मुंबई, 18 एप्रिल- आयएएस बनण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र त्यासाठीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणं खूप कठीण असतं. केरळच्या श्रीधन्या सुरेश हिनेही ते स्वप्न पाहिलं. घरची परस्थिची बेताची असूनही तिनं स्वप्न सत्यात उतरवलं. इच्छाशक्ती आणि मेहनतीची तयारी असेल, तर अशक्यही शक्य होऊ शकतं, हे श्रीधन्या सुरेश हिच्या प्रवासावरून दिसतं. आई-वडिलांच्या मजुरीवर घर चालत असताना तिनं यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. यूपीएससी परीक्षा खूप कठीण असते. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे अनेक जण नंतर परीक्षार्थींसाठी प्रेरणास्रोत बनतात. त्यांचा संघर्ष अनेकांना प्रोत्साहन देतो. अशीच एक आयएएस अधिकारी म्हणजे श्रीधन्या सुरेश. तिची घरची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची होती. तिचे आई-वडील ‘मनरेगा’मध्ये मजुरी करून आणि धनुष्य-बाण विकून चरितार्थ चालवत होते. सरकारने घर बांधण्यासाठी दिलेली जमीन त्यांच्याकडे होती. मात्र त्यावर घर बांधण्याइतके पैसै त्यांच्याकडे नव्हते. वाचा- जॉबआधीच कंपनीचं वर्क कल्चर जाणून घ्यायचंय? मग Interview ला ‘हे’ प्रश्न विचाराच मूळची केरळच्या वायनाड जिल्ह्यातली असलेली श्रीधन्या सुरेश हिने शालेय शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केलंय. त्यानंतर सेंट जोसेफ कॉलेजमधून तिने झूलॉजी विषयात पदवी घेतली. त्यानंतर कालिकत युनिव्हर्सिटीमधून तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर केरळच्या अनुसूचित जाती विकास विभागात क्लार्क म्हणून तिने काम केलं. वायनाडच्या एका आदिवासी हॉस्टेलमध्ये वॉर्डन म्हणूनही तिने काम केलं. तिथेच तिला यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. श्रीधन्याने 2016 आणि 2017मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. पहिल्या दोन्ही वेळा तिला अपयश आलं; मात्र त्यानंतर 2018मध्ये तिने तिसऱ्यांदा परीक्षा दिली व त्यात तिला यश मिळालं. यूपीएससीच्या प्रशासकीय सेवा परीक्षेमध्ये 410वा रँक मिळवून ती आयएएस बनली. दिल्लीला मुलाखतीसाठी जायचं होतं, तेव्हा तिच्याकडे पैसे नव्हते. मात्र मित्रमंडळींकडून पैसे उधार घेऊन ती दिल्लीला गेली.
केरळच्या सगळ्यात मागास जिल्ह्यातली असल्याचं श्रीधन्याचं म्हणणं आहे. तिथली कोणतीही आदिवासी व्यक्ती आजवर आयएएस बनू शकली नाहीये. आता आयएएस बनून येणाऱ्या पिढ्यांच्या समस्या दूर करून त्यांच्यासाठी प्रेरणास्थान बनण्याची इच्छा असल्याचं श्रीधन्या सांगते.केवळ अभ्यासाची तयारी व इच्छेच्या बळावर श्रीधन्याने यूपीएससीमध्ये हे यश मिळवलं आहे. तिची कहाणी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नक्कीच आदर्श ठरेल.