मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या अनेक बदल घडत आहेत. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची अनेक नवीन मॉडेल्स लोकांना भुरळ घालताहेत. यंदाच्या गुढीपाडव्याला टॉप एसयूव्ही गाडी घेण्याचं तुमचं स्वप्न असेल, तर मात्र तुम्हाला थोडं थांबावं लागेल. कारण त्यांच्यासाठी काही महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. म्हणजेच तुम्ही बुक केलेली गाडी लगेच तुमच्या दारात उभी राहणार नाही. त्यामुळे नवी चारचाकी घेण्याचा विचार करत असाल, तर गाड्यांच्या वेटिंग टाईमबाबत माहिती करून घ्या.
महिंद्रा, ह्युंदाई, मारूती सुझुकी अशा काही कंपन्यांच्या एसयूव्ही गाड्या सध्या बाजारात लगेच उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे नवी एसयूव्ही गाडी विकत घेण्याचं नियोजन असेल, तर आधी गाड्यांचा वेटिंग टाइम जाणून घ्या. विशेषतः मारूती सुझुकीची ब्रेझा आणि ग्रँड व्हिटारा, टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस, अर्बन क्रूझर हायरायडर, महिंद्राच्या टॉप 3 एसयूव्ही आणि ह्युंदाईची क्रेटा गाडी घ्यायची असेल तर 8 महिने ते दीड वर्षापर्यंत थांबावं लागू शकतं.
ब्रेझासाठी 10 महिने प्रतीक्षा
मारूती सुझुकीची सगळ्यात जास्त चालणारी एसयूव्ही ब्रेझा तुम्हाला या महिन्यात घ्यायची असेल, तर वेगवेगळ्या मॉडेल्ससाठी वेगवेगळा वेटिंग टाइम पकडून साधारणपणे 10 महिने थांबावं लागेल. ग्रॅंड विटारा गाडीसाठी 6 महिने थांबावं लागू शकतं.
टोयोटासाठी वर्षापेक्षा जास्त थांबावं लागेल
टोयोटा कंपनीची इनोव्हा हायक्रॉस गाडी घेण्यासाठी अजून दीड वर्ष वाट पाहावी लागू शकते, तर अर्बन क्रूझर हायरायडर गाडी मिळण्यासाठी 15 महिने लागू शकतात.
महिंद्राच्या टॉप 3 एसयूव्हीसाठी भरपूर वेटिंग टाइम
महिंद्रा अँड महिंद्राच्या टॉप 3 एसयूव्ही गाड्यांसाठी सध्या लोकांना थांबावं लागणार आहे. महिंद्राच्या थार साठी तब्बल 17 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. स्कॉर्पियोसाठी 15 महिने तर एक्सयूव्ही 700 साठी 11 महिने थांबावं लागेल.
ह्युंदाई क्रेटासाठी 8 महिने वेटिंग पीरियड
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही क्रेटा या महिन्यात घ्यायची असेल, तर तुम्हाला अजून 8 महिने थांबावं लागेल. किआ मोटर्सच्या कारेन्स या 7 सीटर कारचा वेटिंग टाइम 11 महिन्यांचा आहे. सॉनेटसाठीही 9 महिने प्रतिक्षा करावी लागेल.
थोडक्यात देशातल्या टॉप मॉडेल्स एसयूव्ही गाड्या विकत घेण्यासाठी आता आणखी थोडं थांबावं लागेल. वेटिंग टाइम पाहूनच गाडी खरेदीचं नियोजन करा म्हणजे निराशा होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anand mahindra, Car, Gudi Padwa 2023, Lifestyle