मुंबई, 6 सप्टेंबर: मोटार वाहन दुरुस्ती कायदा 2019 अंतर्गत, सीट बेल्ट न लावल्याचा दंड 100 रुपयांवरून 1,000 रुपये करण्यात आला आहे. परंतु तरीही या कायद्याचं पालन करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. जेव्हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हाच अशा कायद्यांकडे लक्ष वेधलं जातं. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं एका कार अपघातात निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर कारमध्ये मागील सीटबेल्टचा वापर फारच कमी असल्याची चर्चा होत आहे. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू कसा झाला? अत्यंत सुरक्षित मानली जाणारी मर्सिडीज जीएलएस 4 सप्टेंबर रोजी पुलाच्या दुभाजकाला धडकली. या कारमध्ये मिस्त्रीसोबत आणखी तीन जण होते. या अपघातात मागील सीटवर बसलेले मिस्त्री व जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला, तर समोर बसलेला प्रवासी व चालक जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल केल्यामुळं त्यांचे प्राण वाचले. रिपोर्ट्सनुसार, मिस्त्री आणि पांडोले दोघेही सीट बेल्ट न लावता मागील सीटवर बसले होते. एअरबॅग आणि उच्च सुरक्षा रेटिंग असलेल्या सुरक्षित कारमध्ये मिस्त्री पाठीमागील सीटवर सीटबेल्ट न लावता बसले होते. अपघात गंभीर जखमी होऊन ते ठार झाले. दरम्यान सीट बेल्ट न लावता मागच्या सीटवर बसलेले लोक वाईटरित्या जखमी किंवा ठार झाल्याची ही पहिलीच घटना नाही. सीट बेल्ट न वापरणाऱ्या लोकांचा मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे-
- ऑगस्ट 1997 मध्ये, राजकुमारी डायना आणि तिचा जोडीदार डोडी अल-फयद यांचा पॅरिसमध्ये एका हाय-स्पीड कार अपघातात मृत्यू झाला. दोघेही मर्सिडीज S600 च्या मागच्या सीटवर होते. त्याचवेळी समोरील पॅसेंजर सीटवर बसलेला अंगरक्षक या घटनेतून बचावला.
- जून 2014 मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत कार अपघातात मृत्यू झाला होतात. ते मारुती सुझुकी SX4 च्या मागच्या सीटवर बसले होते. त्याचवेळी समोरच्या सीटवर बसलेला त्यांचा ड्रायव्हर आणि सेक्रेटरी बचावले.
- ऑक्टोबर 2012 मध्ये कॉमेडियन जसपाल भाटी यांचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. तो त्याच्या होंडा अॅकॉर्डमध्ये पंजाबमध्ये प्रवास करत होता. कार झाडावर आदळली तेव्हा तो सीट बेल्ट न लावता मागे बसला होता. कारमधील इतर तीन जण बचावले, ज्यात गाडी चालवणाऱ्या त्याच्या मुलाचाही समावेश आहे. मागील सीट बेल्ट न वापरल्यानं प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणं आहेत.
हेही वाचा- Google Calendar: तुम्हीही मीटिंगची वेळ अन् तारीख विसरता? मग गूगल कॅलेंडरची घ्या मदत काय आहे नियम? केंद्रीय मोटार वाहन नियमचं (1989) कलम 138(3) सांगतं की, “मोटार वाहनामध्ये, ज्यामध्ये नियम 125 किंवा नियम 125-A चे उप-नियम (1) किंवा उप-नियम (1-A) समाविष्ट आहेत. या प्रकरणात, ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेली व्यक्ती किंवा समोरच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनं सीटबेल्ट लावणं आवश्यक आहे." भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये सांगितलं होतं की, सर्व प्रवाशांना केवळ सीटबेल्ट द्यायलाच हवेत. मागच्या सीटवर बसलेल्या मधल्या प्रवाशाला देखील तीन-पॉईंट्सचा सीटबेल्ट असणं आवश्यक आहे. लोक नियमांकडे करतात दुर्लक्ष- कायद्यानुसार सीटबेल्ट घालणं अनिवार्य आहे आणि त्यात दंडाचाही समावेश आहे, परंतु तरीही काही लोक त्याचे पालन करत नाहीत. 2019 मध्ये, भारतातील मोटार वाहन दुरुस्ती कायदा 2019 ने सीटबेल्ट न लावल्याबद्दलचा दंड 100 रुपयांवरून 1,000 रुपयांपर्यंत वाढवला. 2019 मध्ये सेव्हलाइफ फाऊंडेशननं केलेल्या अभ्यासानुसार 90 टक्के भारतीय मागील सीटबेल्ट वापरत नाहीत. मारुती सुझुकी आणि कांतार ग्रुपच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की केवळ 4 टक्के लोक मागील सीटबेल्ट वापरतात आणि केवळ 25 टक्के वाहन वापरकर्ते सीटबेल्ट वापरतात. कार अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंच्या यादीत भारत जगात अव्वल आहे. भारतात दरवर्षी सुमारे 150,000 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात.