2 मुलींनी केलं लग्न
पाटणा 15 जुलै : प्रेमाचं एक अतिशय अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. हे विचित्र प्रकरण बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील आहे, जिथे दोन मैत्रिणींच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. ही घटना सूर्यपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील अलीगंज येथील आहे. घटनेत दोन मैत्रिणींनी आधी घरातून पळून जाऊन लग्न केलं, त्यानंतर दोघींनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली. आता ही बाब परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. अलीगंजची रहिवासी असलेली बीए पार्ट 2 ची विद्यार्थीनी आणि 2023 मध्येच मॅट्रिक उत्तीर्ण झालेली मुलगी, या दोघींमध्ये लहानपणापासूनच खूप जवळीक होती. एकमेकींबद्दलची ओढ, तसंच ट्यूशनला सोबत जाण्याचा आणि रात्री सुद्धा एकत्र वेळ घालवण्याचा त्यांचा प्रवास, यात दोघींच्या कुटुंबीयांना तसंच गावकऱ्यांना समजलंच नाही की त्या कधी एकमेकींकडे आकर्षित झाल्या आणि प्रेमात पडल्या. लोकांनी सांगितलं की, 1 जून रोजी यातील एका मुलीच्या घरच्यांनी तिचं मोठ्या थाटामाटात लग्न लावलं आणि खूप पैसा खर्च केला. पण लग्नाच्या दोन आठवड्यांनंतरच ती तिथून पळून आली आणि आपल्या घरी परतली. Weird Tradition : इथं हळदीऐवजी नवरीला फासतात काळं; घालतात चिखलाची अंघोळ दोन्ही मुलींची घरं एकमेकांच्या अगदी विरुद्ध अगदी समोर आहेत. दोघींच्या घरच्यांचे संबंधही चांगले आहे. यामुळे या दोघी रोज रात्री एकमेकींच्या घरी जाऊन एकत्र झोपायच्या. मंगळवारी दोन्ही मुली पहाटे घरातून अचानक गायब झाल्या आणि बुधवारी सायंकाळी दोघी घरी परत आल्या. घरच्यांनी दोघी कुठे गेल्या होत्या याची विचारणा केली असता दोघांनीही लग्न केल्याचं सांगितलं. आता एकत्रच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दोघींच्या लग्नाची बातमी ऐकून कुटुंबीय आणि गावकऱ्यांना धक्काच बसला. त्यानंतर दोघींच्या नातेवाइकांनी विरोध करत रात्री दोघींनाही पोलीस ठाण्यात आणून सर्व प्रकाराची माहिती पोलीस स्टेशन प्रमुखांना दिली. पोलिसांनी दोन्ही मुलींची चौकशी सुरू केली असता, दोघींनी सांगितलं की, आम्ही लहानपणापासून एकमेकींवर प्रेम करतो आणि आम्ही दोघींनी दिनाराच्या भालुनी भवानी धाममध्ये लग्न केलं आहे. आता आम्ही एकत्र राहू. आमच्या नातेवाईकांनी विरोध केला तर आम्ही दोघी बाहेर जाऊन एकत्र राहू. दोघीही अद्याप अल्पवयीन असून दोन मुलींच्या लग्नाला कायदेशीर मान्यता नाही, त्यामुळे तुम्ही दोघी आपापल्या घरी जा, असं दोन्ही तरुणींना पोलिसांनी सांगितलं. परंतु आम्ही घरी गेलो तर आमचे नातेवाईक मारहाण करतील, असा युक्तिवाद दोन्ही मुलींनी केला. ते आम्हाला घर सोडू देणार नाही. आम्हाला घरी जायचं नाही, असं त्या म्हणाल्या. त्याचवेळी दोघींच्या नातेवाइकांनी एकमेकांवर हल्ला करणार नसल्याबाबत कागदपत्र देऊन त्यांना घरी नेलं आहे. निघताना दोन्ही मुली म्हणाल्या की, आम्ही दोघी प्रौढ झाल्यावर एकमेकींसोबत राहायला सुरुवात करू.