मुंबई, 18 एप्रिल : कोरोना व्हारयसमुळे (Coronavirus) सर्व जगभर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या वर्षीच्या सुरुवातीला जगात कोरोनानं गंभीर रुप घेतलं. अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. अनेक देशांमध्ये नागरिकांचं युद्धपातळीवर लसीकरण (corona vaccination) सुरु आहे. तरीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. भारतामध्ये तर सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. महाराष्ट्रासह देशातील बहुतेक राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. संपूर्ण देश सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे.
भारतामध्येच नाही तर अमेरिका, ब्रिटन, ब्राझील, आणि फ्रान्स या देशांमध्येही कोरनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरना व्हायरसच्या संकटामुळे लसीकरणाच्या कार्यक्रमातही अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट संपेपर्यंत गर्भवती होणं टाळावं, असं आवाहन ब्राझील सरकारनं (Brazil Government) केलं आहे.
ब्राझीलच्या प्राथमिक आरोग्य मंत्री राफेल कामरा (Raphael Camara) यांनी या विषयावर मीडियाशी बोलताना सांगितले की कोरोनाचा नवा विषाणू अतिशय खतरनाक आहे. या विषाणूमुळे विशेषत: गर्भवती महिलांना मोठा धोका आहे. त्यामुळे महिलांनी सध्या गर्भवती होणं टाळावं.
'सध्याचा काळ महिलांनी गर्भवती होण्यासाठी अजिबात सुरक्षित नाही, असं सरकारचं मत आहे. त्यामुळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेणं आवश्यक आहे. देशातील वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिल्याचा ब्राझील सरकारनं दावा केला आहे. नव्या विषाणूंचा गर्भवती महिला आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका असल्यानं महिलांनी ही खबरदारी घ्यावी,' असं कामरा यांनी सांगितलं.
कोरोनाविरोधातील लढ्यासाठी सरकार सज्ज, आरोग्य सुविधांबाबत 2 मोठ्या घोषणा
जगात कोरोना व्हायरसमुळे सर्वात जास्त मृत्यू हे अमेरिकेत झाले असून त्यानंतर ब्राझीलचा दुसरा क्रमांक आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार 21.4 कोटी लोकसंख्येच्या ब्राझीलमध्ये आजवर 1 कोटी 37 लाखांहून जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3 लाख 65 हजार जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus