मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

Valentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत!

Valentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत!

हिटलरने दोन गोष्टींवर जिवापाड प्रेम केलं, एक जर्मनी आणि दुसरी इव्हा...जगाच्या पाठीवर हिटलरने जे काही केलं त्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. ज्या जर्मनीला काबीज करण्यासाठी हिटलरने युद्ध पुकारले त्याच जर्मनीसाठी त्याचा अस्त झाला.

हिटलरने दोन गोष्टींवर जिवापाड प्रेम केलं, एक जर्मनी आणि दुसरी इव्हा...जगाच्या पाठीवर हिटलरने जे काही केलं त्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. ज्या जर्मनीला काबीज करण्यासाठी हिटलरने युद्ध पुकारले त्याच जर्मनीसाठी त्याचा अस्त झाला.

हिटलरने दोन गोष्टींवर जिवापाड प्रेम केलं, एक जर्मनी आणि दुसरी इव्हा...जगाच्या पाठीवर हिटलरने जे काही केलं त्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. ज्या जर्मनीला काबीज करण्यासाठी हिटलरने युद्ध पुकारले त्याच जर्मनीसाठी त्याचा अस्त झाला.

अॅडॉल्फ हिटलर... इतिहासाच्या पानावर गडद रेषांनी लिहिलेलं असं नाव ज्याची बरोबरी सिकंदर, नेपोलियन या समेशरबहाद्दर सम्राटांशी करताही येणार नाही. अॅडॉल्फ हिटलर...जगाचा खलनायक...ज्याने जर्मनीला उभारलं आणि बेचिराखही केलं...ज्यू धर्मीयांचा तो यमदूतच होता. दुसर्‍या महायुद्धात 60 लाख ज्यूंना ठार मारण्यात आलं. त्याचं समर्थन जगाच्या पाठीवर कुणीच करणार नाही आणि होणार नाही. पण या हिटलरच्या मनात एक प्रियकर होता...अगदी 'एक दुजे की लिये' असाच तो जगला आणि अवघ्या काही तासांत लग्न करून तिलाही संपवलं आणि स्वत:ही संपला...ही जोडी होती इव्हा आणि हिटलरची...

हिटलर हा ऑस्ट्रियन पण तो स्वत:ला जर्मन मानायचा. जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी त्याला जर्मन नागरिक व्हावा लागलं हेही त्यांच्या आदेशानं. वडील ऍलॉईस हिटलर लष्करात अबकारी खात्यात असल्यामुळे घरी लष्कराची शिस्त होती.  कालातंराने वडिलांचं निधन झालं. क्लारानं हिटलरला घेऊन गाव सोडलं आणि लिन्झला राहायला गेली. लिन्झमध्ये पुढचं शिक्षण पार पडलं. पण चित्रकार होण्याची इच्छा कायम होती. लिन्झमध्ये मोठं महाविद्यालय नसल्यामुळे त्याची पंचाईत झाली. त्यासाठी त्याला व्हिएन्ना गाठावं लागणार होतं, पण ते शक्य नव्हतं. अशातच क्लॉराला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. दवा, दवाखाने झाले.. पण फरक काही पडला नाही. क्लॉराचं निधन झालं आणि वयाच्या 17व्या वर्षी हिटलर पोरका झाला. आईचं चित्र बनवायला हाती घेतलं होतं आणि तेही अर्धवट राहिलं. कसाबसा स्वत:ला सावरून हिटलरने लिन्झ सोडले आणि व्हिएन्ना गाठलं. तिथे तो चित्रकार झाला. त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने चित्र विकून उदरनिर्वाह केला.  पुढे त्याने हिएन्ना सोडलं आणि म्युनिक गाठलं. म्युनिकमध्ये ऑस्ट्रियन राजपुत्राला ठार मारण्यात आलं. त्यामुळे अख्ख्या युरोप खंडात युद्धाचा भडका उडाला.  म्युनिकमध्ये लष्कर भरती सुरू झाली. हिटलरनेही अर्ज भरला. काही दिवसांनी त्याच्या हाती पत्र पडलं. एक ऑस्ट्रियन सैनिक म्हणून त्याची राखीव दलात निवड झाली. पण सैन्यात त्याला फारसं काही करण्यास मिळालं नाही. त्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. इथून हिटलरची खरी कारकिर्द सुरू झाली.

नाझी पक्षाची स्थापना झाल्यानंतर 1928 पहिल्या निवडणुकीत हिटलर निवडणुकीला सामोरं गेला. पण फक्त 12 जागीच पक्षाचे उमेदवार निवडून आले.  हिटलरनेही हा पराभव खिलाडीवृत्तीने मान्य केला. पण अजून लढ्याचंय ही सुरुवात आहे असा निर्धार केला. निवडणुकीच्या धामधुमीनंतर हिटलर विश्रांतीसाठी आपल्या लाडक्या 'बर्खटेसगाडेन' या छोट्याशा गावी गेला. हिटलरने चाळीशी गाठली होती. आपलं आयुष्य हे राष्ट्रासाठी आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात आपणं पडू नये. राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर लग्नाच्या भानगडीत पडावं असं त्याने मनाशी पक्क केलं होतं. अशातच त्याची भाची गेली राबॉल आपल्या आईबरोबर बर्खटेसगाडेन इथं राहायला आली. हिटलरला दोन भाच्या होत्या. थोरली फ्लेडल आणि लहाणी गेली. फ्लेडल ही त्याच्यासाठी भाची होती पण गेली जरा वेगळीच होती. नुकत्याच वयात आलेली ही अलड पोरं, बेधुंद,मनसोक्त जगणारी, सतत चेहऱ्यावर स्मित हास्य, गुबऱ्या गालाची अशीही गेली हिटलरला भावली. ती फक्त आपल्यासोबत असावी,आजूबाजूला फिरत असावी, तिचा तो सहवास हिटलरला हवाहवासा वाटत होता. हिटलर तिला आपल्यासोबत पक्षाच्या कार्यालयात,सभेत घेऊन जातं असतं. परिणामी या दोघांची जोडी 'गॉसिप न्यूज' बनली होती. लोकं चवीने याची चर्चा करायची. 

1928 च्या पराभवानंतर हिटलरने सर्व लक्ष प्रचार,पक्षाची ध्येयधोरण आणि उत्तर जर्मनीवर केंद्रीत केली. यासोबतील होता त्याचा खास साथीदार डॉ.गोबेल्स. (गोबेल्स हा नाझी पक्षाचा प्रचारप्रमुख होता. त्याने  propaganda अर्थात दुष्प्र्रचाराचा सिद्धांताला जन्म दिला)  हिटलरने अख्खा उत्तर जर्मनी पिंजून काढला. जनसंपर्क वाढवला. लोकांत मिसळून जायचा. सभांच्या सभा घ्यायचा. अशातच आणखी एक तरुणी त्याच्या आयुष्यात आली तिचं नावं होतं इव्हा ब्राऊन.(हिटलरच्या अखेरच्या श्वासपर्यंत सोबत राहिलेली त्याची प्रेयसी आणि पत्नी) इव्हामुळे गेली मात्र नाराज झाली. 1930 ला लोकसभाच्या निवडणुका जाहीर झाल्या. पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी हिटलर मैदानात उतरला. पण, निवडणुकीच्या धामधुमीत हिटलर पुरता अडकला त्यामुळे गेली एकाकी पडली होती. तिच्या मनात ना ना शंकाचे ढग भरून आले होते.

म्युनिकला हिटलरसोबत असताना त्याच्या बंगल्यावर ती एकटीच असायची. तिला कुठेही जायचं असलं तर हिटलरने एक खास भरवश्याचा सेवक तिच्यासाठी नियुक्त केला होता. हिटलर आणि गेलीची भेट क्वचितच व्हायाची. गेलीच्या रिकाम्या वेळात तो सेवक तिचा मित्र बनला. दोघांत सूर जुळून आले. ही बाब हिटलरच्या कानी पडली. संतप्त हिटलरने त्याच क्षणी सेवकावर पिस्तुल रोखले फक्त चाप ओढायचा उशीर होता. पणस गेलीने दया याचना करून त्याचे प्राण वाचवले. सेवक तेथून पसारा झाला. हिटलरने तिला खूप समजावून सांगितलं. पण ही अल्लड पोरं हिटलरच्या साम्राज्याला कंटाळली होती. नाझी पक्षाच्या विजयानिमित्त भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. गेलीला मात्र हिटलरने आपल्या बंगल्यावरच ठेवलं. अखेरीस हिटलरच्या साम्राज्याला कंटाळून गेलीने त्याच रात्री डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

पुढे नाझी पक्ष सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. जर्मनीत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुका जाहीर झाल्यात. हिटलरने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण तो ऑस्ट्रियन नागरिक असल्यामुळे ते शक्य नव्हतं. अखेरीस हिटलरच्या इच्छेप्रमाणे 26 फेब्रुवारी 1932 ला हिटलरने जर्मन नागरीकत्व स्विकारले आणि दुसऱ्या दिवशी त्यांने अर्ज दाखल केला. पण त्याचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्यात आणि नाझी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला.  त्याने पंतप्रधानपदासाठी हट्टहास केला. पण राष्ट्रपती हिंडेनबर्गनी हिटलरला कडाडून विरोध केला.   या सर्व प्रवासात इव्हाने गेलीची जागा घेतली होती. पण गेली सारखीची परिस्थिती इव्हाची झाली. हिटलर महिनांनं महिना भेटत नसल्यामुळे एकदा इव्हानेही आत्महत्येचा प्रयत्न केला पण सुदैवाने इव्हा त्यातून वाचली. इव्हाच्या या कृत्यामुळे हिटलरने तिच्याकडे लक्ष दिलं. इव्हालाही तेचं हवं होतं. पण, राजकीय डावपेच खेळून हिटलरने हिंडेनबर्गचा मुलगा ऑस्कर हिंडेनबर्ग यांच्यासोबत हिटलर,पापेनची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर  हिटलर पंतप्रधान झाला. 

राष्ट्रध्यक्ष हिडेनबर्ग आजारामुळे बिच्छान्यावर खिळला. उतारवयात शरीरही साथ देत नसल्यामुळे तो अखेरच्या प्रवासाकडे निघाला होता. हिटलरने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन यापुढे पंतप्रधान आणि राष्ट्रध्यपद वेगळे ठेवता कामा नये. यापुढे एकच प्रशासक राहिला पाहिजे असा प्रस्ताव मंजूर करून घेतला. आणि त्याच दिवशी हिडेनबर्गने अखेरचा श्वास घेतला. हिंडेनबर्गच्या निधनानंतर हिटलर आपोआप राष्ट्राध्यक्ष झाला.

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हिटलर जे सांगेल तीच पूर्व दिशा असा कारभार सुरू झाला. जर्मनीच्या शेजारील छोटी छोटी देश हिटलरने कुठे दबाव तंत्र तर कुठे युद्ध करून ताब्यात घेतली. याच काळात जर्मनीत निवासी छावणीच्या नावाखाली ज्यूंची निर्दयीपणे कत्तल करण्यात आली. आता हिटलरची नजर फ्रान्सवर होती. बलाढ्य फ्रान्सवर आक्रमक चढाई करून अवघ्या काही महिन्यात जर्मन सैन्याने आयफेल टॉवरवर थर्ड राईशचा ध्वज फडकावला. फ्रान्सवर सहज विजय मिळवल्यामुळे हिटलर अक्षरश: बंकरमध्ये नाचला होता. फ्रान्सवर विजय मिळवल्यानंतर हिटलर थांबेल अशी सर्वांना अपेक्षा होती, पण ऐकणार तो हिटलर थोडी होता. त्याने इंग्लंडवर वायूहल्ला सुरू केला. इंग्लंडसोबत युद्ध सुरू असताना रशियावरही जर्मन सैन्याने आक्रमण केलं. अवघ्या चार महिन्यात सैतानासारखं सैन्य रशियाची राजधानी मॉस्कोच्या वेशीवर येऊन धडकलं. या काळात तब्बल २ लाखांहुन अधिक रशियन सैन्य ठार झालं होतं. पण निर्सगाने रशियाची साथ दिली. नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीत जर्मन सैन्य जागेवरच गोठलं. रशियन सैन्याने याचा फायदा घेत जर्मन सैन्यावर हल्ला करून गार केलं. बर्फवृष्टीमुळे जर्मन सैन्याचा रशियन सैन्यापुढे टिकाव लागला नाही.

युद्ध सुरु होऊन आता आठ महिने झाले होते. या आठ महिन्यात 2 लाख जर्मन सैन्य ठार झालं होतं. तर 44 हजार सैन्य बेपत्ता आणि जवळपास सव्वा लाख सैन्य थंडीमुळे आजारी पडलं होतं. आता हवामान बदलं होतं. हिटलरने पुन्हा नव्याने दोन लाख तरूण सैन्य धाडलं. आता दोन्हीकडून लढाई बरोबरीत आली होती. सुरुवातीला जर्मन सेनेनं ज्या ज्या ठिकाणी आघाडी घेतली होती त्यातला एकएक प्रदेश त्यांच्या तावडीतून निसटून चालला होता. अपुरे सैन्य,शस्त्रास यामुळे सेनेला माघार घ्यावी लागत होती. पण, माघार हा शब्द हिटलरच्या यादी नव्हता. रोज युद्धाचा आढावा देण्यासाठी सेनांनी यायचे ते नुसता पराभवाचा पाढाच वाचायचे. हे ऐकून हिटलर वैतागून जायचा. सेनांनीवर जाम चिडायचा. तुम्हाला युद्ध म्हणजे काय हे कळत तरी काय? मी पहिल्या महायुद्धात चार वर्ष काढली. सैनिक हा फक्त शत्रूचा नायनाट करण्यासाठी सिमेवर जन्म घेतो त्याने माघार घेणे हे शक्यच नाही हिटलर आपल्या सेनांनी ठणकावून सांगायचा. पण सेनांनीना रणगणांत काय करायचे हे माहिती असून सुद्धा हिटलरच्या हट्टामुळे गप्प बसणे भाग होतं.

कधीकधी प्रसंग इतक्या टोकाला यायचा की सैन्य मागे घेतलं नाही तर एक तर ते शत्रूंच्या हाती लागेल अन्यथा मारलं जाईल. तरी सुद्धा हिटलरने कधीच माघार घेतली नाही. हजारो सैनिक युद्धभूमीवर शहीद होऊ दिली.त्याच्या काही सेनांनी धाडस करून त्याला निक्षूण सांगितलं काही ठिकाणाहून तरी  सैन्य माघारी घेतलं नाही तर हजारो सैनिक जिवंत राहणार नाही. असं उद्धटपणे कोणी बोलणं तो मुळीच खपवून घ्यायचा नाही.अशा सेनांनी दुस­याच दिवशी तो बदली करायचा. आपल्याच सेनांनी तो मुर्खात काढायचा. असल्या सेनांनीमुळे आपला पराभव होईल असं खापरच त्यांच्याच डोक्यावर फोडायचा. पण त्याला कारण अनेक होती त्यातलंच एक म्हणजे स्टॅलिनने काही खबरे जर्मन सेनेत पसरवले होते. त्यामुळे हिटलरची चाल त्याचापर्यंत पोहचायची. ही बाब जेंव्हा उघड झाली. तेंव्हा अशा 41 खब­यांना फासावर लटकावण्यात आलं. आता रशियन सेनेच्या मदतीला अमेरिकन वायुदल दिमतीला लागलं होतं. अमेरिकन वायुदलाने जर्मन सेनेवर बॉम्बवर्षाव करून रशियन सेनेचं बरंचस काम सोप करून दिलं. परिणामी रशियन सैन्य एकपाऊल पुढे सरकत होतं. हजारो जर्मन सेनेनं माघार घेता न आलामुळे जागेवरच शस्त्र टाकली तर काही ठिकाणी युद्ध युद्धकैदे झाले. पण जो न्याय जर्मन सेनेनं रशियन सेनेशी केला होता. तसाच रशियन सेनेनं जर्मन सेनेसोबत केला.

लाखो जर्मन सैनिकांना कैदी करण्यापेक्षा जागेवरच ठार मारले. हिटलर त्याच्या गुहेत चिडचिड करायचा. सेनांनी युद्धाचा आढावा घेऊन आले तर काय झाले एवढाच विचारायचा आणि जाम भडकायचा. सेनांनीवर फैलावर घ्यायचा. वैतागून जायचा. एका अधिका­यांनी नीट नाही बोलायचा. भेटेल त्याला फैलावर घ्यायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्या सहका­यांनी त्याला ठार मारण्याच पुन्हा कट रचला. हिटलर जर मेला तर युद्ध संपणार असा कयास त्यांनी केला. युद्धभूमीवरून हिटलर असाच एकदा बर्लिन गेला होता. तेव्हा त्याच्या सहका­यासोबत नेहमीप्रमाणे एक बैठक भरणार होती. या बैठकीच्या अगोदर त्याच्या विरोधक सहका­याने सुटकेमध्ये बॉम्ब ठेवून तिथून गुपचूप पसारा झाला. बैठक सुरू होताच काही वेळातच बॉम्बस्फोट झाला. पण हिटलर त्यातून थोडक्यात वाचला. त्याचे तीन सहकारी यात ठार झाले. पुन्हा त्याने ईश्वरी आज्ञेचा उल्लेख करून स्वत:च्या नशिबावर हसला.

दुसरीकडे आता जर्मनीच्या पश्चिम भागावर इंग्लंड सैन्याने आघाडी उघडली होती. तर दुसरीकडे अमेरिकन आणि इंग्लंडच सैन्य दक्षिण फ्रान्समध्ये उतरले. अमेरिका आणि इंग्लंड आपल्या पूर्ण ताकदीनिशी आता युद्धात उतरली होती. त्यामुळे जर्मन सेनेची मोठी पंचायाईत झाली. त्यांच्यापुढे जर्मनसेनेचा निभावच लागेना. तो आपल्या सेनांनी लवकरच आपण अणुबॉम्ब तयार करणार आहोत अशी स्वप्न दाखवायचा. पण ती नुसती स्वप्न होती. सुदैवाने ती सत्यात उतरली नाही. जर सत्यात उतरली असती तर दुस­या महायुद्धाचा निकाल वेगळा लागला असता. तो जगाला धोकादायक ठरला असता. 10 दिवसातच इंग्रज आणि अमेरिकन सैनिकांनी जर्मनीच्या तावडीतून फ्रान्सची सुटका केली.  चार वर्षानंतर फ्रान्स स्वातंत्र्य झाला.

फ्रान्समध्ये सहा लाख जर्मन सैन्य ठार झाले. पाठोपाठ जर्मनीचे मित्र राष्ट्र रुमेनिया आणि फिनलंडने रशियासोबत तह करून जर्मनीविरोधात युद्ध पुकारले. प्रचंड ताणामुळे हिटलर आजारी पडला. मध्येच त्याला थंडी भरून यायची तो जागेवरच कोसळायचा. पुन्हा शुद्धीवर यायचा. एक कान खराब झाला होता. डॉक्टरांनी त्याच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया केली. पण दुखणं सुरुच होतं. इकडे अमेरिकन सैन्य जर्मनीचे सिमेवर येऊन उभं ठाकलं होतं. रशियन सैन्यही बरंच पुढे आलं होतं. काही मैल अंतरावर जर्मनीपासून रशियन सैन्य दूर होतं. अमेरिकन सैन्यापुढे जर्मनींचं काहीच निभाव लागला नाही. यालाही एक कारण होतं. इथंही एक 'अल्ट्रा'नावाची गुप्त संघटना हिटलरच्या चालीची प्रत्येक बातमी इंग्लंडला पोहचवायची. त्यामुळे जर्मनीच्या अनेक गुप्त आक्रमण हाणून पाडली होती. या युद्धाचा नरकुंडाला चार वर्ष झाली होती.

