मुंबई, 18 जानेवारी : अमेरिकेमधील टेक्नॉलॉजी सेक्टरमधील अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. अमेरिकेत आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे या घडामोडी सुरू झाल्या आहेत. यामध्ये आता मायक्रोसॉफ्टचाही समावेश होणार आहे. माध्यमांनी मंगळवारी दिलेल्या वृत्तांनुसार, मायक्रोसॉफ्ट कॉर्पनं ह्युमन रिसोर्स आणि इंजिनीअरिंग विभागांमधील काही पदं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे.
मागणीत झालेली घट आणि जागतिक आर्थिक घडामोडींमधील बदलांमुळे अमेरिकेसह अनेक देशांमधील टेक्नॉलॉजी सेक्टर अडचणीत आलं आहे. अनेक मोठ्या कंपन्यांपाठोपाठ मायक्रोसॉफ्टनंदेखील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचं हे पाऊल असं दर्शवतं की, भविष्यात टेक सेक्टरमधील नोकऱ्या आणखी कमी होऊ शकतात. मॉर्निंग स्टार या फायनान्स कंपनीतील विश्लेषक डॅन रोमनॉफ म्हणाले, "विस्तृत दृष्टिकोनातून पाहिल्यास, मायक्रोसॉफ्टमधील कर्मचारी कपातीची दुसरी प्रलंबित फेरी असं सूचित करते की, परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही. कदाचित भविष्यात ती आणखी बिघडतच जाईल."
हेही वाचा: भारतात वाढणार Apple iPhone चे उत्पादन! जगातील 50% iPhone होतील तयार
यूके ब्रॉडकास्टर स्काय न्यूजनं सूत्रांचा हवाला देऊन वृत्त दिलं आहे की, मायक्रोसॉफ्टनं आपल्या कर्मचार्यांपैकी सुमारे पाच टक्के म्हणजे सुमारे 11 हजार पदं कमी करण्याची योजना आखली आहे. कंपनी बुधवारी (18 जानेवारी) अनेक अभियांत्रिकी विभागांतील नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे, असं वृत्त या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या हवाल्यानं ब्लूमबर्ग न्यूजनं दिलं आहे. तर, इनसाइडरनं दिलेल्या बातमीनुसार, मायक्रोसॉफ्ट एक तृतीयांश कर्मचारी कामावरून कमी करू शकते.
मागील वर्षातील इतर कर्मचारी कपातीच्या फेऱ्यांपेक्षा या वेळच्या फेऱ्या लक्षणीयरीत्या मोठ्या असतील, असं ब्लूमबर्गनं म्हटलं आहे. मायक्रोसॉफ्टनं मात्र, या वृत्तांबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.
30 जूनपर्यंत (2022) कंपनीकडे दोन लाख 21 हजार पूर्ण-वेळ कर्मचारी होते. ज्यात युनायटेड स्टेट्समधील एक लाख 22 हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 99 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
पर्सनल कॉम्प्युटर मार्केटमधील मंदीमुळे विंडोज आणि उपकरणांच्या विक्रीला धक्का बसला आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टवर आपल्या क्लाउड युनिट अझूरमधील वाढीचा दर राखण्यासाठी दबाव आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची नोंद आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यूज साइट Axios नं दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टनं अनेक विभागांमधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं.
मायक्रोसॉफ्टचे शेअर्स 24 जानेवारीला त्रैमासिक अहवाल देणार आहेत. काल (17 जानेवारी) दुपारच्या ट्रेडिंगमध्ये या शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Microsoft