मुरादाबाद, 26 मे : नुकताच UPSC निकाल 2022 जाहीर झाला. यामध्ये निवड झालेल्या अनेकांच्या कथा खूप प्रेरणादायी आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीतील तरुणांच्या यशोगाथांना तुम्ही सलाम कराल. असाच प्रवास बस ड्रायव्हरचा मुलगा असलेल्या मोईन अहमद याचा आहे. 2019 पासून यूपीएससीची तयारी करणाऱ्या मोईनला चौथ्या प्रयत्नात यश मिळाले आहे. त्याने 296 रँक मिळवली आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, मुरादाबाद जिल्ह्यातील जटपुरा गावात राहणारे मोईनचे वडील रोडवेजमध्ये कंत्राटी बस चालक आहेत. संपूर्ण कुटुंबाची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. मोईनची आई तस्लीम जहाँ गृहिणी आहे. मोईनला एकूण चार भाऊ आणि एक बहीण आहे. मोठा भाऊ दिल्लीत एका खासगी कंपनीत काम करतो. मोईन दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोईन सांगतो की, कुटुंबात अनेक आर्थिक अडचणी आहेत. पण या परिस्थितीला तो कधीच घाबरला नाही. आजूबाजूच्या समस्या पाहून त्याने नागरी सेवेत रुजू होण्याचा विचार केला.
पण जेव्हा तयारीसाठी कोचिंगचा विचार केला तेव्हा आर्थिक समस्या आधीच भिंतीसारखी उभी होती. हा अडथळा दूर करण्यासाठी मोईनने 2016 मध्ये सायबर कॅफे सुरू केले. पुढील दोन वर्षांसाठी सायबर कॅफेद्वारे कोचिंगसाठी पैसे जमा केले आणि 2019 मध्ये कोचिंगसाठी दिल्लीला गेला. मोईन सांगतो की, दिल्लीत आल्यानंतर काही दिवसांतच त्याचे पैसे संपले. यानंतर त्याला दिल्लीत राहण्यासाठी अडीच लाखांचे कर्ज घ्यावे लागले. त्यापैकी एक लाख रुपये आतापर्यंत अदा करण्यात आले आहेत. मोईन म्हणतो की, त्याला नेहमीच धोका पत्करण्याची सवय लागली आहे. सायबर कॅफे चालवून दरमहा 30 ते 40 हजार रुपये कमावत असताना UPSC उत्तीर्ण होण्याचे स्वप्न घेऊन त्याने दिल्लीला येणे पसंत केले. नेट-जेआरएफ पास आहे मोइन - मोईनने राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच NET JRF देखील क्वालिफाय केले आहे. त्याने यूपीएससीच्या मुख्य परिक्षेत राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय घेतले होते. मोईन सांगतो की, तयारी सुरू केल्यापासून तीन महिन्यांतच त्याने यूपीएससीचा पहिला अटेम्प्ट दिला होता. पण त्यावेळी काहीच समजले नाही. दुसऱ्या प्रयत्नात थोडे वाचन करुन परिक्षा दिली. मात्र, यातही अपयश आले. त्याचप्रमाणे तिसऱ्या प्रयत्नातही अपयश आले. मात्र, चौथ्या प्रयत्नात त्याने आधीच्या चुका सुधारून टप्प्याटप्प्याने तयारी केली. प्रत्येक दिवशी 7-8 तास अभ्यास - मोईन सांगतो की तो रोज सात ते आठ तास अभ्यास करायचा. सोशल मीडियालाही तो टाळत नव्हता. त्याऐवजी, त्याने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाती ठेवली आहेत आणि सर्व मंत्रालयांचा फॉलो करतो. याद्वारे तो विविध मंत्रालयाच्या नवीन योजना किंवा उपक्रमांची माहिती मिळवत असे. 40 मिनिटे चालली मुलाखत - मोईनची यूपीएससी मुलाखत सुमारे 40 मिनिटे चालली. या दरम्यान, वस्तुस्थितीपर प्रश्नांऐवजी बरेच समजणारे प्रश्न विचारण्यात आले. तुम्हाला मुरादाबादचे डीएम केले तर तुम्ही काय कराल, असा पहिलाच प्रश्न विचारण्यात आला होता. मोईनने स्काऊट गाईड केले आहे, त्यामुळे त्यात राहून काय शिकलात, असा प्रश्न त्याला पडला. याशिवाय ग्लासगो आणि G20 शी संबंधित प्रश्नही विचारण्यात आले.

)







