S M L

BLOG : 'प्यार का गठबंधन' : युती-आघाडीच्या काँग्रेसी राजकारणात मोदींची सरशी?

महागठबंधन म्हणजे महामिलावट, अशी एकेकाळी टीका करणारे मोदी, रालोआ हीदेखील विविध पक्षांची एकत्र केलेली भेळच आहे, हे विसरलेले नाहीत. सत्ताकारणासाठीचं हे प्रेमाचं गठबंधन काँग्रेसपेक्षा भाजपलाच जास्त चांगलं जमलंय का?

Updated On: Mar 13, 2019 02:44 PM IST

BLOG : 'प्यार का गठबंधन' : युती-आघाडीच्या काँग्रेसी राजकारणात मोदींची सरशी?

हेमंत देसाई

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच, देशात 'आयाराम गयाराम'चा प्रयोग जोरात सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणे यांचे विश्वासू सहकारी आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसचे काही आमदार भाजपत गेले असून, त्यापैकी एकाची मंत्रिपदी वर्णीही लागली आहे. तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.मोदीमुक्त भारताचं काँग्रेसचं स्वप्न

2019 मध्ये नरेंद्र मोदीमुक्त भारताचे स्वप्न बाळगणाऱ्या काँग्रेसने, त्या दिशेने प्रगती मात्र फारशी केलेली नाही. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी तसेच समाजवादी पार्टीशी काँग्रेसचा समझोता होऊ शकलेला नाही. दिल्लीमध्ये काँग्रेसने आम आदमी पक्षाशी समझोता करण्याचेच नाकारले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व माकप यांच्यातील वाटाघाटी अद्याप फलद्रूप झालेल्या नाहीत. रायगंज आणि मुर्शिदाबाद येथील जागांवर काँग्रेसने दावा सांगितला होता, पण तेथे माकपने आपले उमेदवार जाहीर करून टाकले आहेत.


Loading...

भाजपची दक्षिणी खेळी

2004 व 2009 साली काँग्रेसच्या झोळीत भरभरून यश टाकणाऱ्या आंध्र व तेलंगणमध्ये यावेळी पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहे. तेलुगू देसमही स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे तेथे वायएसआर काँग्रेस, भाजप, तेलुगू देसम व काँग्रेस अशी चौरंगी लढत होणार आहे. अर्थात महाराष्ट्रात राष्ट्रवादीशी, कर्नाटकात जेडीएसशी आणि बिहारमध्ये राजदशी आघाडी करण्यात काँग्रेसला कोणतीही समस्या नाही. झारखंडमध्ये तर झारखंड मुक्ती मोर्चाशी काँग्रेसचा तह यापूर्वीच झाला आहे. परंतु या तुलनेत केंद्रातील सत्तेच्या बळावर आणि गतिमान पक्षनेतृत्व असल्यामुळे, भाजपने विविध पक्षांशी मैत्री केली आहे. गेली चार वर्षे ज्या शिवसेनेने भाजपवर चिखलफेक सुरू केली होती, तिला भाजपने खिशात टाकले आहे. त्यासाठी भाजपने जागांबाबत किंचित तडजोड केली आणि नाणार प्रकल्पाची जागा बदलून, सेनेला कोकणचा रस्ता खुला करूनन दिला. तामिळनाडूत अण्णाद्रमुकला 'अँटि इन्कम्बन्सी'चा फटका बसेल, अशी भीती वाटत असतानाच, भाजपने त्या पक्षाबरोबर रामदास यांचा PMK आणि विजयकांत यांचा DMDK हे पक्षदेखील गळाला लावले आहेत. PMKची तामिळनाडूतील उत्तरेत वणियार समाजात आणि DMDKची थिरुवल्लर, सेलम, व थिरुपूर येथे ताकद आहे. तेलंगणातील टीआरएस आणि आंध्रमधील वायएसआर हे पक्ष भाजपशी मैत्री ठेवून आहेत. अडीअडचणीला नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दलही मदतीस येऊ शकतो,  जरी बीजेडीचे जय पांडा यांना भाजपमध्ये घेण्यात आले असले, तरीही.


उत्तर प्रदेशात कडवं आव्हान

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी यांचे कडवे आव्हान भाजपसमोर आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी भाजपने अपना दल व सुहैलदेव भारतीय समाज पार्टी या आपल्या घटकपक्षांसमोर नमते घेतले आहे. बिहारमध्ये नीतीशकुमार यांचा जदयू आणि रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष यांना प्रत्येकी 17 व 6 जागा सोडण्याचे औदार्य भाजपने दाखवले आहे. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यांच्या अगोदरच ही आघाडी झाल्यामुळे, आपण नीतीशकुमार-पासवान यांना उगाचच एवढ्या जागा दिल्या, असा पश्चात्ताप कदाचित अमित शहा यांना होत असेल...


