नवी दिल्ली, 31 डिसेंबर : बाजारात असंख्य प्रकारची वेगवेगळी वाहनं उपलब्ध आहेत. कारची आवड असणारे अनेक लोक तर दर पाच-सहा वर्षांनी त्यांची कार बदलत असतात. बाजारातील अत्याधुनिक वाहन आपल्याजवळ असायला हवं, असं अनेकांना वाटत असतं. वाहन खरेदी केल्यानंतर अनेक जण त्याच्या सुशोभीकरणासाठी मोठी रक्कमही खर्च करतात. महागड्या विविधरंगी ॲक्सेसरीजची खरेदीही केली जाते. वाहन कितीही महागडं असू द्या पण त्यांचे टायर मात्र काळ्या रंगाचेच असतात, यामागचे कारण काय असेल असा प्रश्न अनेकदा पडतो. पण टायरला दीर्घायू देण्यासाठी रबरसोबत वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे त्यांचा रंग काळा बनतो. ‘झी न्यूज हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.
रस्त्यावर धावणारी वाहनं आता प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनली आहेत. दररोजच्या कामासाठी या वाहनांचा उपयोग करावा लागतो. बाईक, कार किंवा इतर कुठलीही वाहनखरेदी करण्यासाठी आपण जेव्हा शोरूममध्ये जातो त्यावेळी काळ्या रंगासह विविध रंगांची वाहने पाहायला मिळतात. बहुतांश वेळा विविध रंगांतील वाहनं खरेदी करण्याकडे ओढा असतो. परंतु प्रत्येक वाहनाच्या टायरचा रंग काळाच का असतो, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. केवळ भारतातच नव्हे तर परदेशामध्ये उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही वाहनाच्या टायरचा रंग काळात का असतो असं कोडं अनेकांना पडतं.
टायरचा रंग काळा असण्याचे कारण काय?
वाहननिर्मिती करणारी जगातील कुठलीही कंपनी वाहनाच्या टायरचा रंग काळाच ठेवत असते. यामागे वैज्ञानिक कारण सांगितले जाते. एका रिपोर्टनुसार, कच्चे रबर हे मूळत: पिवळ्या रंगाचे असते. परंतु या रबरपासून निर्माण केले जाणारे टायर लवकर घासले जातात. त्यामुळे टायर बनवत असताना रबरमध्ये कार्बन मिक्स करण्यात येते. रबरमध्ये कार्बन वापरले तर टायरचे आयुर्मान वाढते. टायरला मजबुती देण्यासाठी मिक्स केल्या जाणाऱ्या कार्बनमुळे टायरला काळा रंग प्राप्त होतो. कार्बनसह यात सल्फर मिक्स करण्यात येतो. त्यामुळे टायरला मजबुतीही मिळते.
टायरला इतर कोणताही रंग का नसतो?
कधी एकेकाळी वाहनाचे टायर पांढऱ्या रंगाचे होते असे म्हटले तर विश्वास बसणार नाही. पण ही बाब सत्य आहे. सद्यस्थितीत वापरल्या जाणाऱ्या काळा रंगाच्या टायरच्या तुलनेत पांढऱ्या रंगाचे टायर कमी मजबूत होते. लहान मुलांची सायकल पाहिली असता त्याला विविधरंगी टायर वापरले जातात. परंतु हे टायर काही महिन्यातच घासून खराब होतात. कारण यात कार्बनचा वापर केला जात नाही. एका रिपोर्टनुसार, साध्या रबरचा वापर करून तयार करण्यात आलेले टायर 8 हजार किलोमीटरपर्यंत चालतात. तर, कार्बनयुक्त रबरचे टायर मात्र एक लाख किलोमीटर चालू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.