कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहेत, अशा नागरिकांना याचा जास्त धोका असणार आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव 80 किंवा त्याहून अधिक वर्षांच्या वृद्ध नागरिकांमध्ये जास्त दिसू शकतो. चीनमध्ये केला जात असलेला कमी परिणामकारक लशीचा वापरही यासाठी कारणीभूत ठरू शकतो. ख्रिस्तोफर मरे म्हणाले, की वुहानमधल्या मूळ उद्रेकापासूनच चीनने मृत्यूंची जाहीरपणे घोषणा केली नाही. आमच्या अंदाजानुसार, हाँगकाँगकडे उपलब्ध असलेला डेटा घेण्यात आला आहे, जेणेकरून मृत्युदराचा अंदाज लावता येईल. चायना नॅशनल हेल्थ कमिशननं दिलेल्या लसीकरणाच्या माहितीच्या आधारे, देशात संसर्गाचं प्रमाण वाढल्यास त्याचा प्रांतावर काय परिणाम होईल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, पुढच्या वर्षात चीनच्या 60 टक्के लोकसंख्येला कोविडची लागण होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.