ईशान्य भारतावर नजर

भाजपने झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनशी जागावाटपाचा समझोता केला आहे. अर्थात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावरून, आसाममधील आसाम गणपरिषद आणि मेघालयातील यूडीपी या पक्षांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर जाणे पसंत केले. दार्जिलिंगमधील गुरखा जनमुक्ती मोर्चानेसुद्धा रालोआबरोबर संबंध तोडले. परंतु त्यानंतरच भाजपला दार्जिलिंगमधील जागा जिंकता आली. तसेच सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाशी भाजपने दोस्ती केली आहे.


युती - आघाडीला पर्याय नाही

2019च्या निवडणुका म्हणजे, रालोआ विरुद्ध काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी, तसेच इतर पक्ष यांच्यातील लढाई आहे. देशात एकपक्षीय राजवटीचे दिवस केव्हाच सरले आहेत. त्यामुळे एकाच पक्षाचे राज्य असले, तरच देशाचे भाग्य फळफळते, असे काही समजण्याचे कारण नाही. गेल्या 20 वर्षांतील अटलबिहारी वाजपेयी, व डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारे ही आघाडीचीच होती. या कालावधीत देशाने प्रगतीच केली. मागच्या पाच वर्षांत धार्मिक उन्माद वाढला, पण विकासप्रक्रिया सुरूच होती, हा भाग वेगळा. 2014 साली भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असले, तरी अन्य घटकपक्ष बरोबर असल्यामुळेच सरकारला व्यापक जनमान्यता मिळाली, हे लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, पंजाबसारख्या राज्यात अकाली दलासारखा पक्ष साथीला नसता, तर त्या पट्ट्यात भाजपच्या यशाला झळाळी मिळाली नसती. तसेच लोकसभेच्या पोटनिवडणुकांतील पराभवांमुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ घटले होते, हेही लक्षात घ्यावे लागेल. आगामी निवडणुकांनंतरही भाजपला सत्तेची संधी मिळाली, तर ते आघाडीचेच सरकार असेल. समजा काँग्रेसप्रणीत संपुआचे अथवा महागठबंधनाचे सरकार आले, तरीदेखील त्यांनाही सगळ्यांना बरोबर घेऊनच जावे लागणार आहे.


अफझलखान म्हणा नाही तर हुकूमशहा...

शेअर बाजारातील लोकांना वाटते की, देशात खंबीर नेत्याचे मजबूत सरकार असावे. त्यापैकी अनेकांना हुकूमशाहीसुद्धा चालते. फक्त तिने कॉर्पोरेट क्षेत्राच्या आवडीचे निर्णय घ्यावेत, एवढीच त्यांची अपेक्षा असते...मात्र राजकीय पक्षांना शेवटी वास्तवाचे भान ठेवावे लागते. त्यामुळे शिवसेनेने 'अफझलखान' म्हणून संबोधले, तरीही ती टीका सहन करून भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह 'मातोश्री'वर गेले. दुसरीकडे, वर्षानुवर्षांचे हाडवैर विसरून, बसप व सपा एकत्र आले.

2008 साली भारताने अमेरिकेशी केलेल्या आण्विक कराराच्या प्रश्नावरून डाव्या आघाडीने डॉ. मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. परंतु पश्चिम बंगालमध्ये किमान काही जागांबाबत काँग्रेस व डावी आघाडी तडजोडीच्या पवित्र्यात आहे. मात्र छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशात बसप व काँग्रेस यांची आघाडी होऊ शकली नाही. प्रत्येक पक्षाला आपापले गड व कार्यकर्ते शाबूत ठेवूनच तडजोडी कराव्या लागतात.


प्यार का गठबंधन

वीस वर्षांपूर्वी पंचमढी येथील अधिवेशनात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 'एकला चालो रे'ची हाक दिली होती. परंतु तसे केल्यास एकांतात बसून देवदासप्रमाणे गाणी गायची पाळी येईल, हे लक्षात येताच, 2004 साली सोनियाजींनी अनेक पक्षांना बरोबर घेण्याचे कौशल्य दाखवून, सरकार स्थापन केले. महागठबंधन म्हणजे महामिलावट, अशी टीका करणाऱ्या मोदींनी, रालोआ हीदेखील विविध पक्षांची एकत्र केलेली भेळच आहे, हे विसरू नये.

ये बंधन तो प्यार का बंधन है

जन्मों का संगम है!

हे गाणे गुणगुणतच सर्व पक्षांना प्रवास करावा लागणार आहे...


(लेखक राजकीय विश्लेषक असून ब्लॉगमध्ये त्यांनी व्यक्त केलेली मतं त्यांची वैयक्तिक आहेत. त्याचा News18 शी संबंध असेलच असे नाही.)

Hemant.desai001@gmail.com

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2019 02:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close