नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून सातत्यानं वाद सुरू आहेत. साधारणपणे एखाद्या व्यक्तीनं दुसरी कंपनी खरेदी केली तर ती व्यक्ती आपल्या सोयीसाठी नवीन कंपनीत एखादा दुसरा बदल करते. हे बदल करताना कंपनीचे ग्राहक आणि कर्मचारी नाराज होणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जाते. कारण, कंपनीशी संबंधित हे दोन घटक नाराज झाले तर याचा थेट परिणाम कंपनीच्या भविष्यावर होऊ शकतो.
मात्र, ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे नवीन सर्वेसर्वा एलॉन मस्क याला अपवाद ठरत आहेत. कंपनीचा कारभार हाती येताच मस्क यांनी कशाचीही पर्वा न करता कंपनीत विविध बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. या बदलांचा परिणाम म्हणून ट्विटरला आपली ऑफिसेस बंद करण्याची वेळ आली आहे.
हे ही वाचा : 2023 मध्ये ‘या’ सेक्टरमध्ये लाखोंना नोकरीच्या संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती
ट्विटरमधील कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीमाना सत्र सुरू केलं आहे. ट्विटरच्या सात हजार 500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे किंवा त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, मस्क यांनी कर्मचार्यांना ‘जास्त तास काम करणं किंवा नोकरी सोडणं’ या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्यास सांगितलं होतं. मस्क यांच्या अल्टिमेटमनंतर अपेक्षेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे कंपनीला सोमवारपर्यंत आपली कार्यालयं बंद ठेवावी लागली आहेत. सामूहिक राजीनाम्यामुळे कोणत्या कर्मचार्यांना आता ट्विटर कार्यालयांच्या आवारात प्रवेश द्यावा याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
गोंधळाच्या स्थितीत असलेल्या ट्विटरच्या व्यवस्थापनानं आपल्या कर्मचाऱ्यांना एक मेमो पाठवून सोमवारपर्यंत कार्यालयं बंद असल्याची माहिती दिली. न्यूज एजन्सी एपीएफ आणि ब्लूमबर्गनं हा मेमो प्रसिद्ध केला आहे. “अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ट्विटर कार्यालयाच्या इमारती तात्पुरत्या बंद ठेवल्या जाणार आहेत. प्रवेशाचे सर्व बॅज सस्पेंड केले गेले आहेत.
सोमवारी, 21 नोव्हेंबर रोजी कार्यालये पुन्हा सुरू होतील. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. कृपया सोशल मीडियावर, प्रेस किंवा इतरत्र कंपनीच्या गोपनीय माहितीबाबत चर्चा न करता कंपनी धोरणाचं पालन करा. भविष्यात तुमच्यासोबत काम करण्यासाठी कंपनी उत्सुक आहे,” असा हा मेमो आहे.
टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ असलेल्या एलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात 44 अब्ज डॉलर्स मोजून ट्विटर खरेदी केलं आहे. त्यानंतर त्यांनी कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जवळपास अर्धे कर्मचारी कामावरून काढून टाकले. याशिवाय, शिल्लक राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजाही टाकला. त्यामुळे काही कर्मचारी कार्यालयांमध्येच झोपत होते.
हे ही वाचा : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात का? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी आणि कमवा लाखो रुपये
एवढेच नाही तर ‘वर्क फ्रॉम होम’ पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे. मस्कच्या या धोरणामुळं कर्मचाऱ्यांनी नाराज होऊन सामुहिक राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीमुळं ट्विटर सामान्यपणे कामकाज सुरू ठेवण्यास सक्षम असेल का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.