गोविंद वाकडे पिंपरी, २१ सप्टेंबर : काही वर्षांपूर्वी इथे दिल्लीच्या ‘निर्भया’ला बळ देण्यासाठी कँडल मार्च निघाला होता. तो कव्हर करायला आलो होतो. याच हिंजवडी आयटीपार्कमध्ये तेव्हा केवढ्या तरी मेणबत्त्या पेटल्या होत्या. इथून जवळच गेल्या रविवारी एका देवळाबाहेर दबा धरून बसलेल्या माणसातल्या हैवानानं एकीचा बळी घेतला,अन दुसरीचं बालपण गिळलं. ऊसतोड कामगारांच्या गरीब कुटुंबातल्या या मुली… बाहेरच्या क्रूर समाजाविषयी, भीषणतेविषयी इवलीशी कल्पनाही त्यांना असण्याची शक्यता नव्हती. या पीडित मुलीला भेटलो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाटलं, ही घटना घडली त्यावेळी देवळातला देव दगड झाला होता का आपल्या समाजव्यवस्थेसारखा? चेहऱ्यावरचं निरागस बालपण संपलंही नव्हतं तिचं आणि हे ओरखडे उठलेत. त्याबद्दल विचारल्यावर ती सांगायला लागली… “तेंनी आम्हाला तिकडी नेलत वढित… अन् मला कपडे काढायला लावले. आम्हाला म्हनला खाली झोपा. त्यानं आम्हाला चॉकलेट दिलं.” खूप घाबराला असाल ना तेव्हा? “हा…” (डोळ्यात साठवलेली कळ ओघळली) “तो ढकलित व्हता तिला, ती म्हणती मला का ढकलीतो…. तिला लय तरास दिला… “(हुंदका गिळला गेला.) घरी का सांगितलं नाही? “………….” (मलाच शांतता असह्य झाली.) काय मागणी कराल? (एव्हाना मुलीचे वडील बोलायला आले होते.) “गरीबाला कोण हाय वो…. असा अन्याय थांबला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला सांगितल व्हतं, असं करणाऱ्याला शिक्षा देणार, आता द्या फासी म…!”
काळजाला भोकं पडणारी आणि व्यवस्थेविरुद्धचा संताप व्यक्त करणारी ही वाक्यं आहेत त्या पीडित चिमुकलीची आणि तिच्या हतबल बापाची. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्यानं न्यायासाठी अशी याचना करण्यापलीकडे कोणताही लढा देण्याचं बळ त्यांच्याकडे राहिलेलं नाही. काय बोलणार? कुणाला बोलणार….? पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांचं काम संपलं. आता कसोटी न्यायव्यवस्थेची. आता न्यायव्यवस्थेसाठी हे काही नवं नाही म्हणा… अशा केसेस शेकड्यानं पडून आहेतच की! चॅनलने बातम्या दाखवल्या. (त्यातही मोजक्याच चैनलनं रोजच्या धबडग्यात ही बातमी चालवली. पेपरमधून रकाने छापून आले. त्यांचंही काम संपलं. राहिलं कोण तर राजकारणी आणि समाजसेवी. दोघांपर्यंत ही घटना पोहोचलीच नव्हती बहुधा, कारण घरात बसून फेसबुक आणि ट्विटरवरूनही कुण्या कथित समाजसेवकानं गळा काढला नाही आणि काल याच शहरात असूनही कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर या बाजूला फिरकले नाहीत. पीडितेच्या घरी जाण्याची तसदी तर सोडा, आपल्या भाषणात साधा उल्लेखही न करता मंत्रिमहोदय निघून गेले. ज्यांच्या मुलींवर अत्याचार झाले ते कुटुंब फडात राबणाऱ्या कामगारांचं होतं आणि त्याच खात्याचे आपण मंत्री आहोत. याचीही जाणीव नसेल का त्यांना? याच विचारात रात्र झालीये. तिच्या झोपडीत आता अंधार पसरलाय. बाजूला माय आणि बाप जागीच आहेत. दिवसभरात घरासमोर जमलेल्या गर्दीतल्या बहुतेक नजरा पोरगी बलात्कार करण्याएवढी मोठी होती का? हेच बघण्यासाठी जमल्या होत्या. न्याहाळत होत्या आणि निघून जात होत्या. परत परत होणारा हा एकप्रकारचा बलात्कारच. आता त्या चिमुकलीलाही कळत तो होता अन् तिच्या माय बापालाही. अशात कशी येईल त्यांना झोप? या मुलीबरोबर जिच्यावर बलात्कार झाला ती चिमुरडी तर त्या आघाताने गेली. ही वाचलीये… तीही आता रोज मरेल. या नजरांनी, या भावनेनं कारण तिला आता कळलंय , आपल्यालाही चार भिंतींचं पक्कं घर असतं, मुकादमाच्या जागी आपल्या तांड्यावर कधीतर एखादा शिक्षक, डॉक्टर किंवा पोलिस फिरकला असता, तर त्यांच्याकडून समाजातलं काही वास्तव आधीच ऐकायला मिळालं असतं. सुरक्षित कसं राहायचं कळलं असतं. स्व-संरक्षणाची जाणीव झाली असती आणि कदाचित… त्या दोघीही देव-दर्शनालाच गेल्या होत्या देवळात. ज्या गरिबीच्या शापाने आपलं कोवळं बालपण खुडलं, त्यापासून मुक्त होण्यासाठी… दर्शन घेताना त्या म्हणाल्या असतील का आम्हालाही बागडू दे… आनंदात खेळू दे… देव तर पावलाच नाही. साक्षात्कार मात्र हैवानांचा झाला. समाजानं आणि व्यवस्थेनं पैदा केलेल्या हैवानांचा. (या ब्लॉगमधील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)

)







