मुंबई, 28 जून: गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा (Student) परदेशात शिक्षण (Education) घेण्याकडे कल वाढला आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात (Abroad) जातात. परदेशातील शिक्षण हे खर्चिक मानलं जातं. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी देशातच शिक्षण घेताना इंजिनीअरिंग, मेडिकलसारख्या विद्याशाखांना पसंती देतात. या शाखांमध्ये शिक्षण घेणं हेदेखील दिवसेंदिवस खर्चिक होत चाललं आहे. वार्षिक फी, हॉस्टेल आणि अन्य गोष्टींवरचा खर्च वाढला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी अपेक्षित असलेला सर्व खर्च विचारात घेत पालक काटेकोर आर्थिक नियोजनावर (Financial Planning) भर देत असले तरी त्यांना शैक्षणिक कर्जासारखा पर्याय आवश्यक वाटतो. त्यामुळे बहुतांश पालक आवश्यक रक्कम, कर्जाचा कालावधी, व्याजदर, स्वतःचं उत्पन्न आणि आर्थिक नियोजन विचारात घेत शैक्षणिक कर्ज घेतात.
सध्या अनेक सरकारी, खासगी, सहकारी बॅंका आणि वित्तीय संस्था एज्युकेशन लोन (Education Loan) अर्थात शैक्षणिक कर्ज देतात. यासाठी प्रत्येक बॅंकेचा व्याजदर (Interest Rate), कालावधी (Duration) आदी गोष्टी भिन्न असतात. `बॅंक बाजार डॉट कॉम`ने 21 जून 2022 रोजी 10 प्रमुख बॅंकांच्या वेबसाईटवरून शैक्षणिक कर्ज आणि त्याच्या व्याजदरांचा तपशील जमा केला आहे. या प्रमुख बॅंका तुलनेनं कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. त्यानुसार सध्या सेंट्रल बॅंक (Central Bank) सर्वांत कमी म्हणजेच 6.70 टक्के दराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. बॅंक ऑफ इंडिया अर्थात बीओआय (BOI) सर्वाधिक म्हणजेच 7.75 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. यामध्ये कर्जाची रक्कम आणि कालावधीचा विचार केलेला नाही. तसंच ज्या बॅंकांच्या वेबसाईट्सवर शैक्षणिक कर्जासंदर्भात तपशील उपलब्ध नाही, त्यांचा यात विचार करण्यात आलेला नाही.
सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता, G7 देशांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम होणार?प्रमुख बॅंकांच्या वेबसाईटवर शैक्षणिक कर्जासंदर्भात उपलब्ध तपशील पाहता, सेंट्रल बॅंक (Central Bank) प्रतिवर्ष 6.70 टक्के दरानं शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देते. एसबीआय अर्थात स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक (IOB) प्रतिवर्ष 7.25 टक्के दरानं शैक्षणिक कर्ज देत आहेत. कॅनरा बॅंकेचा (Canara Bank) शैक्षणिक कर्जासाठी प्रतिवर्ष 7.30 टक्के असा व्याजदर आहे. इंडियन बँक (Indian Bank) प्रतिवर्ष 7.40 टक्के व्याज दरानं शैक्षणिक कर्ज ऑफर करते. शैक्षणिक कर्जासाठी बँक ऑफ बडोदाचा (Bank Of Baroda) प्रतिवर्ष 7.45 टक्के असा व्याजदर आहे.
आयडीबीआय (IDBI) आणि युनियन बॅंक (Union Bank) प्रतिवर्ष 7.50 टक्के व्याज दराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देते. पीएनबीचा (Punjab National Bank) शैक्षणिक कर्जासाठी प्रतिवर्ष 7.65 टक्के असा व्याज दर आहे. बॅंक ऑफ इंडियाचा शैक्षणिक कर्जासाठीचा व्याजदर सर्वाधिक आहे. ही बॅंक 7.75 टक्के व्याजदरानं शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देते. बँकांचे हे दर माहिती झाल्यावर पालक म्हणून तुम्ही तुमच्या सोयीच्या बँकेतून शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करू शकता. बँकेत या कर्जासंबंधी काही योजना सुरू आहे का याचीही विचारणा तुम्ही करू शकता.