लंडन, 30 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) संपूर्ण जग हैराण झालं आहे. दिवसेंदिवस प्रकरणं वाढून आता एकूण रुग्णांचा आकडा 32 लाखांच्या वर गेला आहे, तर 2 लाखांपेक्षा अधिक बळी गेलेत. या व्हायरसचा नाश करण्यासाठी उपचार अद्याप सापडले नाहीत. तर त्यात आता लहान मुलांमध्ये (children) नवीन लक्षणं दिसून आलीत.
ब्रिटनमधील मुलांचे ओठ निळे (blue lips) होत आहेत, तर शरीर पिवळं (yellow body) होत आहे. इंग्लंडच्या पॅनेडेमिक इन्टेसिव्ह केअर सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 आठवड्यात लंडन आणि यूकेच्या इतर क्षेत्रातील लहान मुलांध्ये अशी लक्षणं दिसून येत आहेत. हा कोरोनाव्हायरस नाही, मात्र त्याचासारखाच महाभयंकर व्हायरस असू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
हे वाचा - कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, 20 दिवसांच्या बाळाला झाली लागण
यूकेतील मुलांमध्ये SARS-CoV-2 संबंधित सिंड्रोम दिसून येत आहे. पुढे जाऊन हा महासाथीचं रूप घेऊ शकतो, अशी चिंता सोसायटीने व्यक्त केली आहे,
ज्या मुलांमध्ये ही लक्षणं दिसून आलीत, ते सर्व कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आहेत. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची सर्वसामान्य लक्षणं अजिबात नाहीत. डॉक्टरांच्या मते, ही मुलं कोरोनाव्हायरसने संक्रमित नसून दुसऱ्या व्हायरसने संक्रमित झालेली असावीत.
ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजनचे अध्यक्ष रमेश मेहता यांनी CNN News18 ला सांगितलं, "या मुलांच्या रक्ताचे नमुने गंभीररित्या कोरोना संक्रमिताच्या नमुन्यांच्या अहवालाशी मिळतेजुळते आहेत. आता हा कोविड-19 आहे की दुसरा व्हायरस याबाबत अद्याप काही सांगू शकत नाही. मात्र अशी 25 ते 30 प्रकरणं आढळलीत आणि सर्वात जास्त लंडनमध्येच आहेत"
हे वाचा - Coronaविरोधी लढ्यात मुक्या जीवांची मदत, लवकरच कुत्रा ओळखणार कोरोनाग्रस्त व्यक्ती
तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांमध्ये अशी भयावह लक्षणं दिसणं चिंताजनक आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा, असा सल्ला देण्यात आला आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड