मुंबई, 09 जुलै: तुम्हाला जर राष्ट्रीय महामार्गांवरून (National Highways) प्रवास करायचा असेल, तर तुमच्या वाहनांवर फास्टॅग (FASTag) असणं अनिवार्य आहे. आता देशभरातील सगळ्या टोल नाक्यांवर FASTag पद्धतीने टोल स्वीकारला जात असून सर्व वाहनधारकांना तो बंधनकारक करण्यात आला आहे. टोलनाक्यांवर वाहनांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि टोलनाक्यांवर जमा होणाऱ्या पैशांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं फास्टॅग लावणं सक्तीचं केलं आहे. ज्या वाहनांवर फास्टॅग नसतील, त्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो.
सरकारनं FASTag सक्ती केल्यानंतर अनेक वाहनधारकांनी आपापल्या वाहनांसाठी फास्टॅग लावून घेतले आहेत आणि अजूनही काही वाहनधारक फास्टॅग लावून घेत आहेत. मात्र फास्टॅग अनिवार्य झाल्यामुळे फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. अशी अनेक प्रकरणं आत्तापर्यंत समोर आली आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या फसवणूकीबाबत वाहनधारकांना सावध केलं आहे. NHAI किंवा IHMCL च्या नावानं अगदी हुबेहुब असे बनावट फास्टॅग विकले जात आहेत. पण ते वैध नाहीत, असा अलर्ट देण्यात आला आहे. थोडक्यात बनावट फास्टॅग विकून अनेक लोकांची फसवणूक केली जात आहे. म्हणूनच फास्टॅग विकत घेताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. बनावट फास्टॅगपासून वाचण्यासाठी आणि वैध फास्टॅग खरेदी करण्यासाठी काय करायला हवं, हे आज आपण पाहणार आहोत.
वैध फास्टॅग खरेदी कसा करायचा? (How to buy valid Fastag?)-
तुम्हाला बनावट फास्टॅग खरेदी करायचा नसेल आणि वैध फास्टॅग घ्यायचा असेल तर वैध फास्टॅग फक्त IHMCL च्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकेल. याशिवाय तुम्ही माय फास्टॅग अॅपच्या (MyFASTag App) माध्यमातूनदेखील वैध फास्टॅग खरेदी करु शकता. याशिवाय इतर काही अधिकृत ठिकाणांहूनदेखील फास्टॅग खरेदी करता येतो. काही बँका किंवा अधिकृत पीओएस एजंटदेखील फास्टॅग विक्री करत असतात. त्यांच्याकडूनही तुम्ही वैध फास्टॅग खरेदी करू शकता. ज्या बँकांमध्ये फास्टॅग विक्री केली जाते, अशा बँकांची यादी IHMCL च्या वेबसाईटवर उपलब्ध केली गेली आहे.
हेही वाचा: PAN Card: पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ? प्रत्येक नंबरमध्ये असते विशेष माहिती
फास्टॅग खरेदी करताना फसवणूक झाल्यास काय करावं? (What to do in case of fraud while buying Fastag?)-
फास्टॅग खरेदी करताना फसवणूकीची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या फसवणूकीची कोणतीही घटना समोर आल्यास तुम्ही त्याची तक्रार करायला हवी. NHAI च्या 1033 या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करून तुम्ही ही माहिती देऊ शकता किंवा मग etc.nodal@ihmcl.com वर देखील तुम्हाला तक्रार नोंदवता येऊ शकते.
फास्टॅगविषयी ही महत्त्वाची माहिती तुम्हाला माहीत असायला हवी-
सरकारने फास्टॅगची सक्ती केली असली, तरी त्याची किंमत सर्व वाहनांसाठी सारखी नाही. वाहनाचा प्रकार आणि ज्या माध्यमातून खरेदी करताय त्यानुसार फास्टॅगची किंमत ठरते. यामागचं कारण असं की, प्रत्येक बँकेचे फास्टॅग शुल्क आणि सिक्युरिटी डिपॉझिट्स याबाबतचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे फास्टॅगच्या किंमतीत थोडाफार फरक आढळतो.
फास्टॅग रिचार्ज करणंही सोपं आहे. त्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही घेतला आहे, त्या बँकेचं फास्टॅग वॉलेट वापरणं किंवा दुसरा मार्ग म्हणजे पेटीएम किंवा फोनपे यांसारख्या मोबाइल वॉलेट अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फास्टॅग रिचार्ज करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fastag, Financial fraud, Toll naka, Toll plaza