मुंबई, 15 सप्टेंबर: इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहेत. वायू प्रदूषणामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर लोक इलेक्ट्रिक कार आणि दुचाकीचा पर्याय निवडताना दिसत आहेत. सध्या भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि कार उपलब्ध आहेत. एकीकडे प्रदूषण आणि इंधनाची समस्या असताना दुसरीकडे मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्न जटिल होत आहे. यावरदेखील काही उपाययोजना होते का याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. त्यातच सध्या उडती कार (Flying Car) चर्चेत आहे. भारतातही येत्या काही वर्षांत ही कार उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. दरम्यान, स्वीडनमधील एका स्टार्टअप कंपनीनं लॉंच केलेली उडती इलेक्ट्रिक कार ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या कारच्या विक्रीला ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. अल्पावधीतच या उडत्या कारच्या सर्व युनिट्सची विक्री झाली आहे. स्वीडन येथील इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप जेटसनने एका फ्लाईंग अर्थात उडत्या कारची निर्मिती केली आहे. या कारला मोठी मागणी असल्याचं चित्र आहे. कंपनीनं नुकतीच जेटसन वन (Jetson One) या इलेक्ट्रिक फ्लाईंग कारची विक्री सुरू केली आणि अल्पावधीतच सर्व युनिट्ची विक्री झाली आहे. यावरून लोकांना उडत्या कारबाबत किती उत्सुकता आहे हे दिसून येतं. जेटसन कंपनीनं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात `जेटसन वन` ही उडती कार लॉंच केली होती. लॉंच झाल्यानंतर या कारला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळू लागला आणि या वर्षासाठी राखून ठेवलेला स्टॉक हातोहात विक्री झाला. ही कार चालवण्यास अत्यंत सोपी आहे. सध्या कंपनी जेटसन वन इलेक्ट्रिक फ्लाईंग कारची विक्री केवळ अमेरिकेत करत आहे. या उडत्या कारमध्ये खास फीचर्स आहेत. तसंच या कारमधलं तंत्रज्ञानदेखील काहीसं वेगळं आहे. हेही वाचा: CNG Kit for Scooter: तुमची स्कूटर देईल 130 किमीचं मायलेज, फक्त करा हे काम जेटसन वन फ्लाईंग कार पृष्ठभागापासून 1500 फूट उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम आहे. बॅटरीवर चालणारी ही उडती कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 32 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. याशिवाय जेटसन वन ताशी 102 किलोमीटरचा कमाल वेग पकडू शकते. वृत्तानुसार, जेटसन कंपनीच्या या उडत्या कारची किंमत 90,000 अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 71 लाख रुपये आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये सुमारे 20 मिनिटांपर्यंत सहज उडू शकते. चाचणीच्या वेळी ही कार 86 किलो वजनाच्या एका व्यक्तीसह 102 किमी प्रतितास इतक्या कमाल वेगानं इतका वेळ सहज उडू शकली. `ड्राईव्हस्पार्क`च्या रिपोर्टनुसार, कंपनीने जेटसन वनचा पूर्ण स्टॉक बुक झाला असल्याचं सांगितलं आहे. ग्राहकांना या कारची डिलिव्हरी मिळणं अद्याप बाकी आहे. कंपनी पुढील वर्षी या कारची डिलिव्हरी देणं सुरू करू शकते. तसंच जेटसन वन फ्लाईंग कारचं 2023 साठीचं बुकिंग पूर्ण झालं असून, कंपनीनं 2024 साठी बुकिंग घेणं सुरू केलं आहे. या कारचं बंपर बुकिंग पाहता, ही कार लोकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसून येतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.