औरंगाबाद, 02 जून : औरंगाबादमध्ये (Aurangabad) दुकानं उघडणारच अशी घोषणाबाजी करणारे खासदार इम्तियाज जलील (mp imtiaz jaleel) यांना कामगार आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 जूनपासून औरंगाबाद शहरातील दुकानं उघडणारच अशी घोषणाबाजी करून जलील यांनी प्रशासनाला उघडपणे आव्हान दिले होते. परंतु, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत सुरू असलेल्या दुकानावर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी कारवाई केली होती. राज क्लॉथ या दुकानावर ही कारवाई करत सील केले होते.
#औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल, कामगार आयुक्त यांच्याशी बाचाबाची pic.twitter.com/k9As5Dt4fu
— News18Lokmat (@News18lokmat) June 2, 2021
या कारवाईमुळे इम्तियाज जलील कमालीचे संतापले होते. त्यांनी कामगार आयुक्तांचे कार्यालय गाठले आणि कारवाई का केली, असा जाब विचारला. ‘लॉकडाऊनमुळे आधीच लोकांचे रोजगार बुडाले आहे. दुकानात हातावर पोट असणारे कामगार काम करत आहे. तूला काही वाटत कसं नाही? अशा एकेरी भाषेत जलील यांनी कामगार आयुक्तांशी बाचाबाची केली होती. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. एवढंच नाहीतर 50 हजारांचा दंड का ठोठावण्यात आला, असा आरोपही जलील यांनी केला होता. मात्र, आपण असा कोणताही दंड स्विकारला नाही, असा दावा कामगार आयुक्त व्हिडीओत करत असल्याचे दिसून येत आहे. अखेर कामगार आयुक्त यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आल्याचे आरोप जलील यांच्यावर करण्यात आला आहे.