नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : इंटरनेट हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेलं आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आणि डेटा कनेक्टिव्हिटी अतिशय उपयुक्त ठरत आहे. या दोन्ही गोष्टींशिवाय आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड डेली लाईफची कल्पनाही करू शकत नाही. काहीजण तर दिवसातील कितीतरी तास स्मार्टफोन बघण्यात आणि गेम खेळण्यात घालवतात. विद्यार्थी आणि बेरोजगार व्यक्ती तर आजकाल गेमिंगमध्ये जास्त व्यस्त असतात.
भारतामध्ये गेमिंग करणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे. याच गेमिंगचा उपयोग करून भविष्यात अनेकजण नोकरी मिळवू शकतात. 2023 या आर्थिक वर्षामध्ये देशातील गेमिंग इंडस्ट्रीमध्ये एक लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. गुरुवारी एका अहवालात याबद्दल माहिती देण्यात आली. या माहितीनुसार, प्रोग्रॅमिंग, टेस्टिंग अॅनिमेशन आणि डिझाइनसह सर्व डोमेनसाठी गेमिंग इंडस्ट्रीमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ‘झी बिझनेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : बेरोजगारांसाठी मोठी खूशखबर! तब्बल 10 वर्षांनंतर सरकारनं जाहीर केली ‘ही’ भरती; तुम्ही आहेत का पात्र?
टीमलीज डिजिटल या टेक कंपनीनं ‘Gaming: Tomorrow’s Blockbuster’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, गेमिंग सेक्टरमध्ये 20 ते 30 टक्के वाढ नोंदवली जाईल. याच क्षेत्रात पुढील आर्थिक वर्षात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपातील सुमारे एक लाख नोकऱ्या निर्माण होतील.
गेमिंग कम्युनिटीच्या बाबतीत, चीननंतर भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात 48 कोटी गेमिंग कम्युनिटी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मागणीत वाढ झाली आहे. परिणामी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. गेमिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा जगात सहावा क्रमांक लागतो. जागतिक बाजारपेठेला गेमिंगच्या माध्यमातून सुमारे 17.24 लाख कोटी रुपये महसूल मिळतो. 2023 आर्थिक वर्षापर्यंत या क्षेत्रात 780 कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक (FDI) अपेक्षित आहे.
नवीन प्रोफाइलमध्ये अधिक संधी
अहवालानुसार, सध्या या क्षेत्रातून 50 हजार लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. यामध्ये प्रोग्रॅमर आणि डेव्हलपर्सची संख्या 30 टक्के आहे. पुढील वर्षापर्यंत, गेम डेव्हलपर, युनिटी डेव्हलपर, टेस्टिंग, अॅनिमेशन, डिझाइन, आर्टिस्ट आणि इतर भूमिकांसाठी नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील. पगाराचा विचार केला तर, गेमिंग सेक्टरमध्ये सर्वांत जास्त पगार गेम प्रोड्युसरला मिळतो. गेम प्रोड्युसरला वर्षाला 10 लाख रुपये पगार मिळू शकतो. त्यानंतर, गेम डिझायनरला वर्षाला सहा लाख रुपये, सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना 5.5 लाख रुपये पगार मिळू शकतो.
हे ही वाचा : महिन्याचा 2,18,000 रुपये पगार; अधिकारी पदांसाठी MPSC ची मोठी घोषणा; करा अर्ज
वापरकर्त्यांच्या संख्येत होणारी वाढ आणि इतर संधी यांमुळं गेमिंग सेक्टरची भरभराट होत आहे. त्यामुळेच या सेक्टरमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.