ज्योत्स्ना गंगाणे/मुंबई, 30 जून : देशात एकिकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाणही वाढतं असल्याने थोड्याफार प्रमाणात आता आणखी एक दिलासादायक बातमी म्हणजे आता भारतातील सर्वात वयोवृद्ध कोरोना रुग्णाने (corona patient) कोरोनाला हरवलं आहे. 103 वर्षांच्या व्यक्तीने कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे.
सुखा सिंह छाबरा (sukha singh chabra) असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांना ताप आला होता आणि श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळे 2 जूनला त्यांना ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलं.
सुखा सिंह यांचं वय पाहता त्यांना सुरुवातीला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मात्र 14 दिवसांतच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. सुखा सिंह यांच्यावर 24 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.
विशेष म्हणजे सुखा सिंह शंभरी पार असूनही त्यांना ब्लड प्रेशर किंवा डायबेटिज असा कोणताही आजार नाही. त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली, त्यातूनही ते बाहेर पडले आणि कोरोनामुळे खचलेल्या इतर कोरोनाग्रस्तांसाठी प्रेरणा ठरलेत. वयाने काहीही फरक पडत नाही. आजाराशी लढण्याची ताकद आणि जगण्याची जिद्द असेल तर आपण कोणत्याही आजारावर मात करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
सुखा सिंह यांनी कोरोनावर मात केल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबाइतकाच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही झाला. सर्वांनी मिळून सुख सिंह यांचं कौतुक केलं आहे.
भारतात आता एकूण 566840 रुग्ण आहेत. त्यापैकी 334822 रुग्ण बरे झालेत. तर 16893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 215125 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर महाराष्ट्राचा एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचला आहे. पण त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 174761 पैकी 90,911 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज दिवसभरात 4878 रुग्ण नव्याने दाखल झाले, तर 1951 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. गेल्या 48 तासांत 95 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 150 असे 245 कोरोना मृत्यू आज राज्यात नोंदले गेले.