ब्रिटन, 14 जून : एखाद्याला ताप आला, कुणी खोकत असेल तर त्याला कोरोना (coronavirus) तर झाला नाही अशी भीती आपल्या मनात निर्माण होते. काही कोरोना रुग्णांमध्ये लक्षणंही दिसत नाहीत. सध्या कोरोना रुग्णांचं निदान (Corona test) करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट, अँटिजेन टेस्ट केली जाते. पण आता असा अलार्म (Corona alarm) तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला एखादा कोरोना रुग्ण असेल तर तुम्हाला तो धोक्याची घंटा देणार आहे.
ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी सीलिंक माउंटेड कोविड अलार्म तयार केला आहे. जो रुममधील कोरोनाबाधित व्यक्तीबद्दल 15 मिनिटांत माहिती देईल, असा दावा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे.
कोरोनाबाधितांबद्दल माहिती देणारं हे उपकरण येत्या काळात विमानातील केबिन, शाळा (school), केअर सेंटर (care centre) आणि घर तसंच कार्यालयांमध्ये स्क्रिनिंगसाठी बसवता येईल. या उपकरणाचा आकार स्मोक अलार्म एवढा आहे.
हे वाचा - 90% प्रभावी, व्हेरिएंट्सवरही भारी; आता कोरोना लढ्यात पुण्याच्या सीरमची Novavax
आज तकने द संडे टाईम्सच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसारस लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहॅम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर केलेल्या संशोधनाचे प्राथमिक निकाल आशादायी आहेत. डिव्हाइसमधील परिणामाची अचूकता पातळी 98-100 टक्के पर्यंत प्रभावी आहे, असं संशोधकांनी टेस्टिंगनंतर सांगितलं. ही चाचणी आरटीपीसीर (RT-PCR Test) आणि अँटिजेन टेस्टच्या तुलनेतही जास्त प्रभावीपणे कोरोनाबाधितांची माहिती देत आहे.
केंब्रिजशायरमधील फर्म रोबो साइंटिफिकने तयार केलेला हा सेन्सर त्वचेद्वारे निर्मित रसायनं शोधून कोरोनाबाधित व्यक्ती ओळखू शकतो. हा सेन्सर कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांच्या श्वासामध्ये असलेल्या रसायनांचं परीक्षण करून निकाल देतो म्हणजेच ती व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही, हे सांगतो. हा सेन्सर मानवी नाकाद्वारे ओळखता येणाऱ्या सूक्ष्म वासालाही ओळखतो. कोविड अलार्म शोधणाऱ्या या टीमच्या एका संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, हा सूक्ष्म वास केवळ श्वान ओळखू शकतात मात्र, हा अलार्म त्यापेक्षा जास्त अचूक माहिती देऊ शकेल.
हा सेन्सर कोरोनाबाधित व्यक्तींना शोधू शकतो. बाधिताला कोरोनाची कोणतीही लक्षणं नसली तरी हा सेन्सर अचूक शोध घेऊ शकतो असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
हे वाचा - घाबरू नका! बिनधास्त घ्या Corona vaccine; सुरक्षिततेबाबत हा घ्या पुरावा
संशोधकांनी सांगितलं की, चाचणीचे निकाल सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. त्यांचं हे संशोधन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं असून त्याची समीक्षा करणं अद्याप बाकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus