मुंबई, 25 जुलै : अस्सल भारतीय कंपनी टाटा मोटर्सने मागील दोन वर्षात मार्केटमध्ये आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. अलीकडे लाँच झालेली टाटाची Nexon भारतातील सर्वात मजबूत गाडी असल्याचा बहुमान पटाकावला आहे. Nexon चं नाहीतर टाटा नॅनोनंही आपली बिल्ड क्वालिटी किती चांगली होती, हे एका अपघातातून दाखवून दिलं आहे.
टाटा नॅनो आणि होंडा सिटीच्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा अपघात मागील महिन्यातील 24 जून रोजी घडला होता. हा अपघात केरळमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे. यात होंडा सिटीने पाठीमागून एका टाटा नॅनोला धडक दिली आहे. यात नॅनोचे अत्यंत किरकोळ नुकसान झाले आहे. तर होंडा सिटीचा समोरील भागाचा पार चुराडा झाला आहे.
या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, भरधाव वेगात होंडा सिटी कार येत आहे. रस्त्यावर एक स्पीड ब्रेकर असल्यामुळे समोरील वाहनं वेग कमी करून पुढे जात होती. त्याच वेळी ही भरधाव होंडा सिटी कार थेट टाटाच्या नॅनोवर येऊन आदळली. व्हिडिओवरुन असे वाटते की, चालकाचा गाडीवरच ताबा सुटला आणि ब्रेक ऐवजी चुकून त्याने एक्सिलेटवर पाय ठेवला. त्यामुळे कारने धडक दिली.
बरं, होंडा सिटी कारही तब्बल 12 ते 14 लाख किंमतीची आहे. तर टाटाची नॅनो तिच्या पुढे फार फार 2 लाखांच्या आसपास असेल. पण, या अपघातात पाठीमागून धडक देऊनही टाटा नॅनोचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. उलट होंडा सिटी कारच्या बोनेटचा पार चुराडा झाला आहे. इंजिनवर असलेला पत्राही चांगलाच वाकला आहे.
पाठीमागून धडक बसलेल्या टाटा नॅनोचा फोटो जर पाहिला तर नंबर प्लेट आणि बॉडी थोडी वाकली आहे. याच कारण म्हणजे, टाटा नॅनोचे इंजिन हे मागच्या बाजूने आहे. इंजिन बसवण्यासाठी तिथे लोखंडी रॉडचा एक पाईप लावलेला आहे. पण, तरीही होंडा सिटी कार आणि तिची किंमत पाहिली असता, थोडी तरी क्वालिटी ठेवायला पाहिजे की नाही? असा सवाल विचारला जात आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकार टाटा नॅनोसोबतच झाला नाही. अनेक अपघातात टाटाच्या गाड्यांची गुणवत्ताही सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक अपघातात टाटांच्या गाड्यांचे नुकसान हे कमी झाले आहे, तसंच कार चालकांचाही जीव वाचला आहे.