नवी दिल्ली 01 डिसेंबर : जगभरात ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतात कोविडशील्ड लस (Covishield Vaccine) बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांचे विधानही आले आहे. पूनावाला म्हणाले की, कोविडशील्ड लस नवीन प्रकाराविरूद्ध (New Variant of Coronavirus) किती प्रभावी आहे हे येत्या २-३ आठवड्यांत कळेल. अशा परिस्थितीत, आवश्यक असल्यास ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस देणंही शक्य आहे.
NDTV या वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अदार पूनावाला म्हणाले, 'ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील संशोधन करत आहेत. त्यांच्या संशोधनाच्या आधारे आम्ही एक नवीन लस बनवण्याचा विचार करू शकतो, जी बूस्टर डोस म्हणून काम करेल. संशोधनाच्या आधारे, आम्ही लसीचा तिसरा आणि चौथा डोस देण्याबाबत निर्णय घेण्यास सक्षम होऊ. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की ओमिक्रॉन प्रकाराविरोधात लढण्यासाठी विशिष्ट लसच आवश्यक आहे, हे गरजेचं नाही.
पूनावाला म्हणाले की बूस्टर डोसची आवश्यकता असल्यास, कंपनीकडे आधीच पुरेसे डोस आहेत, जे त्याच किंमतीत प्रदान केले जातील. आदर पूनावाला म्हणाले, “आमच्याकडे लाखो डोस स्टॉकमध्ये आहेत. आम्ही भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 20 कोटी डोस आरक्षित केले आहेत. जर सरकारने बूस्टर डोस जाहीर केला, तर आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसी आहेत. मात्र सध्या प्राधान्याने कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतलेल्याचं लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की अस्तित्वात असलेल्या लसी ओमिक्रॉन विरूद्ध काही संरक्षण प्रदान करणार नाहीत असा कोणताही पुरावा नाही. गेल्या वर्षभरात नवीन प्रकार दिसू लागले असूनही लसींनी गंभीर आजारांपासून अत्यंत उच्च पातळीचे संरक्षण प्रदान केले आहे, असे विद्यापीठाने मंगळवारी सांगितले. ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, ओमिक्रॉनने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कारण त्यात म्यूटेशनची संख्या जास्त आहे.. ही डेल्टा प्रकारापेक्षा खूप जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona vaccine