बीजिंग 27 मार्च : जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) चीनमध्ये जात कोरोनाचा (CoronaVirus) पहिला रुग्ण सापडलेल्या वुहानमध्ये पाहणी केली. संघटनेनं आपला अहवाल अद्याप सादर केला नाही. मात्र, चीननं (China) आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी बीजिंगमध्ये अनेक देशांच्या मुत्सद्दींना चीनच्या अधिकाऱ्यांनी या शोधाबाबतची माहिती दिली. याकडे WHO चा रिपोर्ट येण्याआधी चीननं दिलेली सफाई म्हणून पाहिलं जात आहे. महामारीची उत्पत्ती ही राजकीय विवादास कारणीभूत ठरली आहे. अमेरिका आणि इतर देशांनी चीनच्या प्रभाव आणि तपासणीच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर वैज्ञानिक संशोधनाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप कम्युनिस्ट देशाने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांग ताओ म्हणाले, ‘आमचे उद्दीष्ट पारदर्शकता दर्शविणे आहे. चीनने कोरोनाविरुद्ध पारदर्शक पद्धतीने लढा दिला आहे आणि काहीही लपवले नाही. WHO च्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमनं चीनच्या वुहानचा दौरा केला होता. मध्य चीनच्या वुहानमध्येच 2019 च्या शेवटी कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. यावर टीमचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. चीनमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या घटनेला एक वर्ष होऊन गेलं तरीही शास्त्रज्ञ या रोगाचं कारण शोधू शकलेले नाहीत. कोरोनामुळे जगभरात तब्बल 2.7 दशलक्ष लोकांचे बळी गेले आहेत. यावर अभ्यास केलेल्या काही शास्त्रज्ञांनी सांगितलं, की कोरोना पुढील काही वर्ष असाच राहिलं, कारण हा एक मोसमी आजार (Seasonal Disease) आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मागील आठवड्यात जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दहा टक्के वाढ झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण अमेरिका आणि यूरोपमध्ये आढळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.