रशियन सैन्य आता जर्मन व्यापत पोलंडच्या भूमीवर उतरलं होतं. तिथे त्यांनी अनेक छळछावण्या उद्धवस्त केल्या. दोन्ही आघाड्यावर जर्मन सैन्य लढत होतं. पण हिटलरने एकाही सैनिकांना एक पाऊल सुद्धा मागे घेऊ दिलं नाही. एवढेची नाही तर त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युद्धविरामासाठी इंग्लंड अमेरिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण हिटलरच्या कानी पडतचा तो चवताळून उठला. विश्वासघाती, पळपूटे असे आरोप करून त्यांना वेठीस आणायचा. स्टॅलिन आणि चर्चिल यांनी आता हिटलरविरोधात आघाडी जोमाने उघडली. रशियाच्या टप्प्यात बर्लिन दूर नव्हते. दोघांनीही एकच वेळी अखेरचा प्रतिहल्ला चढवला. त्यामुळे जर्मनीवर पुन्हा एकदा पहिल्या महायुद्धाचा पेच प्रसंग उद्भवला. एकाच वेळी दोन सिमेवर दोन शत्रूंशी लढावे लागणार होते. जर्मनीला पहिल्या महायुद्धात पराभवासाठी हेच कारण होते आणि दुस­ऱ्या महायुद्धात सुद्धा हेच कारण.

आता बर्लिनमध्ये राहणे शक्य नव्हते अनेक जर्मन नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने जर्मनी सोडली काही यशस्वी झाले तरी काही सीमेवर अडकले जे अडकले त्यांना रशियन सेनेनं ठार मारलं. जे जर्मन सेनेनं रशियन नागरीकांसोबत केलं तेच रशियन सेनेनं केलं. पण, हिटलरने बर्लिन सोडलं नाही. आता त्याने त्याची प्रेयसी इव्हाला आपल्याकडे बोलावून घेतलं होतं. हिटलरची अवस्था पाहून तिला हादराच बसला होता. पण आपल्या प्रियकरासोबत शेवटच्या क्षणीसोबत आहोत याचा तिला आनंद होता. रोज अमेरिकन वायुदल बर्लिनवर शेकडो बॉम्ब वर्षाव करत होते. हिटलरच बर्लिन पूर्णपणे उद्धवस्त होत होतं. एक मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. हिटलरला आपल्या बंकरमधून बाहेर पडताही येणं अशक्य झालं होतं. यावेळी त्याचे निष्ठावंत सेनांनी, सेवक सोबत होतं. हेच त्याचं कुटुंब.

आपण युद्ध हरलो आहो याची त्याला आता पूर्ण जाणीव झाली होती. त्याला तरीही चमत्काराची अपेक्षा होती. बोल्शेव्हिझमविरोधात चर्चिलला जाग येईल तो रशियाला विरोध करले असा कयास त्याने केला होता. पण, तसे काही झाले नाही. इकडे जर्मन पदाधिका­ऱ्यांनी अमेरिका,रशिया,इंग्लंडसोबत युद्धविरामाची बोलणी सुरू केली. पण त्याना यश आले नाही. स्टॅलिनने जर्मनला धडा शिकवण्यासाठी शपथ घेतली होती.

