मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

BLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे?

BLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे?

बारामती जिंकणं भाजपला शक्य आहे. काय वाटत बारामतीकरांना?

बारामती जिंकणं भाजपला शक्य आहे. काय वाटत बारामतीकरांना?

बारामती जिंकणं भाजपला शक्य आहे. काय वाटत बारामतीकरांना?

प्रा. हेमंत सुपेकर, बारामती

काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यामध्ये भाजपच्या आयटी सेलमध्ये काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना उद्देशून 'शरद पवारांना टार्गेट करा' हे आवाहन केले होते. तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा 'बारामतीत जिंकू' अशा प्रकारचे वक्तव्य मागच्या काही दिवसांपूर्वी केले होते. आज या गोष्टींचा इथे संदर्भ देण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री फडवणीस यांनीही काही दिवसांपूर्वी बुथ प्रतिनिधींच्या बैठकीत 'बारामती जिंकून दाखवू' अशा प्रकारचे पुन्हा पवारांना दिलेले आव्हान होय !

खरंच बारामती जिंकणे भाजपला शक्य आहे का? किंवा होईल का? आणि जर हे शक्य नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यावा? कारण येत्या 15 तारखेला स्वतः मुख्यमंत्री बारामतीमध्ये येत आहेत. त्यासाठी निमित्त ठरलंय ते खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण देशात अव्वल येत यशस्वीरित्या राबवलेल्या "वयोश्री" योजनेच्या कार्यक्रमाचं. त्यावेळी ते नेमके काय बोलतात हेही या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरेल. मुळात बारामती जिंकून दाखवू हे कार्यकर्त्यांना सांगण्यापाठीमागे हेतू काय असावा? याचा विचार केल्यास देशात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि त्यातून भाजपला पुन्हा सत्तेत येण्यासाठी निवडून आणाव्या लागणाऱ्या जागा यात बरंच काही सामावलेलं आहे.

विशेषतः मागील काही काळात विविध राज्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये झालेला भाजपचा पराभव. तसेच काही निवडणूक सर्वेक्षणांमध्ये दाखवण्यात आलेली व देशात निर्माण होऊ शकणारी त्रिशंकू परिस्थिती. ज्यामध्ये भाजपची घटणारी खासदारांची संख्या, विरोधकांची भाजप विरोधात होत असलेली एकजुट, उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून मायावती व अखिलेश यांनी भाजपसमोर उभे केलेले आव्हान. त्यामुळे होणारे नुकसान, या सर्व परिस्थितीत व एकूणच मोदी सरकार विषयी 2014च्या तुलनेत जनतेत वाढलेली नाराजी याचा अंदाज घेत देशातून दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्रातून जर निवडणुकीत जास्तीचे काही हाती लागणार असेल आणि ते मिळावे म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साह व जोश वाढवण्यासाठी केलेली ही राजकीय विधाने आहेत असंच प्रथमदर्शनी म्हणावे लागेल. एकूणच बारामती म्हणजेच पवारांवर थेट हल्ला केल्याने जर महाराष्ट्रामध्ये राजकीय फायदा होत असेल तर असे हल्ले आणि विधानं येत्या काळातही केली जातील यात नवल वाटण्यासारखे काही नाही. दुसऱ्या बाजूला आज विरोधी महाआघाडी मध्ये स्वतः शरद पवार पार पाडत असलेली भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. हा सुद्धा या वक्तव्यामागील एक उद्देश असू शकतो. परंतु या सर्वांमध्ये जो महत्त्वाचा प्रश्न प्रामुख्याने पुढे येतो तो म्हणजे भाजप खरंच बारामती जिंकू शकेल?

