हैदराबाद, 22 जून: मेड इन इंडिया कोरोना लस कोवॅक्सिनच्या (Covaxin) तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचा अहवाल जारी झाला आहे. ही लस 77.8% टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. भारतातच तयार करण्यात आलेली ही कोरोना लस हैदराबादच्या भारत बायोटेकमार्फत (Bharat biotech) ही लस विकसित करण्यात आलेली आहे. सध्या देशात डेल्टा प्लस कोरोनाचं संकट आहे. महाराष्ट्रात याचे 21 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोवॅक्सिन लस डेल्टा प्लस वेरिएंटवर प्रभावी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान याबाबत आता अभ्यास केला जाणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये (NIV) मध्ये डेल्टा प्लस वेरिएंटवर कोवॅक्सिन किती प्रभावी आहे, याचं संशोधन होणार आहे. हे वाचा - चिंताजनक! महाराष्ट्रावर आता Delta Plus कोरोनाचं संकट; 6 जिल्ह्यांत सापडले रुग्ण हा व्हेरिएंट घातक समजला जात आहे. कारण लशीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज (Antibodies) आणि नैसर्गिक संसर्गामुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती (Immunity) या दोन्ही गोष्टी निष्प्रभ ठरवण्याची क्षमता या डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जर ही लस डेल्टा प्लस वेरिएंटवर प्रभावी ठरली तर हे खूप मोठं यश असेल. काय आहे डेल्टा प्लस कोरोना? डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा ‘बी1.617.2’ याचंच रौद्र रुप आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच जबाबदार होता. व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही पद्धतचही डेल्टा प्लसपुढे निष्प्रभ ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. हे वाचा - लस आणि रोगप्रतिकारशक्तीही ठरणार निकामी?कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटबाबत खुलासा दिल्लीतील सीएसआयआर- इन्स्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) शास्रज्ञ विनोद स्कारिया यांनी रविवारी याबद्दल ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं,‘ हे म्युटेशन स्पाईक प्रोटीन SARS-CoV-2 मध्ये म्युटेशन झाल्यामुळे माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये तो प्रवेश करू शकतो. सध्या भारतात K417N ची व्हेरिएंट फ्रीक्वेन्सी फार नाही. हे सिक्वेन्सेस प्रामुख्याने युरोप, आशिया आणि अमेरिकामध्ये सापडले आहेत.’ या वर्षी मार्चमध्ये पहिला सिक्वेन्स युरोपमध्ये सापडला होता. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. 15 मे पासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण रत्नागिरी - 9 जळगाव - 7 मुंबई - 2 पालघर - 1 सिंधुदुर्ग - 1 ठाणे - 1
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







