मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /चीनची कोरोना लस घेणं या देशांना पडलं महागात, प्रभावाबाबत समोर आलं भलतंच सत्य

चीनची कोरोना लस घेणं या देशांना पडलं महागात, प्रभावाबाबत समोर आलं भलतंच सत्य

सिनोफार्म आणि सिनोव्हॅक (Sinovac) या त्यांच्या कंपन्यांनी इनअॅक्टिव्हेटेड तंत्रज्ञानावर आधारित लशी (Vaccine) विकसित केल्या आहेत.

सिनोफार्म आणि सिनोव्हॅक (Sinovac) या त्यांच्या कंपन्यांनी इनअॅक्टिव्हेटेड तंत्रज्ञानावर आधारित लशी (Vaccine) विकसित केल्या आहेत.

सिनोफार्म आणि सिनोव्हॅक (Sinovac) या त्यांच्या कंपन्यांनी इनअॅक्टिव्हेटेड तंत्रज्ञानावर आधारित लशी (Vaccine) विकसित केल्या आहेत.

नवी दिल्ली 04 जून : चीनमधून उगम पावलेल्या कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लशी जशा जगभरात अनेक ठिकाणी तयार करण्यात आल्या, तशाच त्या चीनमधल्या शास्त्रज्ञांनीही विकसित केल्या आहेत. सिनोफार्म आणि सिनोव्हॅक (Sinovac) या त्यांच्या कंपन्यांनी इनअॅक्टिव्हेटेड तंत्रज्ञानावर आधारित लशी (Vaccine) विकसित केल्या आहेत. त्या स्वतःच्या देशात वापरल्या आहेतच; शिवाय जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाल्यामुळे अनेक विकसनशील देशांना त्या लशींचं वाटपही चीनने केलं आहे. बहारीन, सेशेल्स, संयुक्त अरब अमिराती आदी देशांचा त्यात समावेश आहे; मात्र तरीही त्यातल्या अनेक ठिकाणी कोरोना संसर्गग्रस्तांचे आकडे वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे चीनच्या लशी वापरलेल्या काही देशांनी आता फायझर कंपनीने तयार केलेल्या लशीचे डोस देण्यास सुरुवात केली आहे. 'आज तक'ने 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या हवाल्याने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

'व्यापक पातळीवर लसीकरण करूनही जेव्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तेव्हा जोखमीच्या गटात असलेल्या नागरिकांना फायझर-बायोएनटेक कंपनीच्या लशीचा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे,' असं बहारीनमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

'आतापर्यंत बहारीनमधल्या 60 टक्क्यांहून अधिक नागरिकांना सिनोफार्म या चीनच्या सरकारी कंपनीने विकसित केलेल्या लशीचं लसीकरण करण्यात आलं आहे. गंभीर आजार असलेल्या, लठ्ठ असलेल्या, तसंच 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना आधीच्या लसीकरणानंतर सहा महिन्यांनी फायझर-बायोएनटेक या कंपनीची लस देण्याची शिफारस करण्यात आली आहे,' असं बहारीनच्या आरोग्य विभागाचे अवर सचिव वलीद खलीफा अल मानिया यांनी सांगितलं.

'आताच्या लाटेत ज्या 90 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, त्यांना लस देण्यात आलेली नव्हती,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच, 'अजूनही चीनची लस उपलब्ध आहे; मात्र ज्यांनी आतापर्यंत कोणतीच लस घेतलेली नाहीये, त्यांना फायझर-बायो-एनटेकचीच लस दिली जात आहे,' असंही मानिया यांनी सांगितलं.

चीनच्या या दोन्ही लशी निष्क्रीय विषाणूच्या आधारे अर्थात इनॅक्टिव्हेटेड व्हायरस (Inactivated Virus) टेक्नॉलॉजीच्या आधारे विकसित केलेल्या आहेत. चीनच्या लशींच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये (Clinical Trials) मध्य-पूर्वेतले 40 हजार 382 जण सहभागी झाले होते. त्यातल्या बहुतांश व्यक्ती संयुक्त अरब अमिरातीतल्या होत्या. गंभीर आजारी व्यक्तींमध्ये चीनच्या लशी किती प्रभावी आहेत, याचा क्लिनिकल डेटा (Clinical Data) कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

लक्षणं दिसणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये सिनोफार्म (Sinopharm) लस 78 टक्के प्रभावी असल्याचं जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये 26 मे रोजी प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटलं आहे. 60 वर्षांवरच्या, तसंच गंभीररीत्या आजारी असलेल्यांमध्ये या लशी किती उपयोगी ठरतात, याबद्दलची माहिती त्यात नाही.

