भोपाळ 15 मे : कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या भ्रष्टाचारालाही ऊत आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा (Shortage of Remdesivir) असल्यामुळे अनेक ठिकाणी बनावट इंजेक्शनचा पुरवठाही केला गेला. असं कृत्य करणाऱ्या एका रॅकेटला मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र, त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करणं हे अनेक कारणांमुळे पोलिसांसाठी कठीण काम होऊन बसलं आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे बनावट इंजेक्शन (Fake Remdesivir Injection) घेतलेल्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांच्या फुप्फुसांमधला कोरोनाचा संसर्ग बरा झाल्याचं आढळलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
मध्यम ते तीव्र संसर्ग असलेल्या रुग्णांमध्ये रेमडेसिवीरचा (Remdesivir) वापर केल्यास त्यांचा हॉस्पिटलायझेशनचा कालावधी कमी होऊ शकतो, असं केंद्राने राज्यांना सांगितलं आहे. मृत्यूदर कमी होण्यास मात्र या इंजेक्शनचा काहीही उपयोग नसल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढीला लागल्यामुळे रेमडेसिवीरच्या मागणीत अचानक वाढ झाली. मध्य प्रदेशातल्या अगदी भोंदू डॉक्टर्सनीही या इंजेक्शनचं प्रीस्क्रिप्शन देण्यास सुरुवात केली. या परिस्थितीचा फायदा गुजरातमधल्या एका टोळीने घेतला.
या टोळीने मुंबईतून रिकाम्या व्हायल्स आणल्या. गुजरातच्या (Gujarat) वापी भागातल्या एका फॅक्टरीत त्या व्हायल्समध्ये ग्लुकोज-सॉल्ट कम्पाउंड (GlucoseSalt Compound) म्हणजे मीठ-साखरेचं पाणी भरण्यात आलं. त्या व्हायल्सवर (Vials) खोटी लेबल्स चिकटवून त्या विकण्यात आल्या. एक मे रोजी या रॅकेटमधल्या काही सदस्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मध्य प्रदेशात इंदूरमध्ये 700, तर जबलपूरमध्ये 500 बनावट इंजेक्शन्स विकली आहेत.
या सर्वांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivrajsingh Chauhan) यांना वाटतं. मात्र, खोट्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला हे सिद्ध करणं पोलिसांसाठी अवघड झालं आहे. कारण पोलिसांनी केलेल्या तपासात असं आढळलं, की इंदूरमध्ये (Indore) हे खोटं इंजेक्शन घेतलेल्या 10 जणांचा मृत्यू झाला. मात्र, हेच बनावट इंजेक्शन घेतलेल्या 100हून अधिक जणांचा संसर्ग बरा झाला आहे. मृत झालेल्या सर्वांच्या मृतदेहांचं दहन करण्यात आलं आहे. त्यामुळे बनावट इंजेक्शनच्या साइड इफेक्टमुळे (Side Effect)त्यांचा मृत्यू झाल्याचं सिद्ध करणं अशक्य आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.
'आम्ही वैद्यकीय तज्ज्ञ नाही; मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी या विषयात लक्ष घालायला हवं. केवळ मीठ-साखरेचं पाणी असूनही कित्येक रुग्ण यातून बरे झाल्याचं आढळलं आहे,' असं पोलिसांनी सांगितलं. बनावट इंजेक्शन्स नेमकी कोणत्या पेशंट्सना दिली गेली, याबद्दलची माहिती जबलपूर (Jabalpur) पोलिसांना अद्याप सापडलेली नाही. कारण हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शनसंदर्भात कोणत्याही नोंदी ठेवलेल्या नाहीत. जरबजित सिंग, सपन जैन आणि देवेश या तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा, तसंच भेसळयुक्त औषधांची निर्मिती आणि विक्रीचे आरोप ठेवण्यात आले आहेत. 'रॅकेटमधले सगळे सदस्य पकडले जाईपर्यंत तपास सुरूच राहील,' असं इंदूरचे पोलीस महानिरीक्षक हरिनारायण चारी मिश्रा यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Financial fraud, Injection