कोणतंही नवं काम करताना मनात थोडी धाकधूक असते. प्रश्न नोकरीचा (Fear in Jobs) असेल तर थोडी भीती (Fear) आणि उत्सुकता (Excitement) असतेच. नवं ऑफिस, नवे सहकारी या सगळ्या गोष्टींसोबत जुळवून घेता येईल का, असे प्रश्न आपल्याला पडतात. हे स्वाभाविक आहे. कोणत्याही नवीन कामात सुरुवातीचे दिवस खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यावरून बऱ्याच गोष्टी ठरतात. या काळात तुम्ही जे काही निर्णय घेता, सहकार्यांशी (Colleagues) तुम्ही ज्या पद्धतीने वागता, तसंच ज्या पद्धतीने तुम्ही काम करता आणि ते पूर्ण करता, हे सर्वच खूप महत्त्वाचं असतं. अशा वेळी तुम्हाला मार्गदर्शनाची (Guidance) गरज असते.
'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन' (First impression is last impression) असं म्हटलं जातं. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा हवाला देत दैनिक भास्कर वृत्तपत्रात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये फर्स्ट इम्प्रेशन का महत्त्वाचं आहे, हे सांगितलं आहे. तसंच काही टिप्ससुद्धा दिल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ या.
वातावरणाशी जुळवून घ्या
नवीन ठिकाणी कामावर रुजू झाल्यानंतर तिथली व्यवस्था आणि वातावरण बदलण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी संस्थेच्या वातावरणानुसार स्वतःमध्ये बदल घडवा आणि तो स्वीकारा. यामुळे तुमचं तिथल्या व्यक्तींशी जुळेल; मात्र असं केलं नाही, तर तिथल्या सहकाऱ्यांना तुम्ही 'मिस फिट' (Miss fit) असल्याची जाणीव करून द्याल. यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवेल आणि तिथे तुम्ही जास्त दिवस टिकणार नाही.
संस्थेत सर्वांत प्रभावशाली कोण?
तुम्ही काम करत असलेल्या संस्थेमध्ये सर्वांत जास्त प्रभावी कोण आहे, कुणाकडे सर्वांत जास्त अधिकार आहेत आणि कोणाचा पाठिंबा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो, याचा अंदाज बांधावा. तसंच तुमचे सहकारी काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, याचा विचार करावा आणि त्यात त्यांना तुम्ही कशी मदत करू शकता हे पाहावं.
Best Books: स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग 'ही' पुस्तकं नक्की येतील कामी
सकारात्मक परिणाम
संस्थेची वाटचाल योग्य दिशेने ठेवण्यासाठी (Moving) अनेक सुधारणा करण्यात येतात. या वेळी नवे काम करताना संस्थेवर आपली सकारात्मक छाप कशी पडेल याचा विचार करा. काम करताना त्यात स्वतःला झोकून द्या. कठोर परिश्रमाने ध्येय गाठा. असं केल्याने लीडर (Leaders) संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना एक नवीन ऊर्जा देऊ शकतो.
नवीन काय शिकण्याची गरज आहे?
नवीन नोकरी तर मिळाली; पण आता कामाचा वेग कसा वाढवायचा हा प्रश्न पडतो. नवीन भूमिका प्रभावीपणे पार पाडायची असेल तर काही वैयक्तिक बदलही गरजेचे असतात. हे संस्थेसाठी आणि तुमच्या विकासासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे स्वतःमध्ये कोणते बदल घडवून आणायचे आहेत, हे जितक्या लवकर समजेल तितकं चांगलं आहे. त्यामुळे नवीन कौशल्यं (Skills) आत्मसात करण्यात मागे राहू नका. स्वत:मध्ये आवश्यक ते गुण विकसित करा आणि देण्यात येणाऱ्या जबबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडा. असं केल्याने तुम्ही संस्थेमध्ये आपली एक वेगळी छाप पाडालच, तसंच तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.