भाजप बारामती जिंकू शकेल का? या प्रश्नाचा वेध घेत असताना प्रथम खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांचे बारामती मतदार संघातील काम आणि विरोधकांना या मतदारसंघात असलेली संधी याविषयी बोलावे लागेल. एक खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांचे काम अतिशय उत्कृष्ट अशा स्वरूपाचे आहे. कारण त्यांच्या कामाची पावती म्हणूनच त्यांना सलग सहा वेळा मिळालेला "संसदरत्न" पुरस्कार असेल किंवा सलग तीन वर्षे मिळालेला "श्रेष्ठ सांसद अवॉर्ड" किंवा जागतिक स्तरावरील युनिसेफचा "पार्लिमेंटरी अवार्ड फॉर चिल्ड्रन" असेल, अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. बरोबरीने बारामती मतदारसंघातील त्यांच्या काही प्रमुख कामांचा आढावा घ्यायचा झाल्यास "राष्ट्रीय पेयजल"मधून केलेली कोट्यवधींची कामे, हजारो विद्यार्थिनी व आशा वर्कर्स यांना वाटल्या गेलेल्या मोफत सायकल, पुणे-दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण व लोकल सेवा, देशात सर्वात सक्षमपणे राबवलेली "वयोश्री" योजना, गावागावातून उभारलेले रस्त्यांचे जाळे, पासपोर्ट केंद्र, प्रत्येक तालुक्यात महिलांसाठी उभी केलेली बचत गटांची चळवळ, रेल्वे स्थानकांची निर्मिती, तिर्थक्षेत्रांचा विकास, मोफत आरोग्य शस्त्रक्रिया, जलसंधारणाची कामे, मतदार संघातील प्रत्येक अंगणवाडीत वीज व स्वच्छ पाणी पुरवणे, विविध शिबिरे व महोत्सव (भिम महोत्सव, आठवडी बाजार गावरान खाद्य महोत्सव) या आणि अशा कित्येक गोष्टींमधून मतदारसंघात उभे केलेले काम व बरोबरीने शरद पवारांपासून बारामती मतदारसंघात उभे असलेले कार्यकर्त्यांचे थेट गाव पातळी पर्यंतचे जाळे, संपर्क यंत्रणा व वैयक्तिक सलोख्याचे संबंध, या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे बारामती हा पवार कुटुंबाचा एक अभेद्य असा राजकीय गड आहे हेच म्हणावे लागेल.

दुसरी जमेची बाजू म्हणजे बारामतीच्या मातीशी शरद पवार यांची नाळ जवळपास तीन पिढ्यांपासून जुळलेली आहे. आजही बारामतीतील व्यक्तींना शरद पवार नावानीशी ओळखतात. शिवाय, बारामतीचा केलेला विकास पाहता बारामतीमध्ये जिंकण भाजपला एका मोठ्ठं आव्हान असणार आहे.

ज्यावेळी विरोधकांच्या दुसऱ्या बाजूची चर्चा होते, ज्यामध्ये मागील निवडणुकीमध्ये मोदी लाटेत सुप्रिया सुळेंना कमी मताधिक्क्याने मिळालेल्या विजयाची कारणमीमांसा करता येईल. त्यात प्रामुख्याने जे महत्वाचे मुद्दे कारणीभूत होते ते म्हणजे त्यावेळी असलेली प्रचंड राजकीय "मोदी लाट". बारामतीत झालेले धनगर आरक्षण आंदोलन, राजू शेट्टींनी ऊस पट्ट्यात विशेषतः बारामतीत केलेले आंदोलन, शहरी मध्यमवर्गीय मतदारांचे भाजप प्रति तयार झालेले आकर्षण व मोदीप्रेम या आणि अशा सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून त्यावेळी सुप्रिया सुळेंना मिळालेल्या कमी मताधिक्याकडे पहावे लागेल.

आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2014च्या मताधिक्याकडे बोट दाखवून भाजप नेते आपणही "बारामती जिंकू शकतो" हा विश्वास कार्यकर्त्यांना देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बरोबरीने गेल्या पाच वर्षात बारामती मतदारसंघातील काही असंतुष्ट किंवा नाराज गटांना हाताशी धरून कमळ चिन्ह हाती देण्यात मुख्यमंत्री व पालक मंत्री काहीसे यशस्वी सुद्धा ठरले आहेत. सोबतच भाजपकडून सुद्धा बुथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी प्रयत्न या मतदारसंघात सुरूच आहेत. सरकारच्या विविध योजना, जाहिराती आणि आश्वासने ही सुद्धा कामाला यावीत अशी अपेक्षा भाजप आणि त्यांच्या नेत्यांना बारामती विजयासाठी असणारच.

परंतु गेल्या निवडणुकीत घटलेल्या मताधिक्यातून बाहेर पडून खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या पाच वर्षात बारामती मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. वैयक्तिक कामे, सार्वजनिक हिताची कामे, राज्याच्या व केंद्राच्या योजनांमधून जास्तीत जास्त निधी आणून मोठी कामं गेल्या पाच वर्षात केल्याचे दिसून येते. प्रत्येक वाडी, वस्ती, शहरी भाग, सोसायट्या आणि मतदारसंघातील कुटुंबे या सर्वांपर्यंत त्या वैयक्तिकरित्या पोहोचलेल्या आहेत. जुन्या व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची एक खूप मोठी फळी त्यांनी गेल्या पाच वर्षात पुन्हा नव्याने उभी केलेली लक्षात येते. त्यामुळे कदाचित बारामती मतदारसंघाचा वेध घेणे आज तरी भाजप नेत्यांना शक्य होईल असे दिसत नाही.

बरोबरीने विरोधकांकडे संपूर्ण बारामती मतदारसंघात स्वीकृत होईल आणि पूर्ण ताकतीनिशी लढत देईल असा चेहरा निवडण्यापासूनच आव्हान असेल. तसेच आज जी नावे बारामती मतदारसंघात भाजपकडून घेतली जातात त्यांच्याही मर्यादा स्पष्ट आहेत. उदा. महादेव जानकर यांनी ज्या धनगर आरक्षणाच्या मुद्यावर बारामती मतदारसंघामधून मते मिळवली होती व धनगर आरक्षणाचा राजकीय फायदा भाजपला मिळवून दिला होता तोच धनगर आरक्षण प्रश्न सोडविण्यात भाजपला आलेले अपयश. शेतकरी प्रश्नांवर बदललेल्या भाजपच्या भूमिकेमुळे राजू शेट्टी यांनी भाजपची सोडलेली साथ, मध्यमवर्गीय लोकांचे जिव्हाळ्याचे असे "महागाई", "बेरोजगारी", "महिला सुरक्षा" अशा विषयांवरही भाजप बऱ्याच प्रमाणात मागे पडलेली दिसून येते. त्यामुळे एकूणच सर्व चित्र पाहता यावेळी तरी भाजप बारामती मतदारसंघातील विजयापासून बरेच दूर राहील असेच काहीसे चित्र असू शकेल.

त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा, मंत्री गिरीश महाजन किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "बारामती" बाबतीत केलेली विधाने हे फक्त एक राजकीय चातुर्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, त्या माध्यमातून एका बाजूला थेट विरोधी गोटातील सेनापतीवर हल्ला करून स्वतःच्या कार्यकर्त्यांचे वाढवले जाणारे मनोबल व उत्साह. सोबतंच देशातील महाघाडीचे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या शरद पवारांना स्वतःच्याच मतदारसंघात आव्हान देऊन गुंतवून ठेवणे हे असू शकते.

भविष्यात काय होईल हे आज सांगणे अवघड आहे. परंतु, 2019च्या येणाऱ्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचे पारडे भाजप उमेदवारापेक्षा जड असेल हे नक्की.

(लेखक बारामतीतल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. ब्लॉगमध्ये व्यक्त झालेलं मत हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. लेखकाच्या मताशी 'न्यूज18 लोकमत' सहमत असेलच असे नाही.)

First published:

Tags: Lok sabha election 2019