मुंबई, 21 ऑगस्ट: अलीकडच्या काळात भारतामध्ये इलेक्ट्रिक कारच्या (Electric Car) विक्रीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळं मोठा वर्ग इलेक्ट्रिक वाहनांकडं वळला आहे. सध्या अनेक कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक वाहनं बाजारात लाँच करत आहेत. असं असलं तरी भारतातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटाची प्रसिद्ध एसयूव्ही टाटा नेक्सॉनचं (Tata Nexon) निर्विदाद वर्चस्व आहे. नेक्सॉनच्या याच वर्चस्वाला आव्हान देऊ शकेल अशी एसयूव्ही महिंद्रा लवकरच लाँच करणार आहे. महिंद्रा भारतात 6 सप्टेंबर रोजी XUV300 ची इलेक्ट्रिक आवृत्ती (Upcoming Electric Car of Mahindra) लॉन्च करण्याची योजना आखत आहे. या कारला महिंद्रानं XUV400 असं नाव दिलं आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची लांबी 4.2 मीटर असेल. तिची प्रतिस्पर्धी Nexon EV ची लांबी 3.9-मीटर आहे. रिपोर्टनुसार, XUV400 एका चार्जवर 350-400 किमीची रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीनं केलाय. तर टाटा Nexon EV ची रेंज 312 किमी आहे आणि Nexon EV Max ची रेंज 437 किमी आहे. XUV 400 प्रथम ऑटो एक्सपो 2020 मध्ये KUV च्या इलेक्ट्रिक व्हेरियंटसह प्रदर्शित करण्यात आली होती.
XUV 400 फीचर्स-
XUV 400 EV विविध कनेक्टेड तंत्रज्ञानासह येईल. ADAS, DRLs, क्लोज-ऑफ फ्रंट ग्रिल, पुन्हा डिझाइन केलेल्या टेल लॅम्प्ससह नवीन हेडलाइट मिळण्याची शक्यता आहे. कारला नवीन डिझाइन केलेल्या लाइटिंग एलिमेंट्ससह एलईडी टेललाइट देखील मिळेल. तसेच Adreno X इन्फोटेनमेंट सिस्टमसह मोठी टचस्क्रीन सिस्टीम मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- बेस्टच! 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत ‘हे’ 5 स्मार्टफोन; फिचर्सही आहेत खास
XUV 400 किंमत-
XUV 400 EV ची किंमत जवळपास 15 लाख रुपये असू शकते. त्यामुळे तिची थेट स्पर्धा टाटा नेक्सॉन ईव्हीशी होणार आहे.
असा आहे महिंद्राचा प्लॅन-
कंपनीने अलीकडेच इलेक्ट्रिक कारसाठी BE आणि XUV हे दोन नवीन प्लॅटफॉर्म सादर केले आहेत. नवीन इलेक्ट्रिक SUV लाँच करून भारतातील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवण्याची महिंद्राची योजना आहे. नवीन BE आणि XUV ब्रँड्स अंतर्गत येणाऱ्या वाहनांमध्ये फ्यूचरिस्टिक डिझाइन पाहायला मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Electric vehicles