औरंगाबाद, 23 ऑक्टोबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी लेटर बॉम्ब टाकत 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या या लेटरबॉम्बनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवलून निघालं. याच प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच अनिल देशमुख यांच्या घरावर इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयकडून धाडसत्र सुरू आहे. मात्र, असे असतानाच तक्रारदार असलेले परमबीर सिंग हेच गायब आहेत. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) परमबीर सिंग यांचा नामोल्लेख टाळत निशाणा साधला आहे.
आरोप करणाराच पळून गेला
आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, तरीपण केस सुरू आहे. तक्रारदार गायब.. आरोप करुन पळून गेला, कुठे गेला कोणाला माहिती नाही. पण आरोप केले आहेत ना मग खणून काढा. खणलं जात आहे. चौकश्या सुरू आहेत. धाडसत्र सुरू आहेत असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्या नावाचा उल्लेख टाळत टीका केली आहे.
संभाजीनगर-औरंगाबाद उच्च न्यायालय विस्तार इमारत उद्घाटन सोहळा - LIVE https://t.co/EhmT3mD7PP
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 23, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयासाठी नवी इमारत पाहिजे आहे... हे माझंही स्वप्न आहे. मी आज एक वचन देतो इमारतीचं भूमीपूजनाची तारीख तर ठरवूच आणि प्रयत्न असा करू की आपल्याच कारकिर्दीत त्याचं उद्घाटनही करू. आम्हाला न्याय प्रक्रियेबाबत पूर्ण विश्वास आदर आहे. न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आणखी गतीमान होण्यासाटी सरकार म्हणून जे काही करणं शक्य आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. अनेकदा न्यायालयात जाऊन जाऊन सर्वसामान्य भरडला जातो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबदच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अनिल देशमुखांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड
सप्टेंबर महिन्यात अनिल देशमुख यांच्या घरी आणि इतर मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकत झाडाझडती घेतली. अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आणि त्यासोबतच त्यांच्या इतरही मालमत्तांवर आयकर विभागाने (17 सप्टेंबर 2021) धाड टाकली. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून तब्बल 16 तास झाडाझाडती करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत अनिल देशमुख यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यानंतर दुसऱ्या दिवशी (18 सप्टेंबर 2021) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातून निघाले. यावेळी अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स आपल्यासोबत नेल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्या घरी शुक्रवारी ज्यावेळी आयकर विभागाने धाड टाकली त्यावेळी त्यांच्या घरी अनिल देशमुख आणि त्यांची दोन्ही मुलं उपस्थित नव्हते. तर अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि सून घरी होत्या.
25 मार्च रोजी सीबीआयने पहिल्यांदा अनिल देशमुखांच्या नागपूर येथील घरी छापा टाकला
24 एप्रिल रोजी ईडीने पहिल्यांदा अनिल देशमुख यांच्या निवस्थानी छापेमारी केली केली
त्यांनतर 16 मे, 26 मे, 16 जुलै आणि 6 ऑगस्टला परत ईडीने कारवाई केली होती
17 सप्टेंबरला इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली होती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Aurangabad, Paramvir sing, Uddhav thackeray