धुळे, 2 जुलै : पत्नीला मारहाण करणाऱ्या शिक्षक पतीची हत्येचा प्रकार समोर आला आहे. या महिलेच्या प्रियकराने ही हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला सोनगीर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अपघाताचा बनाव करुन ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (Dhule Murder Case)
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या संदिपकुमार विश्वासराव बोरसे (वय 34, रा.सरवड ता.धुळे) याचा 26 जून रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सरवड गावातील शिवारात सरवड ते लामकानी रोडवर मृतदेह आढळून आला होता. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बोरसेंचा मृत्यू झाला असल्याचं मानून सुयोग भानुदास बोरसे यांच्या फिर्यादीनुसार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, याबाबत मयताच्या भावाने पोलिसांना दिलेली माहिती आणि घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांना संशय आला. या अनुषंगाने सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली.
सोनगीर पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला. घटनास्थळावरुन पोलिसांना इनोव्हा गाडीचा लोगो, बंफरच्या पट्ट्यांचे तुकडे सापडले होते. त्याआधारे पोलिसांनी रोडवरील विविध हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले. त्यात नगावबारी परीसरातील हॉटेल सुरूची येथील सीसीटीव्ही चित्रणात मृत संदीप बोरसे यांच्यासह सरवड येथीलच राकेश उर्फ दादा मधुकर कुवर (वय-35) आणि शरद दयाराम राठोड (वय-36) हे त्याच इनोव्हा गाडीतून परत गेल्याचे दिसून आले.
हे ही वाचा-पुण्यातील डॉक्टर दाम्पत्यामध्ये रुग्णावरुन झाला होता वाद; निखिलने सुसाइट नोट...
त्यावरून पोलिसांनी कुवर आणि राठोड यांना ताब्यात घेवून विचारपूस केली. कबुली जबाबादरम्यान राकेश कुवर याचे संदीप बोरसे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. मृत संदीप बोरसे नेहमी दारू पिऊन पत्नीला मारहाण व शिवीगाळ करीत असे. ही बाब राकेशला खटकत होती. यामुळे संदीपला संपविण्याचा राकेशने कट रचला. त्यासाठी त्याने शरद राठोडची मदत घेतली. योजनेनुसार दोघांनी 26 जूनच्या रात्री संदीपला देवभाने फाट्यावर पार्टीचा बहाणा करून बोलावले. तेथून त्याला धुळ्यात नेले. भरपूर दारू पाजून संदीपला सरवड फाट्यावर परत आणून सोडले. संदीप तेथूनच गावाकडे पायी निघाला. थोड्या वेळाने शरद राठोडने मागून इनोव्हा गाडीने संदीपला धडक दिली. त्यातच संदीपचा मृत्यू झाला होता. खूनाला अपघाताचे स्वरुप देण्यात आले. मात्र, चौकशीदरम्यान राकेशसह शरदने खुनाची कबुली दिल्याने दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.