सर्बियामध्येही (Serbia) याबद्दलचं एक संशोधन झालं आहे; मात्र त्याबद्दलची माहिती अद्याप प्रकाशित झालेली नाही. या संशोधनात चीनची लस घेतलेल्या 150 जणांचा सहभाग होता. त्यातल्या 29 टक्के जणांच्या शरीरात लस घेऊनही अँटीबॉडीज विकसित झाल्याच नाहीत, असं संशोधनात आढळलं आहे. तसंच, त्यापैकी 10 जणांना कोविड-19ची लागणही झाली.

'सिनोफार्मची लस प्रतिकारशक्ती (Immunity) विकसित करण्यास पुरेशी सक्षम नाही. वयोवृद्ध नागरिकांमध्ये ही लस फारशी प्रभावी दिसत नाही,' असं बेलग्रेड युनिव्हर्सिटीतल्या संशोधक डॉ. ओल्गिका जुकोर्विच यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितलं.

दरम्यान, या संदर्भात सिनोफार्म या कंपनीला विचारलेल्या प्रश्नांवर कंपनीकडून कोणतंच उत्तर देण्यात आलं नाही. तसंच आपली लस किती प्रभावी आहे, याबद्दल कंपनीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचंही कंपनीने सार्वजनिकरित्या उत्तर दिलेलं नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी मात्र चीनच्या (China) बदनामीचा हा प्रयत्न असल्याचं मत व्यक्त केलं. सिनोफार्मच्या लसीकरणानंतरही सेशेल्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याच्या अनुषंगाने तिथे लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्या लेखावर प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सिनोफार्मच्या तिसऱ्या टप्प्यांतल्या चाचण्यांनंतर आपल्या प्राथमिक अहवालात संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) सरकारने डिसेंबर महिन्यात असं जाहीर केलं होतं, की सिनोफार्मची लस आजारी व्यक्तींमध्ये 86 टक्क्यांपर्यंत, तर मध्यम ते गंभीर आजारी रुग्णांमध्ये 100 टक्के प्रभावी दिसत आहे. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अॅलेक्झांडर वूसिक, दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतूम आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते आदी काही नेत्यांनी जाहीरपणे सिनोफार्मची लस टोचून घेतली आहे.

सेशेल्समध्ये (Seychells) 65 टक्के नागरिकांचं लसीकरण होऊनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असल्याचं दिसत आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही किंवा केवळ पहिला डोस घेतला आहे, अशांचा यात समावेश असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे सेशेल्सच्या आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना तिसरा डोस देण्याबद्दल विचार केला जात आहे.

संयुक्त अरब अमिरातीमधल्या ज्या नागरिकांच्या शरीरात दोन डोस घेऊनही अँटीबॉडीज (Antibodies) तयार झाल्या नाहीत, अशा नागरिकांना सिनोफार्मचाच तिसरा डोस दिला जात असल्याचं मार्चमध्ये जाहीर करण्यात आलं होतं. ज्यांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना फायझरची लस दिली जात आहे. दुबईत सिनोफार्मचे दोन डोस झाल्यानंतर फायझर-बायोएनटेकच्या लशीचा तिसरा डोस दिला जात आहे.

बहारीनमध्ये (Baharain) 47 टक्के नागरिकांचं, अमेरिकेत 41 टक्के जणांचं, तर ब्रिटनमध्ये 38 टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालं आहे. बहारीनमध्ये सध्या दर 10 लाख लोकसंख्येमागे 12 जणांचा मृत्यू होत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला, तर भारताच्या तुलनेत हे प्रमाण पाच पट अधिक आहे. सुट्ट्या, तसंच रमजान महिना आदींमुळेही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असावी, असा बहारीनच्या प्रशासनाचा अंदाज आहे.

अनेक देश चीनकडून तंत्रज्ञान घेऊन स्थानिक पातळीवर लशींची निर्मिती करणार आहेत. या लशी प्रभावी ठरत नसल्याचं दिसत असेल, तर ते देश आता कुठलं पाऊल उचलणार, हा प्रश्न आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Corona vaccine in market