पुढे चर्चिल,स्टॅलिन,रुझवेल्ट याची एकत्र बैठक झाली. पुन्हा जर्मनीने युद्धाचा विचारच करू नये यासाठी युद्ध संपल्यानंतर जर्मनीचे चार तुकडे करून आपआपसात वाटू घेण्याचा निर्णय स्टॅलिन जाहीर केला. यावर सर्वांनी स्वाक्ष­ऱ्या केल्या. हिटरलने दुसरे महायुद्ध सुरू करण्यामागे ज्यूंचं युरोपमधून उच्चाटन करणे हा या मागाचा हेतू होता. 'मी चार वर्षात युरोप शुद्ध केला. मी उद्या असेल नसेल पण लोकं थर्ड राईशचे आभार मानतील,' असं अंतिम निवदेनात स्पष्ट केलं. हिटलर बंकरमध्येच वास्तव्याला होता. त्याच्या सहका­ऱ्यांनी त्यांनी बर्लिन सोडण्याची विनंती केली. पण, त्याने ती फेटाळून लावली. जर आपण आपल्या देशाला अशा नाजूक परिस्थिती सोडून पळ काढला तर लोकं माझ्यावर हसतील. मी खऱ्या अर्थाने इथंच जन्माला आलो आणि मरणाही इथेच. तुम्ही स्वत:च्या सुरक्षेसाठी इथून गेला तरी माझी हरकत नाही, असं स्पष्ट सांगून टाकलं.

सेनांनीही आपल्या फ्युररचं राष्ट्रप्रेमपाहून भरून आले. तो बंकरमध्ये गेल्यानंतर सेनांनी अक्षरश: ढसाढसा रडले. इकडे बर्लिनला रशियन सेनेनं वेढा घातला होता. बर्लिनमध्ये जर्मनीची वाचलेली फौज एकाकी लढा देत होती.   एप्रिल महिना उजाडला होता. 20 एप्रिलला हिटलरचा वाढदिवस बंकरमध्येच आनंदाने साजरा झाला. दोनच दिवसानंतर हिटलर प्रकृती ढासळली. हिटलर बेशुद्ध पडला. तो वाचेल की नाही यांची शंका आली. पण दोन दिवसानंतर त्याची प्रकृती सुधारली. कसेबसे दिवस पुढे सरकत होते. बंकरमध्ये चिंतेच वातावरण तंग होतं चाललं होतं. अखेरीस 28 एप्रिलला हिटरलने आपलं राजकीय मृत्यूपत्र लिहून घेतलं. त्यात दुस­ऱ्या महायुद्धाला ज्यू आणि आंतराष्ट्रीय हस्तकांना जबाबदार धरलं. 'हे युद्ध हरलो, जरी असलो तरी शेवटपर्यंत आम्ही लढलो' याचं समाधान आहे. असं सांगून त्याने वारसादार म्हणून ॲडमिरल डोनिट्झ -राष्ट्रध्यक्ष, जोसेफ गोबेल्स-पंतप्रधान यांना नियुक्त केलं. हिटलरने आपली संपूर्ण संपत्ती पक्षाच्या नावावर केली. जर माझ्याबरोबर पक्ष संपला तर ती राष्ट्राला देऊन टाकावी. मृत्यूपत्राच्या शेवटी शरणागतीच्या अपमानाला सामोरं जायचं नाही. म्हणून मी आत्महत्या करायचं ठरवलंय. मृत्यूनंतर त्याच्या  पार्थिवाचं दहन करण्यात यावं अशी शेवटची इच्छा हिटलरने व्यक्त केली. त्याच रात्री बाराच्या सुमारास हिटलरने इव्हा ब्राऊनसोबत लग्न केलं. छोटेखानी हा लग्नसोहळा पार पडला. बंकरमध्ये त्याचे आठ सहकारी आणि कर्मचारी हजर होते. बंकरमध्येच छोटेखानी पार्टी झाली.

आपल्याला पंतप्रधानपद दिलं. यामुळे गोबेल्स भारावून गेला पण त्याला आपल्या फ्युररला सोडू जायचं नव्हतं. त्यांने तशी इच्छा हिटलरला बोलून दाखवली. हिटलर त्यांच्या निर्णयाचा अभिमान वाटला. गोबेल्स आपल्या पत्नी आणि सहा चिमुरड्यासह बंकरमध्येच होता. त्याच रात्री गोबेल्स दाम्पत्यांनं आपल्या सहा चिमुरड्यांना सायनाईडच्या विषारी गोळ्या देऊन स्वत:वर गोळ्या झाडून जीवनाचा अंत केला.

