मुंबई, 17 ऑक्टोबर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे. परिणामी मार्केटमध्ये इंधनाचे विविध पर्याय उपलब्ध होत आहेत. इतर इंधन पर्यायांच्या तुलनेत सीएनजी लोकप्रिय होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी हे स्वस्त आणि स्वच्छ पर्यायी इंधन मानले जाते. याच कारणामुळे भारतातील अनेक कार उत्पादक कारच्या सीएनजी व्हेरिएंटवर लक्ष केंद्रित करत आहेत. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि ह्युंदाईने अनेक सीएनजी मॉडेल लॉन्च केले आहेत, जे पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही इंधनावर चालतात. भारतीय बाजारपेठेतील मारुती सुझुकी वॅगनआर, टाटा टियागो, टाटा टिगोर, ह्युंदाई ऑरा आणि ह्युंदाई सॅन्ट्रो यासारख्या अनेक लोकप्रिय मॉडेल्समध्ये पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी-फिट सीएनजी किट आहेत. या गाड्यांचे पेट्रोल इंजिन फोसिल तसेच सीएनजीवर चालू शकते. आजच्या काळात सीएनजी कार घेणे योग्य निर्णय आहे की नाही? ते आता पाहू. सीएनजी कार जास्त मायलेज देते एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की पेट्रोल आणि डिझेल सारख्या जीवाश्म इंधनांपेक्षा सीएनजी वाहने 80 टक्के कमी कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जित करतात. सीएनजी इतर जीवाश्म इंधनांच्या तुलनेत सुमारे 45 टक्के कमी हायड्रोकार्बन तयार करते हे देखील सिद्ध झाले आहे. याशिवाय देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजीची किंमत पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत कमी आहे. तसेच सीएनजी कार पेट्रोल-डिझेलपेक्षा जास्त मायलेज देतात. वाचा - दिवाळीआधी बदलले पेट्रोल-डिझेलचे दर, तुमच्या शहरातील पाहा आजचे रेट कार इंजिनसाठी सीएनजी योग्य आहे का? सीएनजी हा वाहनाच्या इंजिनसाठी सर्वात स्वच्छ इंधन प्रकारांपैकी एक मानला जातो. पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत ते फारच कमी अवशेष सोडते. सीएनजी ज्वलनातून पेट्रोल किंवा डिझेलसारखे कण उत्सर्जित होत नाही. यामुळे इंजिनच्या पाईप्स आणि ट्यूबला कमी नुकसान होते, परिणामी इंजिनचे आयुर्मान वाढते.
पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी सुरक्षित सीएनजी पेट्रोल किंवा डिझेलप्रमाणे द्रव स्वरूपात येत नाही. गॅस असल्याने तो पेट्रोल आणि डिझेलपेक्षा वेगाने पसरतो आणि त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनाच्या तुलनेत सीएनजी वाहनाला आग लागण्याची शक्यता कमी असते. सीएनजी सिलिंडर सामान्यतः पेट्रोल किंवा डिझेल टाक्यांपेक्षा अधिक मजबूत बनवले जातात. तसेच, सीएनजीचा प्रज्वलन बिंदू 540-डिग्री सेल्सिअस आहे, जो पेट्रोल किंवा डिझेलच्या इग्निशन पॉइंटपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी अधिक सुरक्षित आहे.