मुंबई, 16 नोव्हेंबर: कोरोना (Corona) आणि लॉकडाउन (Lockdown) यामुळे रोजगार क्षेत्रात मंदीची लाट आली होती. लाखो जणांच्या नोकऱ्या हिरावल्या गेल्या. अनेक जण बेरोजगार झाले. हातावर पोट असणाऱ्यांचे छोटे व्यवसाय बंद पडले. अनेक छोट्या उद्योगांनाही टाळं लागलं. संपूर्ण जगभरात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अगदी मोठ्या कंपन्यांमध्ये बड्या अधिकारपदांवर काम करणाऱ्यांनाही अचानक राजीनामा द्यायला सांगण्यात आलं. असं असलं तरी याच परिस्थितीत एक विरोधी चित्रही सध्या दिसत आहे. ते म्हणजे अनेक जण स्वत:हून हातात असलेल्या कायमस्वरूपी नोकऱ्या सोडत (Attrition rate in Companies) आहेत. यामागच्या कारणांचा वेध घेणारं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलं आहे. वर्क फ्रॉम होम (Work from Home) संकल्पनेमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचं खासगी आयुष्यही असतं याचाच कंपन्यांच्या मालकांना विसर पडलेला दिसतो. घरी असताना आपल्या कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करत राहिलं पाहिजं अशी त्यांची अपेक्षा असते. अतिकामामुळे अर्थातच कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यांचं खासगी आयुष्य, त्यांतली सुख-दु:खं, जबाबदाऱ्या या सगळ्यांचा घरातून काम करताना मेळ जमवताना प्रचंड तणाव येत आहे. त्यामुळेच हा वादाचा मुद्दा ठरला आहे. काम की खासगी आयुष्य, यांतून अनेकांनी खासगी आयुष्याची निवड केलेली दिसते. खरं तर मंदीचा काळ सुरू असला तरीही अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी, कामगार काम करत होते. आहे त्या पगारावर किंवा पगारवाढ होत नसली किंवा अन्य काही सोयीसुविधा मिळत नसल्या तरीही कर्मचारी काम करत होते; पण याच काळात कर्मचाऱ्यांचा विचार करण्याऐवजी कंपन्यांचे मालक कंपनीचाच जास्त विचार करत असल्याचं चित्र दिसलं. अनेक वेळा कंपन्यांच्या मीटिंगमध्ये कंपनीची कामगिरी (Performance in Company) कशी यावर चर्चा होते, ते सगळ्यांसमोर दाखवलंही जातं; पण कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा कंपन्यांच्या मालकांना /HR ला त्याची काहीही काळजी नसल्याचं स्पष्ट झालं. कंपन्यांमध्ये फक्त अहोरात्र काम करणारे ओझ्याचे बैलच हवे आहेत, असं एकूण चित्र दिसलं. अशा परिस्थितीत मानसिक तणावात काम करण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा असा विचार करून मोठ्या प्रमाणात कर्मचारी नोकरी सोडून बाहेर पडले. हे Dream आहे की Job? 14 दिवसांची नोकरी, 9 लाख रुपये पगार! कोरोना आणि लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनं अनेकांनी त्यांच्या आयुष्याचा नव्यानं विचार करायला सुरुवात केली, असं काही सर्व्हे आणि सोशल मीडियावरच्या चर्चेतून दिसून आलं. त्यांच्या आयुष्यात नोकरीचं स्थान नेमकं काय आहे आणि नोकरीबाहेर त्यांचं जग काय आहे याचा अनेकांनी नव्यानं विचार केला. नोकरीपेक्षाही आपल्याला इतर आयुष्य आहे, आपल्याला खरंच वेळ मिळतो आहे का आणि मिळालेला वेळ आपल्याला हवा तसा आपण घालवू शकतो का, यावर अनेकांनी पुन्हा विचार केला. आपली नोकरी आणि आपली आवड किंवा छंद यांचा काहीही संबंध नसलेली नोकरी अनेक जण करतात. केवळ पैसे चांगले मिळतात म्हणून ही नोकरी वर्षानुवर्षे केली जाते; पण कोरोना काळात अनेकांना आपला आनंद वेगळाच असल्याचा शोध लागला. पैशांपेक्षाही छंद किंवा आवड जोपासणं जास्त आनंदाचं असल्याचं काहींना जाणवलं. हाच छंद रोजगारामध्ये बदलला किंवा त्याच्याशी निगडित नोकरी केली तर पैसे कमी मिळाले तरी आपण अधिक आनंदी होऊ, सुखी होऊ असं अनेकांना समजलं. त्यामुळे अनेकांनी आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला. नोकरीपेक्षाही आपलं कुटुंब अधिक महत्वाचं असल्याचं अनेकांना या काळात जाणवलं.एरवी कामानिमित्त बराच काळ घरापासून, कुटुंबापासून दूर राहिलेल्या अनेकांना या काळात आपल्या कुटुंबाचं महत्त्व समजलं. आपण जास्त काळ कुटुंबाबरोबर असतो ते क्षण किती आनंदाचे असतात याची जाणीव झाल्यामुळे प्राधान्य बदललं. नोकरीच्या धबडग्यात आपल्या हातून काहीतरी निसटून जात आहे याची जाणीव झाल्यामुळेही राजीनामा देण्याचं प्रमाण वाढलं. या सगळ्या ग्रेट रेसिग्नेशन प्रकारामुळे अर्थात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या सोडण्याच्या प्रकारामुळे जगभरातल्या कंपन्यांना धक्का बसला आहे. या सगळ्या कारणांबरोबरच कंपन्यांकडून कामाबाबत केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा हेही कारण महत्त्वाचं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांकडून अति काम करून घेणं यात कंपन्यांना काहीच चुकीचं वाटत नाही. त्यामुळे या कामाच्या अतिताणामुळे वैतागून कित्येक लोकांनी चांगल्या नोकऱ्या सोडल्या. ही सगळी कारणं पाहता, ताणतणावाला सामोरं जाताना आपलं कुटुंब, छंद, विरंगुळा आणि स्वत:चं खासगी आयुष्य याचं महत्त्व लोकांना कळून आल. नोकरीपलीकडेही जग असतं याचा अनुभव आला. त्यामुळे या स्वानंदासाठी गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांवर अनेकांनी पाणी सोडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.