बुलढाणा, 6 मार्च : बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. बारावी गणित पेपर फुटला प्रकरणात आता एसआयटी (SIT) तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. तर रविवारी पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींना देऊळगाव राजा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आतापर्यंत आरोपींची संख्या 7 वर गेली आहे. काय आहे प्रकरण? 3 फेब्रुवारी रोजी बारावीचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला, ही बातमी वाऱ्याच्या वेगाने गावभर पसरली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात हे पेपर स्थानिक पोलीस ठाण्यात आणि तिथून परीक्षा केंद्रावर पोहोचवले जातात. असं असतानाही हा पेपर सुरू होण्याआधीच फुटल्याने परीक्षा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी फोडला? याचा तपास आता सुरू झाला आहे. साखरखेडा पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून तब्बल पाच जणांना अटक केली होती. ही संख्या आता सातवर पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे या पाचपैकी दोन जण हे संस्थाचालक शिक्षक असल्याचा समोर आलं. त्यांनी एक व्हाट्सअॅपचा ग्रुप करून या ग्रुपमध्ये गणिताचा पेपर लीक केला. तब्बल 99 सभासद संख्या असलेल्या या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये हा पेपर फुटल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली. गणिताचा पेपर फोडायचा आहे, हे सर्व पूर्वनियोजित होतं, त्यामुळे पोलिसांनी या पाचही जणांवर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा, त्याचबरोबर फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. अजूनही पेपर फोडणारा मुख्य आरोपी पोलीस शोधत आहेत. एक-एक कडी जोडत पेपर फोडणाऱ्यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. वाचा - शिक्षणासाठी बेस्ट युनिव्हर्सिटी हवीये ना? मग निवड करताना ‘या’ गोष्टी असतात IMP तिकडे दुसरीकडे शिक्षण विभाग आपल्या चुका लपवण्यासाठी ज्या शिक्षकाने गणिताचा पेपर फुटला असल्याची पडताळणी केली त्यालाच कारणे दाखवा नोटीस शिक्षण विभागाकडून बजावण्यात आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक आणि पोलीस स्थानकातून प्रश्नपत्रिकांचे वितरण करणाऱ्या रनरची तडका फडकी बदली केली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर नवीन केंद्र संचालक आणि रणरची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनानंतर होणाऱ्या या बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी मोठ्या उमेदीने सामोरे जात होते. मात्र, मधेच आधी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील चुका त्यानंतर गणिताचा पेपर फुटणे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर आघात करत आहे. फुटलेला पेपर परत होईल का? याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी मोठ्या संख्येत बारावीच्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार सुरू असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ती प्रतारणा ठरत असल्याची भावना परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठा वाजागाजा करत यंदा बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या माध्यमातून राबवले जातील अशा वल्गना करण्यात आल्या. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारायचं राहून गेल्याने बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्याऐवजी कॉपीयुक्त होत असल्याचं सर्रास चित्र बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ज्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राचंही मोठं नुकसान होत आहे. याला जबाबदार असणाऱ्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कठोर शासन करावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य आज बोलून दाखवत आहेत.