मुंबई, 27 ऑगस्ट: तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात देशातील ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी कामगारांच्या (Job in e-commerce companies) शोधात आहेत. टाटा, बिगबास्केट यांसारख्या कंपन्या या भरती प्रक्रियेत सहभागी असणार आहेत. या कंपन्या एवढी घाई करण्यामागं दोन कारणं आहेत. मोठ्या प्रमाणात जॉब उपलब्ध होण्यामागची कारणं नेमकी काय? पहिला म्हणजे सणासुदीचा हंगाम आणि दुसरं म्हणजे बेरोजगारीचा दर कमी होणं. इतर दिवसांच्या तुलनेत सणासुदीच्या काळात विक्री अनेक पटींनी वाढते. कपडे, शूज, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा यांसारख्या वस्तू सर्वाधिक ऑर्डर केल्या जातात. ऑर्डर्सचा पूर आल्यानं मालाची डिलिव्हरी होण्यास उशीर होतो. गैरसोयीमुळे ग्राहक ऑर्डरही रद्द करतात. यामुळं कंपन्यांचं मोठं नुकसान होतं. या समस्येला तोंड देण्यासाठी कंपन्या सणासुदीच्या काळात नोकरभरती वाढवतात. सध्या, ई-कॉमर्स कंपन्या वाढत्या प्रमाणात डिलिव्हरी कर्मचारी घेत आहेत. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या सर्वात मोठ्या खरेदीच्या हंगामात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते, अशी भीती कंपन्यांना वाटत आहे. ऑनलाइन ग्रॉसरी सेलर बिगबास्केटचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीके बालकुमार यांच्या मते, गिग वर्कफोर्सच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. टाटा समूहानं त्यांच्या इन्स्टंट डिलिव्हरी सेगमेंट BB Now मध्ये डिलिव्हरी भागीदारांची संख्या मार्च तिमाहीतील 500 वरून जून तिमाहीत 2,200 पर्यंत वाढवली आहे. हे लक्ष्य मार्च 2023 पर्यंत सुमारे 6,000 पर्यंत वाढवण्याचे आहे. हेही वाचा- तरुणांनो तयार राहा! देशात ‘या’ सेक्टरमध्ये उपलब्ध होणार तब्बल 10 लाख नोकऱ्या; राज्यातही पडणार जॉब्सचा पाऊस या कंपन्यांमध्ये नोकऱ्या होणार उपलब्ध- बिगबास्केट आणि ई-कॉमर्स फर्म डंझो यांच्याकडे वितरणासाठी स्वतःचे कर्मचारी आहेत. तर, कॉस्मेटिक्स-टू-फॅशन रिटेलर Nykaa सारख्या कंपन्या सेवा देण्यासाठी इतर भागीदारांवर अवलंबून असतात. NITI आयोग या थिंक टँकने जूनमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गिग वर्क एम्प्लॉयमेंट, ज्यामध्ये डिलिव्हरी कामगार आणि विक्री करणार्यांचा मोठा वाटा आहे. 2022-23 मध्ये भारतात 90 लाखांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. हा आकडा 2019-20 च्या तुलनेत सुमारे 45 टक्के अधिक आहे. भारतातील बेरोजगारीचा दर 7 टक्क्यांच्या खाली- भारतातील बेरोजगारीचा दर जानेवारीनंतर प्रथमच जुलैमध्ये 7 टक्क्यांच्या खाली आला. ज्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रापुढे समस्या वाढत आहे. या क्षेत्रामध्ये आधीच कर्मचार्यांची कमी आहे, आता बेरोजगारी दर कमी झाल्यामुळं त्यांना अजून त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.