मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

भारताने दिली जगातील पहिली Nasal Vaccine; Bharat Biotech च्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी

भारताने दिली जगातील पहिली Nasal Vaccine; Bharat Biotech च्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या मेड इन इंडिया लशीचा मार्ग मोकळा.

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या मेड इन इंडिया लशीचा मार्ग मोकळा.

भारत बायोटेकने तयार केलेल्या देशातल्या पहिल्या नेझल म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला केंद्राने परवानगी दिली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

दिल्ली, 06 सप्टेंबर : तब्बल दोन वर्षांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही जगभरातलं कोरोनाचं संकट पूर्णतः कमी होत नाही आहे. भारतातदेखील सर्व प्रौढ नागरिकांना बूस्टर डोस दिला जात असतानाही दररोज मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळून येत आहेत. या सगळ्यातच आता एक चांगली बातमी समोर आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) देशातल्या पहिल्या नेझल (India’s first Nasal Vaccine) म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला परवानगी दिली आहे. भारत बायोटेक कंपनीने (Bharat Biotech Intra Nasal Vaccine) या लशीची निर्मिती केली आहे. ही जगातील पहिली लस असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे.

भारत बायोटेकने (Bharat Biotech) या लशीची पहिला डोस, दुसरा डोस आणि बूस्टर डोस अशा सर्व प्रकारच्या वापरासाठी चाचणी केली आहे. या इंट्रानेझल लशीची (Intra Nasal Vaccine) तिसरी क्लिनिकल चाचणी 15 ऑगस्ट रोजी पूर्ण झाली होती. पहिले दोन डोस म्हणून चाचणी यशस्वी झाल्यानंतर, बूस्टर डोस म्हणून या लशीची चाचणी घेण्यात आली. कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींवरच बूस्टर डोस म्हणून नेझल लशीची चाचणी घेण्यात आली होती.

भारत बायोटेकने या लशीच्या पहिल्या दोन डोससाठी संपूर्ण देशभरात 14 ठिकाणी चाचण्या घेतल्या होत्या. ही लस प्री-क्लिनिकल टॉक्सिसिटी स्टडीजमध्ये सुरक्षित, इम्युनोजेनिक आणि चांगल्या प्रकारे काम करणारी असल्याचं दिसून आलं. याच नेझल लशीची बूस्टर डोस (Nasal Vaccine as booster dose) म्हणून एकूण 9 ठिकाणी चाचणी घेण्यात आली होती.

हे वाचा - कोरोनातून सुटका नाहीच? महाराष्ट्रात आढळलेल्या Omicron BA.5 Variant बाबत सर्वात धक्कादायक माहिती समोर

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे पाऊल म्हणजे ‘बिग बूस्ट’ असल्याचं म्हटलं आहे. “भारत बायोटेकच्या ChAd36-SARS-CoV-S COVID-19 या नेझल लशीला परवानगी (Nasal Vaccine against Covid-19) मिळाली आहे. ही लस कोरोनाच्या 18 वर्षांवरच्या गंभीर लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांसाठी वापरता येईल", असं ट्विट त्यांनी केलं आहे.

"ही नेझल लस कोरोना महासाथीविरोधात आपली सुरू असलेली लढाई आणखी मजबूत करील. भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविड-19 विरुद्धच्या लढाईत विज्ञान, संशोधन आणि विकास तसंच मानव संसाधनांचा वापर केला आहे. विज्ञान-आधारित दृष्टिकोनाने आपण कोविड-19 वर मात करणार आहोत", असंही मनसुख मांडवीय यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे वाचा - 'ब्रेनडेड' रुग्णाचे अवयव काढायला जाताच अचानक 'मृतदेह'...; डॉक्टरांनाही फुटला घाम

गेल्या वर्षी केंद्र सरकारने कोरोना लशीवर अधिक वेगाने काम करण्यासाठी ‘कोविड सुरक्षा मिशन’ची (Covid Suraksha Mission) सुरुवात केली होती. यातूनच देशात कोरोनावर अधिक वेगाने संशोधन आणि लसनिर्मिती होत आहे. देशातल्या नागरिकांसाठी सुरक्षित, प्रभावी, स्वस्त आणि सुलभ अशी कोविड प्रतिबंधात्मक लस तयार करणं हे या मिशनचं मुख्य उद्दिष्ट आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Vaccine