नवी दिल्ली, 2 मे : अनेकदा शिकवलेल्या काही गोष्टी प्राणी बरोबर लक्षात ठेवतात. जसं त्यांना शिकवलं जातं, तसंच ते करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक महिला आपल्या पाळीव प्राण्यांना जेवणापूर्वी प्रार्थना करण्यास शिकवत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्या महिलेचं आणि प्राण्याचंही कौतुक केलं आहे. ट्विटर वापरकर्त्या वैशाली माथूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून आ व्हिडीओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये महिलेने दोन कुत्र्यांना आपापल्या भांड्यांत खाण्यासाठी दिल्याचं दिसतंय आणि प्रार्थनेनंतर खाण्यासाठी ते दोघेही धीराने वाट पाहत असल्याचं दिसतंय. महिला हात जोडून जेवणापूर्वी करण्याची प्रार्थना ‘वदनी कवळ घेता…’ बोलत आहे आणि ते दोघे शांतपणे बसले आहेत. महिलेची प्रार्थना संपल्यानंतर, तिने त्या दोन पिल्लांना हात केल्यानंतर ते खाण्यासाठी जेवणाच्या भांड्यांकडे वळले. तोपर्यंत ते समोरील जेवणाला स्पर्शही करत नाहीत. ‘माझ्या मैत्रिणीने तिच्या पिल्लांना जेवणाआधी प्रार्थना करण्याचं शिकवल्याचा हा व्हिडीओ शेअर करत आहे.’ असं लिहत वैशाली यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लाईक्स, रिट्विटसह व्हायरल झाला आहे.