मुंबई, 3 ऑक्टोबर : इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागणे आणि बॅटरीचा स्फोट होणे या घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र, आता या अपघाताने एका निष्पाप मुलाचा जीव घेतला आहे. पालघर जिल्ह्यात एका ई-स्कूटरचा चार्जिंगदरम्यान अचानक स्फोट झाला. या स्फोटात सात वर्षांचा मुलगा सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या अपघाताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक स्कूटर असेल तर काय काळजी घ्यावी? चला जाणून घेऊ. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पालघरमधील वसई परिसरात ही घटना घडली. शब्बीर शाहनवाज असे 7 वर्षीय मृताचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ई-स्कूटरचा स्फोट का होतो? ई-स्कूटरमध्ये स्फोट होणे किंवा आग लागणे हे भारतात सामान्य झाले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याची बॅटरी. खर्चात कपात आणि चार्जिंगच्या समस्या लक्षात घेता, भारतातील कंपन्या 90 टक्के ई-स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरतात. त्यात लिथियमचे कण असतात. बॅटरी चार्जिंग दरम्यान, लिथियम कण गरम होतात आणि आग पकडतात. कधीकधी ते दबावाखाली इतके गरम होतात की त्यांचा स्फोट होतो. वाचा - जगातील पहिलं इलेक्ट्रिक विमान ‘अॅलिस’चं उड्डाण यशस्वी, ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये एवढा मोठा स्फोट का होतो? बॅटरीमधला स्फोट कधी कधी हँडग्रेनेडसारखा मोठा होतो. याचे कारण म्हणजे बॅटरी कॉम्पॅक्ट बॉक्समध्ये बनविली जाते आणि ती हवाबंद पॅक केली जाते. अशा परिस्थितीत, लिथियम कण गरम झाल्यामुळे, दाब तयार होतो आणि ते विस्तारू लागतात. यानंतर ते स्फोटकांसारखे बिहेव करतात आणि मोठा स्फोट होतो. बॅटरी बॉक्स आणि इतर कणांच्या स्फोटामुळे तुकडे हवेत वेगाने पसरतात. यात जर कोणी सापडला तर ते प्राणघातक ठरू शकतात. अपघात कसे टाळायचे? ई-स्कूटर कधीही घरात चार्ज करू नका, चार्जिंग पॉइंट घराबाहेर ठेवा. कंपनीने ई-स्कूटरच्या पूर्ण चार्जिंगसाठी सेट केलेल्या वेळेसाठी चार्ज करा. स्कूटर चार्जिंग पॉईंटची वायरिंग योग्य लावा, सैल झाल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. चार्जर व्यवस्थित ठेवा, त्याची वायर जास्त फिरवू नका, असे केल्याने वायर आतून खराब होते. चार्जिंग स्टेशनवर चार्ज करण्यापूर्वी, त्याचे आउटपुट निश्चितपणे तपासा, कार चार्जर्सचे आउटपुट जास्त आहे. अशा स्थितीत स्कूटरची बॅटरी खराब होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.