नवी दिल्ली, 10 डिसेंबर : एखाद्या व्यक्तीला मृत्यू कधी होणार आहे हे अगोदरच कळलं तर? अनेक अभ्यासात असं आढळून आलं आहे, की मृत्यूची कल्पना मनात आल्यावर अनेक व्यक्ती चांगलं काम करू लागतात. जगात, समाजात चांगला बदल कसा घडवता येईल, अशा कृती करण्याचा प्रयत्न करतात. विज्ञानात मोठी प्रगती होऊनही मृत्यूबद्दल नेमका अंदाज बांधणं आतापर्यंत शक्य झालेलं नाही. आता मात्र कोणाचा मृत्यू होणार आहे, हे एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आधी कळू शकेल, असा दावा करण्यात येत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मृत्यूचा वेध घेण्याचं संशोधन सुरू आहे. दुसरीकडे वैज्ञानिकांचा समुदाय आध्यात्मिक-वैज्ञानिक बाबींचा एकत्र अभ्यास करण्याचा आग्रह धरत आहे. त्यांचा असा विश्वास आहे, की काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास मृत्यू जवळ आला आहे हे समजू शकतं. मृत्यूचीही काही लक्षणं असतात, फक्त ती पाहण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, मृत्यू जवळ असलेल्यांचा आहार, संभाषण आदी बाबी पूर्णपणे बदलतात. या व्यक्ती अनेकदा मृतांबद्दल बोलतात. हे एक प्रकारचे चिन्ह आहे, जे मृत्यू जवळ आल्याचे संकेत देतं.
हे ही वाचा : फोनवर संभाषण सुरू असताना विचित्र आवाज ऐकू आल्यास व्हा सावध; असू शकतात 'या' गोष्टीचे संकेत
ऑस्ट्रेलियन विज्ञान पत्रकार बियान्का नोग्राडी यांनी 'द एंड-ह्युमन एक्सपीरिअन्स ऑफ डेथ' या पुस्तकात अलीकडेच कुटुंबातल्या सदस्याचा मृत्यू पाहिलेल्यांच्या मुलाखती गोळा केल्या आहेत. या वेगवेगळ्या मुलाखतींमध्येही त्यांनी अशाच गोष्टी सांगितल्या. त्यातच आता मृत्यूचं भाकीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सांगता येऊ शकते, असा दावा केला जातोय. त्याबद्दल जाणून घेऊ या.
नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीने हा अभ्यास ब्रिटिश व्यक्तींवर केला होता. 40 ते 69 वर्षं वयोगटातल्या सुमारे हजार व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. हे रुग्ण मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या जीवनशैलीविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. रुग्णांची प्रकृती कोणत्या परिस्थितीत अधिक गंभीर होते किंवा त्यांचा मृत्यू होऊ शकतो, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने हॉस्पिटलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, हा अभ्यास अकाली मृत्यूची चिन्हं समजून घेण्याबद्दल अंदाज व्यक्त करतो, वयानुसार आपोआप होणाऱ्या मृत्यूबद्दल नाही.
या अभ्यासातून अनेक विशेष गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे, की हे एक प्रकारे मृत्यू शोधण्यासारखंच आहे. यासोबतच या अभ्यासाचा असा फायदाही असू शकेल, की विशिष्ट परिस्थितीत मृत्यूचा काळ समजला, तर ज्या रुग्णांचा मृत्यू जवळ आला आहे, त्या रुग्णांऐवजी जे जगण्याची शक्यता जास्त आहे, त्यांच्याकडे डॉक्टर लक्ष देऊ शकतील.
या अभ्यासाबाबतची सर्व माहिती PloS One सायन्स जर्नलमध्ये देण्यात आली आहे. काही वेगळे बायोमार्कर पाहून पुढील दोन ते पाच वर्षांत रुग्णाचा मृत्यू होईल की नाही, हे तज्ज्ञ ठरवू शकतील. अंदाज चाचणीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठी भूमिका बजावेल. हा अभ्यास सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे त्याचे दावे कितपत खरे आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
हे ही वाचा : हिवाळ्यात कार चालवताना 'ही' चूक कधीही करू नका, अन्यथा...
पेनसिल्व्हानियाच्या गेसिंजर हेल्थकेअर सिस्टीममध्ये एका दशकाहून अधिक काळ हा अभ्यास केला जात होता. त्याचे निष्कर्ष गेल्या वर्षी समोर आले. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स केवळ इकोकार्डियोग्राम व्हिडिओ पाहून मृत्यू ओळखू शकत नाही. परंतु रुग्णाचा एक वर्षाच्या आत मृत्यू होईल का, याचा अंदाज लावता येईल. अभ्यासादरम्यान, 8.25 लाखांहून अधिक इकोकार्डियोग्राम पाहण्यात आले आणि नव्वद टक्के प्रकरणांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अंदाज बरोबर असल्याचं आढळून आलं. हा पेनसिल्व्हेनियाचा अभ्यास नेचर बायोमेडिकल इंजिनीअरिंग या सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
डोळ्यांकडे पाहून कळेल मृत्यूची वेळ?
या वर्षाच्या सुरुवातीला आणखी एक अभ्यास समोर आला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता, की डोळ्यांकडे पाहून मृत्यूची वेळ सांगता येऊ शकेल. हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर केलेल्या अभ्यासात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने डोळ्यांतला पडदा स्कॅन केला आणि मृत्यूच्या वेळेचा अंदाज लावला. अशा प्रकारे सुमारे 1800 जणांच्या मृत्यूचा अचूक अंदाज लावला गेला. या अशा व्यक्ती होत्या, ज्यांच्या डोळ्यांतला पडदा वेळेपूर्वी वृद्ध झाला होता.
डोळ्यांकडे पाहून माणसाचं जैविक वय आधीच कळतं. वृद्धत्व डोळ्यांमध्ये लवकर येत असेल, तर याचा अर्थ असा होतो की, व्यक्तीची चुकीची जीवनशैली त्याला अकाली वृद्धत्व आणि मृत्यूकडे नेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.