मुंबई, 28 सप्टेंबर: वाढते इंधनदर आणि प्रदूषणाची समस्या बघता इलेक्ट्रिक बाईक आणि कार खरेदीकडे लोकांचा कल हळूहळू वाढत आहे. सरकारदेखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक आणि कार उपलब्ध आहेत. या दोन्ही वाहनांमध्ये फीचर्सदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा टियागो ही कार आज (28 सप्टेंबर 22) लॉंच करत आहे. या हॅचबॅक इलेक्ट्रिक कारमध्ये खास फीचर्स देण्यात आली आहेत. इलेक्ट्रिक कारला असलेली मागणी पाहता टाटाने मार्केटवर आपली पकड अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा टियागोचं लॉंचिंग हा त्याचाच एक भाग मानला जात आहे. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये अजून एक कार लॉंच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आज (बुधवार, 28 सप्टेंबर) टाटा टियागो हे मॉडेल लॉंच करत आहे. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक व्हेईकल पोर्टफोलियो वर नजर टाकल्यास त्यात नेक्सन आणि टिगोर या कार या पूर्वीपासून समाविष्ट असल्याचं दिसतं. भारतीय मार्केटमध्ये नेक्सन इलेक्ट्रिकला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता टियागो लॉंच करून कंपनी हॅचबॅक इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही आपला दावा सादर करेल. येत्या पाच वर्षांत टाटा मोटर्सने 10 इलेक्ट्रिक व्हेईकल मॉडेल्स लॉंच करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. टियागो इलेक्ट्रिक हा त्याचाच एक भाग आहे. टाटा मोटर्सने नेक्सन ईव्ही आणि टिगोर ईव्हीच्या माध्यमातून देशातील इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल मार्केटमध्ये 88 टक्के वाटा मिळवला आहे. कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये नेक्सन ईव्ही प्राइम, नेक्सन ईव्ही मॅक्स आणि टिगोर ईव्हीसह 3845 इलेक्ट्रिक व्हेईकल्सची विक्री केली आहे. टाटा मोटर्स आधीच देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक व्हेईकल्सपैकी एक असलेल्या टिगोर ईव्हीची विक्री करत आहे. या कारची किंमत 12.49 लाख रुपये आहे. दुसरीकडे अन्य इलेक्ट्रिक व्हेईकल उत्पादक कंपन्या ज्या कार लॉंच करत आहेत, त्यांची किंमत 20 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच ईव्ही उत्पादक त्यांची वाहनं 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहेत. हेही वाचा: Electric Vehicle: व्हेईकल नेमकं कसं काम करतं? समजून घ्या सोप्या शब्दात नवीन टियागो ईव्हीमध्ये क्रुझ कंट्रोलसारखी फीचर्स असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारचा चार्जिंग कालावधी टिगोर ईव्ही इतका असू शकतो. टियागो ईव्ही सुमारे 65 मिनिटांमध्ये 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. टाटा टियागो इलेक्ट्रिक हॅचबॅकमध्ये एक टच स्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट असेल. याशिवाय की-लेस एंट्री, पॉवर विंडो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड ओआरव्हिएम, एक ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि खास सेफ्टी फीचर्स मिळतील.
टाटा टियागो इलेक्ट्रिकच्या किमतीचा विचार करायचा झाला तर ही कार 10 लाख रुपयांच्या रेंजमध्ये येऊ शकते. ही देशातली सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल, असा दावा कंपनीनं केला आहे. ही कार उत्तम रेंजसह उपलब्ध होईल. सिंगल चार्जवर ही कार सुमारे 300 किलोमीटर अंतर पार करेल. या कारमध्ये 26kWh बॅटरी पॅक असेल.