नवी दिल्ली, 16 जुलै : कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona vaccine) एक किंवा दोन्ही डोस घेऊनही ज्यांना कोरोनाची लागण (Infection) झाली आहे, त्यातील 80 टक्के (80 percent) रुग्ण हे डेल्टा व्हायरसचे (Delta Virus) असल्याचं ICMR च्या तपासात दिसून आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Third Wave) खरा धोका डेल्टा व्हायरसचा असल्याचं दिसून येत आहे. एका अभ्यासातून समोर आलेले हे निष्कर्ष संभाव्य तिसऱ्या लाटेबाबतचं धोरण ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
काय आहेत निष्कर्ष?
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या 677 नागरिकांच्या निरीक्षणातून हा सर्व्हे करण्यात आला आहे. यातील 71 जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती, 604 जणांनी कोव्हिशिल्ड घेतली होती, तर दोघांनी चीनची सिनोफार्म लस घेतली होती. यातील तीन रुग्णांचा मृत्यु झाला, तर इतर रुग्ण उपचारांनंतर बरे झाल्याचं निरीक्षण आयसीएमआरनं नोंदवलं आहे.
कोरोना होतो, पण घातक नाही
लसीकरणानंतर जरी डेल्टा व्हेरियंटची लागण झाली, तरी लसींच्या प्रभावामुळे जीवघेणा धोका निर्माण होत नसल्याचं दिसून आलं आहे. शरीरात असणाऱ्या अँटिबॉडिज डेल्टा व्हायरसशी लढण्यास सक्षम असून बहुतांश रुग्ण यातून सहिसलामत बरे होत असल्याचं दिसून आलं आहे. तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 86.09 टक्के लोक हे डेल्टा व्हेरिअंटने संक्रमित होते. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 9.8 टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज निर्माण झाली. उरलेल्या 90 टक्के जणांना किरकोळ लक्षणं दिसत होती. तर एकूण रुग्णांपैकी 0.4 टक्के नागरिकांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं.
हे वाचा - कोरोनाचा कहर; पंतप्रधान मोदींनी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला 'हा' सल्ला
महाराष्ट्र आणि केरळमध्ये चिंता
महाराष्ट्र आणि केरळमधील रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र पुन्हा निर्माण झालंय. गेल्या जानेवारी महिन्यात अशाच प्रकारे दुसऱ्या लाटेची लक्षणं दिसायला सुरुवात झाली होती. आता तिसऱ्या लाटेची ही चाहूल असल्यामुळे नागरिकांना सावध राहावं, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.