नवी दिल्ली 17 एप्रिल : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा रोज एक नवा उच्चांक नोंदवला जात आहे. याचदरम्यान शुक्रवारी एकाच दिवसात 1340 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. भयावह स्थिती म्हणजे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठीदेखील अनेक तास वाट पाहावी लागत आहे. रुग्णालयांच्या बाहेर रुग्णांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणानं चिंतेत भर घातली आहे, तर दुसरीकडे वाढत्या रुग्णसंख्येमुळे अर्ध्याहून अधिक लोक घरामध्येच कैद झाली आहेत. शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या संख्येनं पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. देशात एका दिवसात 2,33,869 नवीन कोरोना रुग्णांची (Corona Cases in India) नोंद झाली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहाता देशातील 15 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नाईट कर्फ्यू किंवा वीकेण्ड लॉकडाऊन करणं भाग पडलं आहे. सध्याच्या परिस्थितीत विविध निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर तब्बल 57 टक्के लोकसंख्या घरांमध्येच कैद झाली आहे. शुक्रवारच्या आधी भारतात एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू झाल्याचं 15 सप्टेंबरला पाहायला मिळालं होतं. तेव्हा 1,284 रुग्णांची आपला जीव गमावला होता. एका विश्लेषणानुसार, देशात पुढच्या दोन दिवसात 700 मिलियनहून अधिक लोक ठराविक कालावधीसाठी कर्फ्यूचा सामना करतील. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती पाहात हे निर्बंध गरजेचे असल्याचं स्पष्ट आहे. 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य 16 एप्रिलपर्यंत दररोज कोरोनाचे 188,400 नवे रुग्ण समोर येत होते. पहिल्या लाटेमध्ये कोरोना पीकवर असतानाही एवढे रुग्ण आढळत नव्हते. 16 सप्टेंबर 2020 ला जेव्हा कोरोना पीकवर होता, तेव्बा भारतात 93,617 नवे कोरोना रुग्ण समोर आले होते. ही परिस्थिती पाहाता आता देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. कुठे नाईट कर्फ्यू तर कुठे लॉकडाऊन - छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहाता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात 15 दिवसांसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केलं गेलं आहे. छत्तीसगडमध्ये 20 जिल्हे आणि मध्य प्रदेशमध्ये 15 जिल्ह्यांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली, चंदीगड, राजस्थान आणि ओडिसामध्ये 10 जिल्ह्यांच्या शहरी भागात वीकेण्ड कर्फ्यू आहे. उत्तर प्रदेशनं रविवारी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.