सकाळ झाली बर्लिनमध्ये शत्रूंना पावला पावलावर जर्मन नागरीक आणि उरलेल्या सैन्याला लढावं लागतं होतं. त्यामुळे हिटलरच्या बंकरपर्यंत पोहचणं त्यांना कठीण होऊन बसलं. हिटलर त्यादिवशी बंकरमध्ये शांत, नेहमीसारखाच होता. मरणाकडे जाणारा माणूस इतका कसा बेफिकीर राहतो हे पाहून त्याच्या सहका­ऱ्यांना नवलं वाटलं. 30 एप्रिलचा दिवस उजाडला. हिटलरने सायनाईडच्या गोळ्या आणून ठेवल्या होत्या. त्यातली एक गोळी त्याने आपली लाडकी कुत्री ब्लॉडीला दिली. काही क्षणातची मृत पावली. संध्याकाळी जेवणं झाल्यानंतर हिटलर आणि इव्हाने सगळ्यांचा निरोप घेतला. हिटलरने त्याचे सेवक गुन्श आणि बॉऊर यांना बोलावून घेतले दोघांनी सुचना दिल्या आम्ही आता आत्महत्या करणार आहोत. आम्ही मेल्यानंतर ताबडतोब आमचे प्रेत जाळून टाका स्टॅलिनला माझ्या शरीराचा एक तुकडा ही हाती लागता कामा नये, अशा सुचना केल्या. बॉऊर हा हिटलरचा आवडता पायलट होता.

दोघे जण आतल्या खोलीत गेले. इव्हा रडत होती, हिटलरने तिचे डोळे पुसले. अखेरच्या श्वासपर्यंत प्रेम तिनं निभावलं होतं. तिने काहीही न बोलता हिटलरने दिलेल्या सायनाईडच्या गोळ्या खाल्या. थोड्यावेळाने हिटलरने स्वत:वर गोळी झाडून घेतली. तेव्हा साडे तीन वाजले होते. पंधरा मिनिटांने गुन्श आणि बॉऊर त्याचे सहकारी आत गेले. हिटलर रक्ताच्या थारोळ्यात कोचवर कोसळलेला होता. इव्हा खाली पडलेली होती. दोघांचे मृतदेह बंकर बाहेर आणण्यात आली. एक खड्डा खोदून एकत्र ठेवण्यात आली.  पेट्रोल टाकून पेटवून दिले. बंकरवर तोफगोळांचा मार होतच होता. तरीसुद्धा गुन्श बंकरबाहेर येऊन पेट्रोल फेकत होते. थोड्यावेळाने गुन्शने अस्थी गोळा केल्या आणि एका खड्यात पुरून टाकल्या पण त्याही हवेसोबत उडून गेल्या. बारा वर्षाची सत्ता गाजवणार जर्मनीचा भाग्यविधाता त्यानेच पेटवलेल्या अग्निकांडात भस्म झाला होता. रशियन सेनेनं संपूर्ण बंकर खोदून काढले. पण, त्याच्या हाती काहीही लागले नाही. हिटलरच्या मृत्यूनंतरही त्याचा शोध सुरूच होता. पहिल्या महायुद्धात हिटलरचा उदय झाला होता आणि दुस­ऱ्या महायुद्धात त्याचा अस्त झाला.

हिटलरने दोन गोष्टींवर जिवापाड प्रेम केलं, एक जर्मनी आणि दुसरी इव्हा...जगाच्या पाठीवर हिटलरने जे काही केलं त्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. ज्या जर्मनीला काबीज करण्यासाठी हिटलरने युद्ध पुकारले त्याच जर्मनीसाठी त्याचा अस्त झाला.

(लेखातले विचार हे लेखकाचं व्यक्तिगत मत आहे. त्या विचारांशी 'न्यूज18 लोकमत' सहमत असेलच असं नाही.)

==============

First published:

Tags: Love story, Valentine day