नवी दिल्ली, 18 जानेवारी: जगभरातील अनेक देशांमध्ये आता ‘कोविड 19’ (Covid 19) साथीच्या रोगावर लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. सहा ते आठ महिन्यांच्या अथक संशोधनानंतर काही अमेरिका, रशिया, भारत अशा काही मोजक्या देशांना कोरोना विषाणूवरील लस (Corona Virus Vaccine) विकसित करण्यात यश आलं आहे. अनेक देशांनी या लशीची मागणी केली आहे.
कोणतीही लस बाजारात दाखल करण्यापूर्वी त्या लशीची सुरक्षितता आणि गुणवत्ता तपासण्यासाठी अनेक कठीण निकष पुर्ण करावे लागतात. अनेक चाचण्या घ्याव्या लागतात. मात्र ‘कोविड 19’चा जगभर झालेला फैलाव लक्षात घेता, काही लशींना आपत्कालीन स्थितीत काही अटींमध्ये शिथिलता देऊन परवानगी देण्यात आली आहे. अशा काही लशींचा जगभरात पुरवठा केला जात आहे.
न्युज18ने दिलेल्या वृत्तानुसार, देशात आता लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लशीच्या चाचण्यांसंबंधित सर्व माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी डॉक्टर आणि शास्त्रज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेनं केली आहे. यामुळं वैज्ञानिक आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना लसीकरण करताना लोकांना व्यवस्थित माहिती देता येईल, लशीचं व्यवस्थापन करतानाही योग्य व्यवस्था करता येईल.
या संदर्भात प्रोग्रेसिव्ह मेडिकोज अँड सायंटिस्ट्स फोरमनं (Progressive Medicos and Scientists forum) रविवारी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, भारतात आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या दोन्ही कोविड लसींच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांची (Clinical Trials) सर्व माहिती जेव्हा उपलब्ध करावी. जेणेकरून त्याचं पारदर्शक मूल्यांकन करता येईल. तसेच तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आपत्कालीन वापरासाठीची पुन्हा परवानगी घ्यावी, असंही या संघटनेनं म्हटलं आहे.
शिवाय लशीच्या चाचण्यांसंबंधित सर्व माहिती खुली करायला हवी, जेणेकरुन शास्त्रज्ञ आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना लशीबाबत सर्व माहिती मिळेल, आणि ते लस निवडीबाबत लोकांनाही मार्गदर्शन करू शकतील. ‘लसीकरणामुळे विमान प्रवासावर येणारे निर्बंध, कोणतीही भीती, जबरदस्ती किंवा कोणताही विपरीत परिणाम याचं दडपण न घेता, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्याला हवा तो पर्याय निवडण्याची मुभा असावी, असंही या फोरमनं म्हटलं आहे.
काही देशांमध्ये आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी, स्वयंसेवक, वैद्यकीय तज्ज्ञ यांना ‘कोविड 19’ ची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अशी कोणतीही अट देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर असू नये, अशी मागणीही या फोरमनं केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Vaccination