मुंबई, 1० नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हावं म्हणून सरकारही लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावं म्हणून प्रोत्साहनपर अनुदान देत आहे. लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढलेला कल पाहून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. अलीकडच्या काळात वाहन कंपन्यांनी अनेक इलेक्ट्रिक कार मॉडेल बाजारात लाँच केली आहेत. आता मुंबई स्थित EV स्टार्टअप PMV इलेक्ट्रिक 16 नोव्हेंबर 2022 रोजी आपली पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक मायक्रो कार लाँच करण्यासाठी सज्ज आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरणार आहे. ही कार लाँच झाल्यानंतर बजेट कमी असणाऱ्या लोकांचंही इलेक्ट्रिक कार खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. EAS-E असं कारचं नाव- मुंबई-स्थित EV स्टार्टअप PMV इलेक्ट्रिक लवकरच आपली पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक मायक्रो कार लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. या कारचं नाव EAS-E असं आहे. ही कार एका नवीन सेगमेंटमध्ये लाँच केली जाणार आहे. याला पर्सनल मोबिलिटी व्हेईकल (PMV) सेगमेंट म्हटलं जात आहे. हेही वाचा: Car insurance रिन्यू करताय? मग लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर… एका चार्जमध्ये 200 किमी रेंज- EAS-E ही कार तीन व्हेरियंटमध्ये ऑफर केली जाईल. ती 120 किमी ते 200 किमीची रेंज देईल, असा दावा कंपनीनं केला आहे. या स्मार्ट इलेक्ट्रिक कारला 3 किलोवॅट एसी चार्जरसह 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. ही आकाराने खूपच लहान आहे आणि तिचे वजन फक्त 550 किलो आहे.
फीचर्स- डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, यूएसबी चार्जिंग पॉइंट, एअर कंडिशनिंग, रिमोट कीलेस एंट्री आणि रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल इत्यादी फीचर्स मिळतात. सध्या तिच्या सुरक्षा रेटिंगबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. नवीन इलेक्ट्रिक कारची किंमत 4 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान असेल आणि इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ते बुक करू शकतात.