रायपूर 08 मार्च : छत्तीसगडच्या कवर्धा येथील बोडला नगरपंचायतीच्या अन्न व नागरी पुरवठा आणि आरोग्य व वैद्यकीय विभाग अध्यक्ष काँग्रेस नेते ओमप्रकाश शर्मा यांनी कोरोना लसीबद्दल (Corona Vaccine) आता अजबच दावा केला आहे. त्यांनी या लसीचा संबंध थेट धर्माशी जोडल्याची घटना समोर आली आहे. शर्मा यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ते म्हणाले, की या लसीमध्ये गाय, डुक्कर आणि गर्भपात केलेल्या बाळाच्या मांसातील प्रथिनांचा समावेश आहे. त्यामुळे, धर्माचा आधार देत, मला ही लस घेण्यापासून सूट द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस नेता ओमप्रकाश शर्मा म्हणाले, की कोरोना लसीमध्ये गाय, डुक्कर आणि गर्भपात केलेल्या बाळाची चरबी असते. माझी हिंदू धर्म आहे आणि आमच्या धर्मात या गोष्टींचं सेवन पाप मानलं जातं तसंच याचा निषेध केला जातो. याच कारणामुळे मला आणि माझ्या परिवाराला ही लस घेण्यापासून सूट मिळावी. या लसीमुळे आमचा धर्म भ्रष्ट होईल. शर्मा यांनी उदाहरण देताना म्हटलं, की औरंगाबाद उच्च न्यायालयात डॉ. विलास जगदाळे विरुद्ध भारत सरकार अशी (15232,2019) याचिका दाखल केली गेली असल्याचे काँग्रेस नेत्यानं म्हटलं आहे. यातही धर्माच्या आधारे सूट देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेत्याचं असं म्हणणं आहे, की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 मध्येही याबाबत उल्लेख आहे. याशिवाय या लसीचे अनेक साईड इफेक्ट आहेत. शर्मा यांचं हे पत्र सध्या चर्चेत आहे. मात्र, लसीकरणाच्या बाबतीतही केल्या जाणाऱ्या या राजकारणामुळे लोकांच्या मनात अविश्वास निर्माण होत आहे. त्यामुळे या गोष्टीकडे राजकारणा पलिकडे जाऊन पाहाणे आणि अफवांपासून स्वतःचा तसंच इतरांचाही बचाव करणं गरजेचं आहे.