लखनऊ 30 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (2nd Wave of Corona) माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर आल्या. नदीमध्येच कोरोना रुग्णांचे (Corona Pateints) मृतदेह वाहून आल्याचंही या काळात पाहायला मिळालं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं आणि मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्यानं नातेवाईकांनी ते थेट नदीत टाकल्याचं सांगण्यात आलं. या मुद्द्यावरुन विरोध पक्षानं सरकारला घेरलं. यानंतर नदीमध्ये मृतदेह टाकण्यापासून अडवण्यासोबतच याठिकाणी पोलिसही तैनात करण्यात आले. याचदरम्यान आता उत्तर प्रदेशच्या बलरामपूर (Balrampur) जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन युवक एक मृतदेह पुलावरुन राप्ती नदीमध्ये फेकताना दिसत आहेत. यातील एकानं पीपीई किट घातलं आहे.
ही घटना कोतवाली नगर क्षेत्रातील राप्ती नदीवरील सिसई घाट पुलावरील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना सीएमओ डॉ. विजय बहादुर सिंह यांनी सांगितलं, की राप्ती नदीमध्ये फेकण्यात येत असलेला हा मृतदेह सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शोहरतगडमधील रहिवासी असलेल्या प्रेमनाथ मिश्रा यांचा आगे. 28 मे रोजी प्रेमनाथ यांचं कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झालं होतं. सीएमओनं सांगितलं, की कोरोना नियमांचं पालन करत हा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये मृतदेह राप्ती नदीमध्ये फेकला जात असल्याचं दिसत आहे. याप्रकरणी कोतवाली नगरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हा मृतदेह नदीमध्ये फेकला जात असताना शेजारुन जात असलेल्या काही लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. व्हिडिओमध्ये दिसणारे मृतदेह पाण्यात फेकणारे हे दोन युवक कोण आहेत, याचा तपास सुरू आहे. या दोन्ही युवकांमधील एकानं पीपीई किट घातलं आहे. त्यामुळे हादेखील तपासाचा विषय आहे, की पीपीई किट घालणारा युवक आरोग्य विभागाचा कर्मचारी आहे, की इतर कोणी. आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 5000 रुपये देण्याची व्यवस्था सरकारनं केली आहे. मात्र, असं असतानाही मृतदेह नदीत फेकणं ही गंभीर घटना मानली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.