सध्या देशात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत देशातल्या नागरिकांना 100 कोटी डोसेस देऊन झाले (Vaccination) आहेत. सर्व आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. `वर्क फ्रॉम होम` (Work From Home) आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. एक वर्षापेक्षा अधिक काळ `वर्क फ्रॉम होम` केल्यानंतर टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys), एचसीएल टेक्नोलॉजिज (HCL Technologies) यांसारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी (IT Companies) आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे. देशातली सर्वांत मोठी आयटी फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसनं सांगितलं, `आमच्या सुमारे 70 टक्के कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले असून, सुमारे 95 टक्के कर्मचाऱ्यांनी लशीचा (Vaccine) एक डोस घेतला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवत आहोत.` कंपनीचे वरिष्ठ एचआर अधिकारी मिलिंद लक्कड यांनी सांगितलं, `कंपनी या वर्षाअखेरीपर्यंत कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्याचा विचार करत आहे.` या वर्षाअखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस कंपनी 90 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवणार आहे. येथे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पुरेशी काळजी घेतली जाईल, असं `टीसीएस`नं यापूर्वीच सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडच्या विद्यार्थ्यांना JEE शिवाय मिळणार IIT प्रवेश? इन्फोसिस घेणार हायब्रिड मॉडेलची मदत देशातली दुसरी सर्वांत मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं सांगितलं, `आम्ही काम करण्यासाठी आता हायब्रिड मॉडेलची (Hybrid Model) मदत घेणार आहोत. कोरोना काळात लोकप्रिय झालेल्या हायब्रिड मॉडेलनुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणाहून काम करण्याची मुभा मिळते.` कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितलं, `आमच्या कंपनीच्या 86 टक्के कर्मचाऱ्यांनी लशीचा किमान पहिला डोस घेतला असून, कंपनी आता हायब्रिड मॉडेलच्या मदतीनं पुढील वाटचाल करणार आहे.` इन्फोसिसप्रमाणं मॅरिको (Marico) आणि विप्रोसारख्या (Wipro) कंपन्यादेखील हायब्रिड मॉडेलचा वापर करत आहेत. या मॉडेलमुळे कर्मचाऱ्यांच्या प्रवासाच्या वेळेत बचत, तसंच कंपनीच्या भाडेखर्चात आणि वीजबिल कपातीला मदत होत आहे. `विप्रो`चे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी 12 सप्टेंबरला ट्विट करून सांगितलं होतं, `आमच्या कंपनीचे कर्मचारी उद्यापासून म्हणजेच 13 सप्टेंबरपासून आठवड्यातून 2 दिवस ऑफिसला येतील. सर्वांचं लसीकरण झालं आहे. ते सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षाविषयक नियमांचं पालन करतात की नाही. यावर आम्ही लक्ष ठेवू.` एचसीएल टेक्नोलॉजिज आठवड्यातून दोन दिवस ऑफिसला बोलावणार एचसीएल टेक्नोलॉजिज ही दिग्गज आयटी कंपनीदेखील कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस ऑफिसमध्ये बोलावत आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना मात्र एक दिवस ऑफिसला यायला सांगितलं आहे. या वर्षाअखेरीस या योजनेला गती मिळेल, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.